सावधान….येथे थुंकण्यास मनाई आहे!

अभियानाचे पुणेकरांकडून स्वागत, पण पुरस्कारासाठी मोहीम नको

– सुनील राऊत

पुणे – विविध विषयांवरून नेहमीच चर्चेचा विषय ठरणारी पुणे महापालिका गेल्या आठवड्यापासून एका वेगळ्याच कारणामुळे देशभर चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे, शहरात रस्त्यावर थुंकणाऱ्या आणि कचरा टाकणाऱ्यांवर प्रशासनाने सुरू केलेली दंडात्मक आणि त्यांच्याकडूच स्वच्छता करून घेण्याची सुरू केलेली अभिनव कारवाई हे आहे.

पुण्यातील स्वच्छतेच्या मोहितेची दखल देशभरातील माध्यमांनी घेतली असून पुणेकरांनीदेखील या कारवाईचे स्वागत केले आहे. मात्र, त्याच वेळी ही कारवाई केवळ स्वच्छ भारत अभियानाचे पुरस्कार मिळविण्यापुरती मर्यादित न राहता वर्षभर व्हावी, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.

गेल्या काही वर्षांत मोठ्या शहरांतील सार्वजनिक स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन समस्या गंभीर बनली आहे. यावर तोडग्यासाठी तेथील स्थानिक स्वराज्य संस्था कोट्यवधींचा निधी खर्च करतात. तरीही, या संस्थांना नागरी सहभागाची मदत मिळणे आवश्‍यक आहे. यात केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान स्पर्धा आयोजित केली आहे. पाठोपाठ राज्य शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) सुरूवात केले आहे. गेल्या दहा वर्षांत पुण्याची कचरासमस्या थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचल्याने शासनाकडून शहराच्या स्वच्छतेबाबत विशेष लक्ष दिले जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून जानेवारीत होणाऱ्या “स्वच्छ सर्वेक्षण’ स्पर्धेत देशातील पहिल्या 10 शहरांमध्ये येण्यासाठी महापालिकेची दरवर्षीच धडपड सुरू असते. त्यातून असे नवे उपक्रम सुरू केले जातात. यावर्षीही स्पर्धेसाठीचे स्वच्छ सर्वेक्षण जाहीर होताच, देशातील पहिल्या पाचमध्ये पुण्याचे नाव आणण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असून स्पर्धेचे निकष पूर्ण करणे तसेच शहर स्वच्छतेसाठी पालिकेचे अधिकारी भल्या पहाटे फिरताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे, लघुशंका तसेच उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. त्याचेही स्वागत होत आहे. मात्र, त्याच वेळी ही कारवाई दरवर्षी सर्वेक्षण आणि पुरस्कार मिळविण्यापुरतीच का होते, असा प्रश्‍नही सुजान पुणेकरांना सतावत आहेत.

पुणेकरांची माफक अपेक्षा
शहरातील सरकारी कार्यालये, प्रमुख रस्त्यांचे चौक, दुभाजक थुंकणारे आणि कचरा टाकणाऱ्यांमुळे दररोज अस्वच्छ असतात, त्यांच्यावर नियमित कारवाई झाल्यास या प्रकारांना आळा बसणार आहे. यासाठी यंत्रणा अपुरी असली, तरीही पोलीस, नागरिक आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांची मदत घेऊन हे प्रकार थांबविणे महापालिकेस सहज शक्‍य आहे. तरच शहर स्वच्छतेला हातभार लागणार आहे. मात्र, नवीन उपक्रम सुरू करायचा आणि त्यावर कौतुक करून घेत दिल्ली दरबारी पुरस्कार मिळवायचा आणि नंतर हे उपक्रम गुंडाळून ठेवायचे हे महापालिकेस गेल्या काही वर्षांत नवीन नाही. त्यामुळे किमान शहर स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यास हातभार लावणारे हे उपक्रम वर्षभर असावेत, हीच सर्वसामान्य पुणेकरांची अपेक्षा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)