सावर रे! (अग्रलेख)

तुर्कस्तानातील आर्थिक अरिष्टाचा परिणाम म्हणून अनेक उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या चलनासह, भारतीय चलनानेही प्रत्येक अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सार्वकालिक 70.09 रुपये असा नीचांक मंगळवारी दाखविला. तुर्कस्तानातील ताज्या घडामोडींनी उदयोन्मुख राष्ट्रांविषयी जोखमेची भावना जागतिक स्तरावर निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम अमेरिकी डॉलर सशक्त बनले असून, याचा फटका भारतीय रुपयालाही बसला आहे, हे भाजपा नेते अरुण जेटली यांचे म्हणणे खरे आहे.

गेल्या काही वर्षांपासून आपल्या अर्थव्यवस्थेने राखलेल्या गतीने आपली अर्थव्यवस्था फ्रान्सपेक्षाही मोठी झाली आहे, त्यामुळे साहजिकच भारतीयांची छाती अभिमानाने फुलली असेल, तर त्यात नवीन काही नाही; परंतु आता चीनशी बरोबरी करण्याची आपल्याला घाई झाली आहे. जगात आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न आपल्याला पडायला लागले आहे. मोठी स्वप्ने पाहायला हरकत नाही; परंतु ती कशी पूर्ण होतील आणि आपल्याला ती पूर्णत्त्वाला नेता येतील का, याचा विचार करायला हवा. सध्या जगात सर्वांत मोठी अर्थव्यवस्था अमेरिकेची आहे, तर त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो.

चीनची अर्थव्यवस्था भारताच्या चौपट, तर अमेरिकेची सहापट मोठी आहे. कोणत्या देशाची निर्यात जास्त आणि आयात कमी आहे, यावर त्या देशाची अर्थव्यवस्था किती सुदृढ आहे, हे ठरवता येते. भारताच्या तुलनेत चीनची निर्यात कितीतरी जास्त आहे, अगदी अमेरिकेनेही चीनच्या अर्थव्यवस्थेचा धसका घेतला आहे. चीनपेक्षा आपल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग जास्त असला, म्हणून बेडक्‍या फुगवण्यात अर्थ नाही, तर आयात-निर्यात, परकी चलनसाठा, अर्थव्यवस्थेचा आकार आदी बाबींचा विचार करावा लागतो. हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे “भारताच्या परकीय गंगाजळीच्या साठ्यात झालेली घट आणि त्यावरून चिंता करण्याचे काहीच कारण नाही’, हा भाजपा नेते अरुण जेटली यांनी दिलेला सल्ला.

परकीय गंगाजळीच्या कमी झालेल्या साठ्यामुळे चंद्रशेखर पंतप्रधान असताना आपल्याला आपल्याकडील सोने गहाण ठेवावे लागले होते, ही घटना तीन दशकांपूर्वीची आहे. त्यामुळे आताही परकीय गंगाजळीचा साठा घटल्याने आणि त्यातच जागतिक आर्थिक घडामोडीमुळे भारताचा शेअरबाजार कोसळल्याने लगेच चिंता व्यक्‍त व्हायला लागली. काहींनी तर त्याचा संदर्भ चीनच्या परकीय चलनाच्या साठ्यात झालेल्या घटीशी जोडला आहे. चीनमध्ये पहिल्या तिमाहीत 17 वर्षांच्या कालखंडानंतर प्रथमच चालू खात्यावर तूट दिसून आली आहे. गेली काही वर्षे चीनची जगात निर्यातीत मक्तेदारी होती, ती आता संपत चालल्याची ही लक्षणे आहेत.

चीनकडे सर्वाधिक 3.14 लाख कोटी डॉलर्सची परकीय चलन गंगाजळी होती. तिथे आता चालू खात्यावर पहिल्या तिमाहीत 28.2 अब्ज डॉलर्सची तूट दिसून आली आहे. सन 2001 मध्ये यापूर्वी अशी तूट दुसऱ्या तिमाहीत दिसली होती. “स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ फॉरेन एक्‍सचेंज’ या संस्थेच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. वस्तूंच्या व्यापारात अजूनही चीनची 53.4 अब्ज डॉलर्सची आघाडी आहे. सेवा व्यापारात 76.2 अब्ज डॉलर्सची तूट दिसून आली, जी सन 1998 पासूनची सर्वांत मोठी तूट आहे.

चीनच्या चालू खात्यावर पहिल्या तिमाहीतली तूट तात्कालिक कारणांमुळे नसून, तो चीनच्या आंतरराष्ट्रीय व्यापारातील परिणाम असून गेल्या दहा वर्षांतील आर्थिक फेरसमतोलाचा तो भाग आहे. चीनची चालू खात्यात गेल्या 25 वर्षांत नेहमीच अतिरिक्त परकीय चलन गंगाजळी राहिली. त्यामुळे आता परिस्थिती बदलणार नाही, असा गैरसमज चीनने करून घेतला. आता ही परिस्थिती बदलत आहे. व्यापार संघर्षांमुळे आता तूट दिसू लागली आहे. ती वाढूही शकते, असा इशारा अर्थतज्ज्ञ देतात.

अमेरिकेबरोबर चीनच्या व्यापार चर्चा सुरू असताना चालू खात्यावर तूट वाढली आहे, हे वाईट संकेत आहेत. दुसरीकडे, भारतीय रिझर्व्ह बॅंकेला चलनवाढ होण्याची भीती वाटत असताना परकीय चलन मालमत्तेमध्ये घट झाली. देशाच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये 950 दशलक्ष डॉलरने घट झाली आहे. आता या गंगाजळीमध्ये 404.192 अब्ज अमेरिकन डॉलर शिल्लक आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेचे मापन करण्याचे परकीय चलन गंगाजळी हे एक एकक आहे. ही गंगाजळी जेवढी जास्त तेवढी अर्थव्यवस्था मजबूत मानली जाते. आपले चारशे अब्ज डॉलर कुठे आणि चीनचे तीन लाख डॉलर कुठे, याचा विचार चीनशी तुलना करताना केला पाहिजे.

घसरणाऱ्या रुपयाचे मूल्य स्थिर करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेला मोठ्या प्रमाणात डॉलर विकावे लागत आहेत. त्यामुळे परकीय चलनाच्या साठ्यात वेगाने घट होत आहे. गेल्या दोन आठवड्यात रुपयाच्या मूल्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेला चलन बाजारात हस्तक्षेप करावा लागला. त्याच काळात सोन्याचा साठा 75 दशलक्ष डॉलरनी वाढून 21 अब्ज डॉलर इतका झाला आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय मूल्याने अभूतपूर्व नीचांकी पातळी गाठल्याच्या एक दिवसानंतर, अरुण जेटली यांनी भारतीय चलनातील अस्थिरता हाताळण्याइतका मुबलक परकीय चलन गंगाजळी असल्याचा दावा केला. भारतीयांनी घाबरून जाऊ नये, यासाठी हे धीराचे शब्द असले, तरी ही परिस्थिती आणखी बिकट होण्यापूर्वीच सावरले पाहिजे, हा धडा आपण घेतला पाहिजे.

तुर्कस्तानातील आर्थिक अरिष्टाचा परिणाम म्हणून अनेक उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या चलनासह, भारतीय चलनानेही प्रत्येक अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सार्वकालिक 70.09 रुपये असा नीचांक मंगळवारी दाखविला. तुर्कस्तानातील ताज्या घडामोडींनी उदयोन्मुख राष्ट्रांविषयी जोखमेची भावना जागतिक स्तरावर निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम अमेरिकी डॉलर सशक्त बनले असून, याचा फटका भारतीय रुपयालाही बसला आहे, हे अरुण जेटली यांचे म्हणणे खरे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)