सावधान! हवेतील पीएम 10 वाढतोय

ठोस उपायोजनांना बगल : पालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ सुस्त

पुणे – सूक्ष्म स्वरूपात असलेल्या हवेतील पर्टिक्‍युलर मॅटर 10 (पीएम 10) या घटकाचे हवेतील प्रमाण वाढत आहे. हवेतील प्रदूषणाबरोबरच नागरिकांच्या आरोग्यासाठीदेखील हानिकारक असलेल्या या घटकाचे प्रमाण सातत्याने वाढत असूनही, शासकीय यंत्रणा मात्र, याबाबत फारशा गंभीर नाहीत. त्यामुळेच या घटकाच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असणाऱ्या कारणांवर उपाय करण्याबाबत अद्याप कोणतेही ठोस उपाययोजना केली जात नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हवेतील सर्वाधिक प्रदूषणकारी घटक समजल्या जाणाऱ्या पीएम 10 हा आकाराने अतिशय सुक्ष्म घटक असतो. शहरी भागातील हवेत या प्रदूषणकारी घटकाचे प्रमाण सर्वाधिक आढळते. शहरातील हवेची “सफर’, “राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि “केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ’ या तिन्ही संस्थांकडून “रिअल टाइम मॉनिटरिंग’ केली जाते. स्वारगेट, कर्वेनगर, शिवाजीनगर आदी विविध भागांमध्ये ही पाहणी होत असते. या तिन्ही संस्थांच्या एअर क्‍वॉलिटी इंडेक्‍सनुसार (एक्‍यूआय) शहरातील हवेत पीएम 10 चे प्रमाण ठरवून दिलेल्या पातळीपेक्षा वाढले असल्याचे दर्शविले जात आहे. हवेतील या घटकाचे प्रमाण वाढल्याने हवेचे प्रदूषण होत आहे. त्याचबरोबर नागरिकांनादेखील आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषत: श्‍वसनासंदर्भातील समस्या मोठ्या प्रमाणात जाणवतात.

महत्त्वाचे म्हणजे या संस्थांनी आपल्या अहवालात वारंवार शहरातील पीएम 10 घटकांचे प्रमाण धोकादायक पद्धतीने वाढत असल्याचे नमूद केले आहे. विशेषत ऑक्‍टोबरनंतर हे प्रमाण धोकादायक पातळीवर असते. त्यामुळेच या घटकाच्या निर्मितीचे प्रमुख स्त्रोत असणाऱ्या कारणांवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. मात्र, स्थानिक प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून याबाबतीत सातत्याने दुर्लक्ष होत असते. हवा प्रदूषणाची गांभीर्यता लक्षात घेत, महापालिका प्रशासनाला यासंदर्भात वारंवार सूचना आम्ही करतो. मात्र, महापालिका या विषयाबाबत फारशी गंभीर नसून, त्यांच्याकडून कोणतेही ठोस उपाययोजना सादर केल्या जात नाहीत, अशी माहिती राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आली आहे.

पीएम 10 वाढण्याचे प्रमुख कारणे :
– वाढते शहरीकरण
– वाहनांची सतत होणारी वर्दळ
– धूलीकण

परिणाम
– श्‍वसनाचे विकार
– कफ
– अस्थमा
– फुफ्फुसाच्या कामात अडथळा निर्माण होणे.

विविध संस्थांच्या पाहणीनुसार आजचे पीएम 10 चे प्रमाण
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ – 115
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ – 100
सफर – 114

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)