सावित्रीच्या लेकींना एसटीचेही पाठबळ

file photo

– नाना साळुंके

पुणे – प्रवासासाठी पैसे नसल्यामुळे अनेक गावांत आजही शिक्षणाची गंगा गोरगरीबांच्या घरात पोचलीच नाही. त्यामुळेच ग्रामीण भागातील अनेक गुणवंत विद्यार्थीनी आजही शिक्षणापासून वंचित राहिल्या आहेत. नेमका हाच धागा पकडून एसटी महामंडळाने इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थीनींना मोफत प्रवासाचा निर्णय घेत क्रांतिकारी पाऊल टाकले आहे.

एसटी महामंडळाच्या या निर्णयाचा राज्यभरातील लाखो विद्यार्थीनींना फायदा होणार आहे. त्यातूनच शिकली सवरलेली आई केवळ कुटुंबालाच नव्हे तर समाजालाही पुढे नेणार आहे. त्यामुळे या सोनेरी संधीचा विद्यार्थीनी आणि त्यांच्या पालकांनी लाभ घेण्याची आवश्‍यकता आहे, तरच या योजनेचा खऱ्या अर्थाने फायदा होणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठीही एसटी हेच दळणवळणाचे महत्त्वाचे साधन समजले जाते. देश एकविसाव्या शतकात असला तरी आजही बहुतांशी खेड्यापाड्यात सातवीच्या पुढे तर काही गावात तर पाचवीच्या पुढे शाळाच नाहीत. त्यामुळेच या विद्यार्थी- विद्यार्थीनींना तालुक्‍याच्या अथवा शहराच्या भागात शाळेला जाण्याशिवाय पर्यायच नाही. मात्र; प्रवास खर्चासाठी पैसेच नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्धवट शिक्षण सोडावे लागले, यामध्ये विद्यार्थीनींची संख्या सर्वाधिक आहे. यापूर्वी एसटी महामंडळाच्या वतीने दहावीपर्यंतच्या विद्यार्थीनींना प्रवासात सवलत देण्यात येत होती. परंतु दहावीनंतर काय? असा प्रश्‍न सतावत असल्याने विद्यार्थीनी सातवीनंतर शिक्षण सोडून देत होत्या, नेमका हाच मुद्दा महामंडळाच्या निदर्शनास आला होता. त्यामुळे बारावीपर्यंतच्या विद्यार्थीनींना प्रवासात सवलत देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला.

या योजनेमुळे ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थीनींना याचा लाभ होणार आहे, परंतु एसटी महामंडळाचा तितक्‍याच पटीत आर्थिक तोटाही होणार आहे. विशेष म्हणजे महामंडळाला याची पूरेपूर जाणीव आणि माहिती असतानाही महामंडळाने हा धाडसी निर्णय घेतला आहे. यातून महामंडळाने त्यांची जबाबदारी पूर्ण करुन दाखविली आहे, त्याशिवाय विद्यार्थीनींना आणि त्यांच्या पालकांनाही संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे हे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी ही या विद्यार्थीनी आणि त्यांच्या पालकांची आहे. या संधीचा फायदा घेऊन शिक्षणाची गंगा आपल्यापर्यंत आणि आपल्या कुटुंबांपर्यंत आणण्याची जबाबदारी या विद्यार्थीनींवर असणार आहे, तरच या निर्णयाचा फायदा होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)