सावकाराच्या त्रासाने आत्महत्येचा प्रयत्न

कराड, दि. 3 (प्रतिनिधी) –खासगी सावकाराच्या दमदाटीला कंटाळून एकाने वेगवेगळ्या प्रकारच्या औषधाच्या चार-पाच गोळ्यांसह दोन बाटल्या तापाचे व पित्ताचे औषध प्राशन केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी एका खासगी सावकारावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अब्दुल दस्तगीर मुजावर (वर 36 रा. व्यंकटेश प्लाझा, मलकापूर, ता. कराड), असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव असून त्यांच्या फिर्यादीवरून आसिफ मुलाणी (रा. मुजावर कॉलनी, कराड) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अब्दुल मुजावर हा मलकापूर येथे कुटूंबासह राहतो. त्याच्यासह त्याचे वडिल, भाऊ हे गॅरेज चालवतात. जुन्या कार खरेदी-विक्रीचा व्यवसायही अब्दुल करतो. दोन वर्षापुर्वी त्याची मुजावर कॉलनी येथील आसिफ मुलाणी याच्याशी ओळख झाली. ओळखीतून सन 2017 मध्ये अब्दुल मुजावर याने 1 लाख रूपये मुलाणी याच्याकडून व्याजाने घेतले होते. मुलाणी याने त्यावेळी कोऱ्या स्टॅम्पवर अब्दुल मुजावर याच्या सह्या घेतल्या होत्या. त्यानंतर जानेवारी 2018 मध्ये अब्दुल मुजावर यांनी मुलाणीला 70 हजार रूपये दिले. मात्र 70 हजार रूपये व्याजात जमा करतो, असे म्हणून मुलाणी पुन्हा अब्दुलकडे 1 लाख रूपयांची मागणी करू लागला. पैशासाठी वारंवार फोन करून धमक्‍या देऊ लागला. त्याच्या तगाद्याला कंटाळून अब्दुल मुजावर यांनी कराड सोडून बेळगावात कार चालविली. पाहुण्यांकडून व कार चालवून 40 हजार रूपये एका महिन्यात जमवले. ते पैसे घेऊन अब्दुल मुजावर कराडला आले. त्यांनी 40 हजार रूपये मुलाणीला दिले. मात्र, तरीही मुलाणी हा प्रत्यक्ष भेटून व फोनवरून 1 लाख रूपयांसाठी धमक्‍या देत होता. त्याच्या धमक्‍यांमुळे तणावाखाली येऊन अब्दुल मुजावर यांनी 1 आक्‍टोंबर रोजी घरात तापावरच्या व पित्तावरच्या चार गोळ्या, दोन औषधाच्या बाटल्यांमधील औषध एकदम प्राशन केले. त्यामुळे त्यांना चक्कर आली. तातडीने त्यांना वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी मुजावर याची विचारपुस करून खासगी सावकारी कलमांतर्गत संशयीत आसिफ मुलाणी याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना दिल्या. या गुन्ह्याचा तपास गायकवाड करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)