सावकाराच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या

शिक्रापूर- सावकाराच्या त्रासाला कंटाळून धानोरे (ता. शिरूर) येथे अशोक ज्ञानोबा सस्ते (वय 54, वर्षे रा. पांढरेवस्ती धानोरे ता. शिरुर, जि. पुणे मूळ राहणार साकुर्डे, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याबाबत मयत अशोक यांचा मुलगा हेमंत अशोक सस्ते (वय 24) याने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सूर्यकांत आक्षिराम निंबाळकर (रा. वांगदरी, ता. श्रिगोंदा, जि. अहमदनगर) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादीनुसार, मयत अशोक यांच मुलगा हेमंत याने त्याचे मित्र अभिजीत जेधे यांचे मध्यस्तीने सूर्यकांत निंबाळकर यांच्याकडून सप्टेंबर 2017 मध्ये व्याजाने 11 लाख रुपये घेतले होते. पैसे घेत असताना निंबाळकर यांनी हेमंत सस्ते यास मी पैसे देतो परंतु मला काहितरी लिहून द्यावे लागेल, असे सांगितले. त्यावेळी हेमंत याने माझ्या नावावर धानोरे येथे जमीन असून ती मी लिहून देऊ शकतो, असे सांगितले. त्यानंतर निंबाळकर याने सस्ते याच्या नावावर असलेली जमीन तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे साठेखत करुन घेतली. तेव्हा सस्ते याने त्याची बहिण रुग्णालयात असल्यामुळे घाईगडबडीत त्यावर सह्या केल्या. त्यानंतर निंबाळकर याने एक सही राहिली आहे, असे सस्ते यास सांगितले. तेव्हा आता कसली सही? असे सस्ते याने विचारले. तेव्हा दस्ताची एक सही राहिली आहे, असे म्हणून एक सही करुन घेतली. त्यानंतर सस्ते याने दस्ताची एक प्रत मागितली असता नंतर देतो, असे म्हणून टाळाटाळ केली.
त्यांनतर हेमंत सस्ते यास त्यांनी पाच रुपये टक्कने व्याज आणि खर्चाची रक्कम वजा करून 10 लाख 41 हजार रुपये दिले. त्यानंतर हेमंत याने ही बाब त्याच्या आई- वडिलांना सांगितली. त्यांनतर हेमंत आणि त्याच्या आई-वडिलांनी वेळोवेळी निंबाळकर यास व्याजाचे पैशे देऊ केले. तसेच एकदा 5 लाख आणि एकदा 2 लाख रुपये निंबाळकर यांचे खात्यावर पाठविले. काही दिवसांनी आमची किती रक्कम राहिली आहे? असे विचारले असता तुमची आत्तापर्यंत आलेली रक्कम व्याजात गेली असून मुद्दल बाकी आहे, असे निंबाळकर याने सांगितले. तेव्हा सस्ते हे त्यांना समजावून सांगत असताना निंबाळकर याने त्यांना शिवीगाळ, दमदाटी करत “तुमची जमीन विकून टाकीन’, अशी धमकी दिली. त्यानंतर पुन्हा निंबाळकर याने फोन करून अशोक सस्ते यांना “तुम्ही पैसे द्या, नाहीतर तुमच्या मुलाच्या नावावर असलेली जमीन आम्ही साठेखत केली आहे. त्याचे कुलमुखत्यार करून घेतले आहे. “आम्ही जमीन विकून टाकू’ अशी धमकी दिली. त्यांनतर रात्रीच्या सुमारास अशोक सस्ते यांनी विषारी औषध घेतले. त्यावेळी हेमंतच्या आईने आरडाओरडा केल्याने शेजाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले तेव्हा रुग्णालयात जात असताना अशोक सस्ते यांनी सूर्यकांत निंबाळकर हे व्याजाच्या पैशाच्या कारणावरून देत असलेल्या त्रासातून मी औषध घेतल्याचे सांगितले. त्यांनतर त्यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी सूर्यकांत आक्षिराम निंबाळकर याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत तसेच सावकारीबाबत गुन्हे दाखल केले आहेत. याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)