सावेडीच्या अग्निशमनची धुरा अवघ्या तीन जणांवर

अग्नीशमन दलाचा एक बंब नादुरुस्त : सुरुवातीपासूनच कर्मचाऱ्यांची वानवा
नगर – एक महिन्यापूर्वीच सावेडी परिसरातील “कलाश्री आर्ट स्डुडिओ’ला मोठी आग लागली. या वेळी सावेडी, नगर शहर आणि एमआयडीसीतील अग्निशमन दलांनी तसेच एमआयआरसीच्या अग्निशमन पथकाने प्रयत्नांची शर्थ करुन ही आग आटोक्‍यात आणली. सावेडी हे उपनगर म्हणजे गेल्या 20-25 वर्षांत वसलेला नवा भाग. मोठ्या इमारती, कार्यालये, वाढते उपनगर यामुळे येथील अग्निशमन व्यवस्था चोख असायला हवी, या हेतूने त्या कार्यालयाला भेट दिली असता अवघ्या तीन जणांवर सावेडीची अग्निशमन व्यवस्था अवलंबून असल्याचे निदर्शनास आले.
सावेडी उपनगर या परिसराचा गेल्या 25 वर्षांत झपाट्याने विकास झाला. आजुबाजूच्या ग्रामपंचायतीही महापालिकेत आल्याने विस्तारही वाढला. जवळपास 10 कि.मी.चा परिघ असलेल्या सावेडी उपविभागात अनेक मोठ्या आस्थापनांची कार्यालये, मोठमोठी रुग्णालये, बिग बझारसारखी अनेक मोठी मॉल्स्‌, हॉटेल्स्‌, बॅंका-पतसंस्थांच्या इमारती, नागरी वसाहतीच्या मोठमोठ्या इमारती असा हा विकासाची किनार लाभलेला भाग. 1998 साली सावेडी उपविभागात अग्निशमन दलाची स्थापना झाली. तेव्हापासून ते आजतागायत येथे पूर्ण क्षमतेने कर्मचारी कधी भरलेच गेले नाहीत. तीन हजार लीटरचा एक अग्निशमन बंब आणि अगदी अलीकडच्या काळात 500 लीटर पाणी आणि फोम पसरविण्याची क्षमता असलेले सुमोसारख्या दोन छोटे अग्निबंब या केंद्राला मिळाले. मात्र, गेल्या 6 महिन्यांपासून यातील एक बंब नादुरूस्त अवस्थेत आहे.
वास्तविक पाहता या अग्निशमन केंद्रावर दोन ड्रायव्हर आणि किमान सात फायरमनची आवश्‍यकता आहे. मात्र, येथे एक ड्रायव्हर आणि तीन फायरमन असा चार जणांचा ताफा आहे. या ताफ्यातील एक कर्मचारी 30 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहे. उरलेल्या तिघांपैकी एक ड्रायव्हर हा अग्निशमन दलाचे प्रशिक्षण घेतलेला असून उर्वरित कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण नाही. शिवाय, अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडतो. सावेडी अग्निशमन दलातील तीन हजार लीटरचा अग्निशमन बंब तोही अधुनमधून नादुरूस्त होतो. सावेडीसारख्या विकसनशील भागात एखादी दुर्घटना घडल्यास अपुऱ्या मनुष्यबळाअभावी तसेच नादुरूस्त गाड्यांमुळे लवकर नियंत्रण मिळवता येत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळेच “कलाश्री’ला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काहीसा अवधी लागला. मात्र, या बाबीला सावेडी अग्निशमन दलाला अजिबात दोषी धरता येणार नाही.
मातब्बर नगरसेवकांचे लक्ष नाही
महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून सावेडी उपविभागाला नेहमीच महत्त्वाची पदे मिळाली. शिवाय, या भागाला लाभलेले मातब्बर नगरसेवक हे महापालिकेत कायम आक्रमक भूमिका घेत असतात. मात्र, यापैकी एकाचेही या अग्निशमन दलासारख्या महत्त्वाच्या विभागाकडे लक्ष नाही. त्यामुळे या विभागाच्या मागण्यांना महापालिकेत कोणी दादही देत नाही.
अग्निशमन दलाला प्रशिक्षित कर्मचारी नाही
अग्निशमनसारख्या महत्त्वाच्या विषयावर कर्मचारी हा प्रशिक्षण घेतलेलाच असावा यासाठी शासन कायम प्रयत्नशील असते. मात्र, सावेडी विभागातील अग्निशमन दलात ड्रायव्हर वगळता अन्य सर्व बिगारी म्हणून नियुक्‍त झालेले कर्मचारी आहेत. त्यामुळे आग कोणत्या प्रकारची आहे, ती कशी विझवावी याचे ज्ञानच या कर्मचाऱ्यांना नाही. शिवाय, प्रत्येक ठिकाणी बंब पोहोचू शकत नाही. अशावेळी मोठ्या लांबीचा पाइप जोडावा लागतो. मात्र कर्मचारीच नसल्याने ही कामे करणार कोण? असा प्रश्‍न पडतो.
विरोधी पक्षनेत्याच्या दौऱ्यात बंद पडला बंब
चार-पाच दिवसांपूर्वीच राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे हेलिकॉप्टर एमआयडीसी समोरुन विखे पाटील फाउंडेशनच्या हेलिपॅडवर उतरले. तेथे अन्य ताफ्यासह सावेडी विभागाचा अग्निशमन बंबही तैनात होता. विरोधी पक्षनेत्यांचे हेलिकॉप्टर उडाल्यानंतर हा बंब लगेच नादुरुस्त झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)