सावधान…’सीओपीडी’ने पोखरतंय तुमचं फुफ्फुस

वाढत्या वायूप्रदूषणाचे दुष्परिणाम : सर्वाधिक त्रास महिलांना


जैवइंधनाचा वापर वाढल्याने धोकाही बळावला


प्रौढ मृत्यूंपैकी 43 टक्के मृत्यूंसाठी वायूप्रदूषणाने


योग्य औषधोपचार आणि जीवनशैलीतील बदल आवश्‍यक


कफ प्रदीर्घ काळासाठी बरा होत नसल्यास घ्या सल्ला

पुणे – वाढत्या वायूप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर परिणाम उद्‌भवत आहे. हवेतील धोकादायक घटकांमुळे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्‍टिव्ह पल्मोनरी डिसॉर्डर (सीओपीडी) या श्‍वसनाशी संबंधित आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होत असून या आजाराने होणारे फुफ्फुसांचे नुकसान न भरून येणारे आहे, असा दावा डॉक्‍टरांनी केला आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेणे आवश्‍यक आहे.

वायूप्रदूषण हा असंसर्गजन्य आजारांच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरणारा गंभीर घटक आहे. याची दखल आरोग्य परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये घेण्यात आली आहे. अहवालानुसार “सीओपीडी’मुळे होणाऱ्या एकूण प्रौढ मृत्यूंपैकी 43 टक्के मृत्यूंसाठी वायूप्रदूषण कारणीभूत असते. वायूप्रदूषणासोबतच धूम्रपान हेदेखील यामधील एक प्रमुख कारण असते. अन्न शिजविण्यासाठी, वाहनांमध्ये तसेच इतर दैनंदिन घडामोंडीसाठी सुमारे 70 टक्के इतक्‍या प्रमाणात जैव इंधनाचा वापर आपल्याकडे केला जातो. जैवइंधन जाळल्यामुळे हवेत मिसळणाऱ्या दूषित घटकांचे प्रमाण खूप जास्त असते. आज जैवइंधन हे “सीओपीडी’च्या प्रादुर्भावामागचे महत्त्वाचे कारण मानले जाते. शहरी भागात प्रामुख्याने वाहनांद्वारे सोडल्या जाणाऱ्या धुरातून हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये “सीओपीडी’चे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण दरवर्षी जवळजवळ तिपटीने वाढत आहे. “सीओपीडी’सह जगणाऱ्या महिलांना अधिक अडचणी येतात, इतर आजार तुलनेने अधिक गंभीर स्वरूप धारण करतात आणि त्यांच्यासाठी अधिक आरोग्यसेवा संसाधने वापरली जातात. “सीओपीडी’च्या महिला रुग्णांमध्ये “सीओपीडी’ला जोडून येणाऱ्या ताणतणाव आणि नैराश्‍यासारख्या विकारांचे प्राबल्यही अधिक असते.

एका अभ्यासानुसार, “सीओपीडी’मुळे कमी होणाऱ्या आयुर्मानातील 36.6 टक्के घट ही परिसरातील वायू प्रदूषणामुळे 25.8 टक्के घट ही घरातील वायू प्रदूषणामुळे तर 21 टक्के घट ही धूम्रपानामुळे होत असण्याची शक्‍यता आहे.

“सीओपीडी’ गटातील आजार अपरिवर्तनीय आहेत व अशा आजारांमुळे फुफ्फुसांची होणारी क्षती दुरुस्त होऊ शकत नाही. असे असले तरीही या आजारांचे वेळत निदान झाल्यास फुफ्फुसांचे आणखी नुकसान टाळण्यास मदत होऊ शकते व औषधोपचार आणि जीवनशैलीतील काही बदलांमुळे रुग्ण एक सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो. कफ प्रदीर्घ काळासाठी बरा होत नसल्यास फुफ्फुसतज्ज्ञांना सल्ला घ्यायला हवा आणि परिस्थिती आणखी बिघडण्याआधी प्रभावी औषधोपचार सुरू करायला हवेत, असा सल्ला या संदर्भातील तज्ज्ञांनी दिला आहे.

“सीओपीडी’ म्हणजे काय?
क्रॉनिक ऑब्स्ट्रक्‍टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) या गटामध्ये एम्फिसेमा, गंभीर ब्रॉन्कायटिस व रिफ्रॅक्‍टरी (असाध्य) अस्थमा अशा उत्तरोत्तर अधिक गंभीर रूप धारण करणाऱ्या फुफ्फुसांच्या आजारांचा समावेश होतो ज्यामुळे श्‍वास घ्यायला त्रास होतो आणि आजाराची स्थिती अधिकाधिक चिंताजनक होत जाते. अत्यंत गंभीर स्वरूपाचा कोरडा किंवा कफासह येणारा खोकला, धाप लागणे किंवा छातीची घरघर ऐकू येणे अशा “सीओपीडी’च्या लक्षणांमुळे बरेचदा हा अस्थमा किंवा श्‍वसनसंस्थेच्या इतर एखादा आजार असल्याचा गैरसमज होऊ शकतो. म्हणूनच बऱ्याचदा या आजाराचे योग्य निदान होत नाही, परिणामी जीवनमान अधिकच खालावते. हा आजार दिवसेंदिवस बळावत जाणारा असून केवळ परिणामकारक उपचारांच्या मदतीनेच तो सांभाळता येतो.

असे राहता येईल “सीओपीडी’पासून बचाव
– तोंडावर मास्क लावून वायूप्रदूषणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
– अप्रत्यक्ष धूम्रपानापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
– जैविक इंधनामुळे निर्माण होणाऱ्या विषारी घटकांपासून सावध रहा.
– आपल्या कुटुंबातील आजारांचा पूर्वेतिहास जाणून घ्या.

श्‍वसनसंस्थेशी संबंधित दुखणी घेऊन माझ्याकडे येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 40 टक्‍के रुग्णांना “सीओपीडी’ची लागण झालेली असते आणि त्यातील 50 टक्‍के रुग्ण स्त्रिया असतात. यापैकी साधारणपणे 75 टक्‍के रुग्ण धुम्रपान न करणारे असतात. जुना बरा झालेला क्षयरोग, घरातील वायूप्रदूषण, कामाच्या स्वरूपामुळे घातक गोष्टींशी येणारा संपर्क, ब्रॉन्कायटीस आणि दीर्घकाळापासून सतावणारा व योग्यरित्या नियंत्रित न केलेला अस्थमा अशा इतर काही कारणांमुळे “क्रॉनिक ऑब्स्ट्रक्‍टिव्ह रेस्पिरेटरी’ आजारांची लक्षणे दिसू लागतात.
– डॉ. नितीन अभ्यंकर, चेस्ट फिजिशियन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)