सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा लोगो तात्काळ बदला

डॉ. भारत पाटणकरांची मागणी : शनिवारवाडा शिक्षणाचे प्रतिक नव्हे

सातारा,दि.8 प्रतिनिधी- पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले असले तरी अद्याप विद्यापीठाच्या सर्व कामकाजातील कागदपत्रांवर शनिवार वाड्याचा लोगो लावण्यात येत आहे. तो तात्काळ बदलून त्या जागी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचा लोगो लावण्यात यावा, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

थोरल्या बाजीराव पेशव्यांनतर शनिवार वाडा हा जातीयवाद, पिळवणूक, दडपशाही आणि अत्याचाराचे केंद्र राहिले आहे. अशा शनिवार वाड्याचा लोगो पुणे विद्यापीठाने वापरला आहे. याबाबतचा आक्षेप 13 वर्षापुर्वीच घेतला होता. मात्र, आता पुणे विद्यापीठाला कर्मभूमीतील सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे. अशावेळी छ.शिवाजी विद्यापीठाप्रमाणे पुणे विद्यापीठाने सावित्रीबाई फुले यांचा लोगो लावावा, अशी मागणी 15 संघटना करित आहेत. मात्र, पुणे येथील ब्राम्हण सभेच्या अध्यक्षांनी पुणे विद्यापीठाने लोगो बदलण्याची चर्चा देखील संघटनांच्या प्रतिनिधींशी करू नये असे सांगितले आहे. वास्तविक त्यांनी व्यक्ती म्हणून मांडले असते तर समजू शकलो शकतो. मात्र, एखाद्या समाजाचे प्रतिनिधी म्हणून जेव्हा ते भूमिका मांडतात तेव्हा त्यांच्या हेतूबाबत शंका निर्माण होते. थोरल्या बाजीराव पेशव्यांना इतर समाजाने कधी ही वाईट म्हटले नाही. उलट शाहु महाराजांनी त्यांच्या बाजूने भूमिका घेतली होती. हे विसरता येणार नाही. थोरल्या बाजीराव पेशव्यानंतर शनिवार वाड्याने जातीयवादाला खतपाणी घातले.त्यांचा आणि शनिवारवाड्याचा कधीही शिक्षणाशी संबध आला नाही. अशा शनिवार वाड्याचा लोगो किमान सावित्रीबाई फुले यांच्या नामकरणानंतर तरी बदलण्यात यावा, अशी आपली मागणी आहे. याबाबत 15 संघटनांचा लढा सुरू आहे. त्यांनी येत्या दिवसात कार्यक्रमाला निमंत्रित केले आहे. त्यानंतर देखील मागणी मान्य न झाल्यास श्रमिक मुक्ती दल सर्व ताकदीनिशी या लढ्यात उतरेल, असे डॉ.पाटणकर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)