सावधान! पर्यटन बेततेय जिवावर

पिंपरी – पर्यटन हे आनंद देणारे असते. रोजच्या धकाधकाचीच्या आयुष्यात आराम मिळावा यासाठी बरेच जण पर्यटनाला जातात. वर्षा विहारासाठी तर पर्यटकांचा ओघ वाढतो. मात्र या काळात दारुच्या नशेत, “सेल्फी’च्या धुंदीत अनेक अपघातात पर्यटक आपला जीव गमावत आहेत. छोट्या-छोट्या चुकींमधून अनेकांचा बळी गेल्याच्या घटना मागील तीन-चार वर्षात वाढल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वीच कुंडमळा येथे “सेल्फी’च्या नादात तीन बहिणी पाण्यात बुडाल्या होत्या. त्यातील दोघींना वाचवण्यात यश आले तर एकजण वाहून गेली. यापूर्वीही कुंडमळ्यात असे अपघात झाले आहेत. लोणावळा येथे ही भुशी धरणातही चालू वर्षात चार तरुणांनी जीव गमावला आहे. यावेळी स्थानिक पोलीस यंत्रणा असते, मात्र तरुणाईच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाला आवर घालणे त्यांनाही शक्‍य नसते. अशावेळी पर्यटकांनाही काळजी घेणे गरजेचे असते.

पर्यटन स्थळावर पर्यटकांना दारू, हुक्का अशा गोष्टी सहजगत्या उपलब्ध होतात. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी संबंधीत विक्रेत्यावर कारवाई करणे, तसेच पर्यटनस्थळी नशा करुन हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवरही कडक कारवाई करणे गरजेचे आहे. कारण बऱ्याचवेळा याचा इतर पर्यटकांना व स्थानिक नागरिकांनाही त्रास होतो. स्थानिक प्रशासना बरोबर पर्यटकांनाही काही काळजी घेणे गरजेचे आहे. दारु पिऊन हुल्ल्डबाजी करु नये. लोणावळा किंवा बऱ्याच गड किल्ल्यावर तरुण वर्ग दारु पिऊन धिंगाणा घालताना दिसतो. लोणावळा परिसरात तर हुक्का पार्लर खुले आमपणे सुरु असतात. याच धुंदीत अनेक अपघात होत आहेत.

समुद्र किनारी खोल पाण्यात जाणे टाळावे तसेच समुद्र किनारी जात असाल तर तेथील स्थानिक हवामानाची आधी माहिती घ्यावी, भरती ओहोटीचीही स्थानिकांकडून वेळ माहिती करुन घ्यावी तरच पाण्यात उतरावे. बऱ्याच वेळा मुले महाविद्यालयातून परस्पर फिरण्यासाठी जातात. अशा वेळी किमान आपल्या पालकांना त्याची कल्पना द्यावी जेणेकरुन तुम्ही कुठल्या संकटात सापडलात तर ते तुम्हाला मदत करु शकतील. त्यामुळे पर्यटनाला जाताना जरा जपून कारण पर्यटनस्थळे पाहण्याचा आनंद अबाधित राहावा त्याच रुपांतर दुःखात होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपल्या जिवीताची काळजी घेणे गरजेचे असते.

काय घ्यावी काळजी?
– पर्यटकांनी खोल पाण्यात, डोंगराच्या कडेला जाणे टाळावे
– सुरक्षिततेची साधने सोबत असावीत
– आपला कोणताही मित्र नातेवाईक संकटात सापडला असेल तर त्वरीत बचाव यंत्रणेला संपर्क साधावा
– यासाठी संबंधीत ठिकाणच्या बचाव यंत्रणेचा संपर्क क्रमांक आधीच स्वतःजवळ ठेवावा
– स्थानिक पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे
– दरी किंवा खोल पाण्याच्या अगदी जवळ जाऊन “सेल्फी’ काढू नये
– पाय घसरून पडण्याची शक्‍यता असल्याने चिखल, शेवाळच्या ठिकाणी जावू नये
– जंगलात किंवा ट्रेकिंगला जाताना एकटे जाणे टाळा

धोकादायक ठिकाणी घेतल्या जाणाऱ्या “सेल्फी’मुळे अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी “सेल्फी’चा मोह टाळावा. खोल पाण्यामध्ये धोकादायक ठिकाणी जाऊ नये. पाण्याच्या प्रवाहापासून लांब रहावे. पर्यटन स्थळी शनिवार व रविवारी जादा पोलीस बंदोबस्त दिला जाईल.
-अरविंद हिंगोले, पोलीस उपनिरीक्षक, तळेगाव दाभाडे एमआयडीसी.

कुंडमळा पर्यटन स्थळ वर्षा विहाराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांसाठी उत्तम स्थळ आहे. स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन नैसर्गिक सौंदर्याचा आनंद नवख्या पर्यटकांनी घ्यावा. शासनाने या ठिकाणी काही शासकीय निरीक्षक नेमावे.नाहीतर स्थानिक तरुणांना मानधन देऊन निरीक्षक म्हणून काम द्यावे. तरच दुर्घटना कमी होतील.
– सागर भेगडे, स्थानिक रहिवासी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)