सावध ऐका पुढल्या हाका

गेल्या काही दिवसात जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी पर्यावरणविषयक घडलेल्या घटना आणि प्रसिध्द झालेले अहवाल पहाता आता जगाला जागे होण्याची वेळ आली आहे असे म्हणावे लागेल. निसर्गाची ही हाक आपण ऐकणार आहोत की नाही?

सध्या होणाऱ्या हवामान बदलाचे आशियातील देशांमध्ये विपरित परिणाम भविष्यात दिसून येणार असल्याचा इशारा एशियन डेव्हलपमेंट बॅंक (एडीबी) आणि इन्स्टिट्यूट ऑफ क्‍लायमेट इम्पॅक्‍ट रिसर्च (पीआयके) या संस्थांनी आपल्या अहवालात नुकताच दिला आहे. विपरित परिणामांचे स्वरुप कसे असेल, याची उदाहरणेही या अहवालत देण्यात आली आहेत. दक्षिण भारताचे प्रमुख पिक असणाऱ्या भात पिकामध्ये सन 2030 पर्यंत पाच टक्‍के घट होण्याची भीती अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. हवामान बदलामुळे चक्रीवादळासारखे प्रकार वारंवार घडणार असून त्याचा सर्वाधिक धोका चीन, भारत, बांगलादेश आणि इंडोनेशिया या देशांना पोहोचणार आहे. किनारपट्टीच्या परिसरात महापुराचा मोठा धोका आहे. भारतातील मुंबई, कोलकाता, चेन्नई, सुरत या शहरांसह जगातील 20 देशांना महापुराचा मोठा धोका जाणवणार आहे. हा अहवाल प्रसिध्द होण्याच्या काही दिवस आधीच घडलेली आणखी एक घटना महत्वाची आहे.

अंटार्क्‍टिकातील एक महाकाय हिमखंड दुभंगून तो अंटार्क्‍टिकाच्या मुख्य भूमीपासून वेगळा झाला आहे. मुंबईच्या दसपटीने मोठा असा हा हिमखंड आता अंटार्क्‍टिकापासून तुटला असून, त्यामुळे अंटार्क्‍टिका खंडाचा आकारच बदलून गेला आहे. पण सुमारे 98 टक्‍के बर्फाच्छादित असलेल्या अंटार्क्‍टिकापासून हिमखंड तुटून निघणे ही काही नवी बाब नाही. मात्र, हा सुमारे 5,800 वर्ग किलोमीटरचा हिमखंड वातावरणातील बदलामुळे तुटल्याचे कारण सांगितले जात असल्याने या विषयाचे गांभीर्य अधिक आहे. हा हिमखंड तुटल्याने तातडीने काही परिणाम जाणवणार नसले, तरी कालांतराने समुद्र वाहतुकीवर परिणाम जाणवणार आहेत. कारण समुद्र पातळीत 10 सेंमीने वाढ होईल. कार्बन उत्सर्जनामुळे जागतिक तापमानामध्ये वाढ झाली असल्याने, याचा थेट परिणाम आता वातावरणावर होऊ लागला आहे याचे हे ताजे उदाहरण मानावे लागेल. हिमखंड तुटण्याच्या या घटनेचा भारतावरही परिणाम होण्याची शक्‍यता आहे. समुद्राच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने अंदमान आणि निकोबारच्या बंगाल खाडीतील सुंदरबनचा काही भाग पाण्याखाली जाण्याची शक्‍यता आहे. अरबी समुद्रावर या घटनेचा सध्या फारसा परिणाम होणार नसला तरी भविष्यात, भारताच्या 7 हजार 500 किमी लांबीच्या किनारपट्टीला या हिमखंडापासून धोका आहे. भारताची आयटी राजधानी म्हणून ओळख असलेल्या बंगलुरु शहरातील एका तलावात रसायनमिश्रीत पाणी मिसळले जात असल्याने या तलावावर प्रदूषणाचा पांढरा फेस तयार होत आहे आणि सतत रस्त्यावर पसरत आहे. पुणे शहरातील म्हात्रे पूल ते राजराम पूल परिसरातील ब्लू लाइनमधील मंगल कार्यालये, हॉटेल, तसेच इतर अनधिकृत बांधकामे चार आठवड्यांत काढून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही नुकतेच हरीत लवादाने महापालिकेस दिले आहेत. गेल्या काही दिवसात भारतासह जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी पर्यावरणविषयक घडलेल्या घटना आणि प्रसिध्द झालेले हे अहवाल किंवा न्यायालयीन निकाल पहाता आता जगाला जागे होण्याची वेळ आली आहे असे म्हणावे लागेल. पण निसर्गाची ही हाक आपण ऐकणार आहोत की नाही, हाच खरा प्रश्‍न आहे. पर्यावरण संरक्षण, पर्यावरण संवर्धन आदी विषय फक्त शाळेतील निबंधांपुरते मर्यादित राहिले आहेत की काय, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटींवार यांनी या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात चार कोटी वृक्षलागवडीचा उपक्रम राबवला. हा उपक्रम स्तुत्य असला तरी तोही किती गांभीर्याने राबवला गेला, याबाबत अनेक शंका आहेत. खड्ड्यांची संख्या आणि लावलेली झाडे यांचा हिशेब अनेक ठिकाणी लागलेला नाही.

गेल्या वर्षी हाच उपक्रम राबवला गेला होता. त्यापैकी किती झाडे जगली आहेत हाही संशोधनाचा विषय आहे. सध्या पावसाळी हंगाम सुरु असतानाही हवामान खात्याचा अंदाज सतत चुकत आहे. म्हणून या खात्याची सतत चेष्टा होत आहे आणि एका शेतकऱ्याने हवामान खात्याविरोधात फसवणुकीची तक्रारही दाखल केली आहे. अंदाज चुकण्यास सर्वस्वी हवमान खाते जबाबादार आहे असे म्हणता येणार नाही. कारण हवामानात एवढा बदल जाला आहे की कोणत्याही जुन्या पध्दतीने आता हवामानविषयक अंदाज व्यक्त करणे केवळ अशक्‍य आहे. पर्यावरण आणि विकास याचा समतोल साधणे आपल्याला कधीच जमले नसल्याने चिरंतन विकास हा विषयही कागदावरच राहिला आहे. साधी प्लॅस्टिक बंदी आपल्याला प्रभावीपणे राबवता आलेली नाही. हजारो टन प्लॅस्टिक कचऱ्यामुळे निसर्गाचे अतोनात नुकसान होत आहे. पण त्याची जाणीव प्लॅस्टीक वापरणाऱ्यांनाही नाही आणि सत्ताधाऱ्यांनाही नाही. झाडे तोडली जात आहेत.बांधकामासाठी खाणीतून दगड काढला जात आहे. नदीपात्रातून वाळूचा भरमसाठ उपसा केला जात आहे. लाखो वाहनांमधून आणि कंपन्यांच्या चिमण्यांमधून विषारी धूर वातावरणात मिसळला जात आहे. कारखान्यांची घातक रसायने नदीत मिसळली जात आहेत. हे सारे आपल्या आसपास घडत असतानाही तथाकथित सुजाण नागरिक आणि सत्ताधारीही गप्प आहेत. केवळ झाडे लावून काहीच साध्य होणार नाही.पर्यावरणाचे रक्षणही होणे गरजेचे आहे. अंटार्क्‍टिकातील त्या तुटलेल्या महाकाय हिमखंडाने आणि बंगलुरुमधील विषारी फेसाने निश्‍चितच एक इशारा दिला आहे. तो गांभिर्याने घेउन जागे होण्याची हीच वेळ आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)