सार्वत्रिक निवडणुकांसाठी कॉंग्रेसची तयारी 

अविनाश कोल्हे 

कॉंग्रेसच्या महाअधिवेशनात पक्षाध्यक्ष राहुल गांधींनी भाजप सरकारवर कडक टीका करत, “हे सरकार देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा’ आरोप केला तर सोनिया गांधींनी मोदी सरकार हुकूमशहासारखे कारभार करत असल्याचा आरोप केला. या महाअधिवेशनात कॉंग्रेसमधील तरुण नेत्यांना लक्षणीय महत्त्व मिळाले. हे सर्व बदल 2019 साली होणार असलेल्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर केले जात आहेत.

उत्तर प्रदेशात झालेल्या लोकसभेच्या दोन पोटनिवडणुकांत भाजपाचा झालेला पराभव व बिहारमधील लोकसभेच्या एका पोटनिवडणुकीत झालेला राजदचा विजय या पार्श्‍वभूमीवर दिल्लीतल्या कॉंग्रेस पक्षाच्या 84 व्या महाअविधेशनातील वक्‍त्यांच्या भाषणांचा सूर चढा असेल, अशी अपेक्षा होतीच. राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष झाल्यापासून हे पहिलेच महाअधिवेशन. तेव्हा स्वाभाविकपणे सर्व नजरा त्यांच्यावर खिळलेल्या होत्याच.

अलीकडच्या काळातील सततच्या पराभवांपासून कॉंग्रेस पक्ष बरेच काही शिकलेला दिसत आहे. आता सोनिया गांधींनी पुढाकार घेऊन समविचारी पक्षांची आघाडी करण्यासाठी खास प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी भाजपाविरोधी पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांसाठी खाना आयोजित केला होता. या खान्याला सुमारे 19 पक्षांचे नेते उपस्थित होते. याच सोनिया गांधींनी 1998 साली जेव्हा वाजपेयींच्या नेतृत्वाखाली जवळजवळ डझनभर पक्षांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेवर आली होती, तेव्हा वाजपेयी सरकारची “खिचडी सरकार’ म्हणून संभावना केली होती. आता त्याच सोनिया गांधी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या विरोधात आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नांत आहेत.

कालपरवापर्यंत आपल्या राजकीय जीवनात एका बाजुला भाजपाप्रणीत “रालोआ’ दुसरीकडे कॉंग्रेसप्रणीत “संपुआ’ व मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली “डावी आघाडी’ अशा तीन आघाडया अस्तित्वात होत्या. ममता बॅनर्जींनी पश्‍चिम बंगालमध्ये डावी आघाडी नामशेष केली तर भाजपाने त्रिपुरात डाव्या आघाडीचा गड जिंकला. राहता राहिला केरळ जेथे माकपप्रणित डावी आघाडी व कॉंग्रेसप्रणित संयुक्‍त आघाडी सतत एकमेकांसमोर उभे असतात. म्हणजेच सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत “रालोआ” व “संपुआ’ या दोनच आघाड्या शर्यतीत असतील.

याचा अंदाज आल्यापासून कॉंग्रेसचे “चाणक्‍य’ कामाला लागलेले आहेत. सोनिया गांधींनी नवी दिल्लीत दिलेले जेवण त्याचाच एक भाग आहे. सतत अनेक पराभव चाखावे लागलेली कॉंग्र्रेस आता जमिनीवर चालत आहे. परिणामी संपुआ लवकर आकार घेईल, असा अंदाज सहज करता येतो. सन 2004 मध्ये कॉंग्रेसने लोकसभा निवडणूकांचे निकाला लागल्यानंतर समविचारी पक्षांना बरोबर घेऊन “संयुक्‍त पुरोगामी आघाडी’ स्थापन केली होती. आता तर कॉंग्रेस निवडणूकपूर्व समझोत्यांच्या दिशेने सरकत आहे. हे खचितच आश्‍वासक आहे व मित्रपक्षांचा विश्‍वास जिंकण्यास गरजेचे आहे.

कॉंग्रेससाठी बिहारमध्ये लालूप्रसादांचा पक्ष, जीतनराम मांझी यांचा पक्ष यांच्याशी समझोता; उत्तर प्रदेशात सपा/बसपा आघाडीशी जागावाटपाबद्दल चर्चा शक्‍य आहे. या दोन्ही राज्यांत कॉंग्रेस एवढी गलितगात्र आहे की, तेथे फारशी अडचण येणार नाही. महाराष्ट्रात शिवसेनेने एकटे लढण्याची घोषणा केल्यापासून बिगर-भाजपा आघाडीची दबक्‍या आवाजात चर्चा सुरू आहे. अलीकडेच राज ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली, तीही घटना या संदर्भात सूचक आहे.
दक्षिण भारताचा विचार केल्या आंध्र प्रदेशात कॉंग्रेसची बरी ताकद आहे. तेथे तेलगू देशम व वायएसआर कॉंग्रेस हे दोन स्थानिक पक्ष आहेत. नायडूंनी “रालोआ’ला सोडचिठ्ठी दिली असल्यामुळे आता भाजपा येनकेन प्रकारे वायएसआर कॉंग्रेसशी युती करण्याचे प्रयत्न करेल. त्यामुळे तेथे तिरंगी सामने होण्याची शक्‍यता आहे. असे होऊ नये म्हणून कॉंग्रेस तेलगू देशमशी जागा वाटपांबद्दल चर्चा करू शकतो व भाजपाविरोधी मते फुटणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल.

तामिळनाडूचे राजकीय चित्र अजूनही धुसरच आहे. तेथे आता चार प्रादेशिक पक्ष रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीपर्यंत कोण कोणाशी समझोता करतो हे दिसून येईलच. अभिनेते कमल हसन यांचा पक्ष कॉंग्रेसशी युती करू शकतो. पण प्रत्यक्षात याचा किती फायदा होईल, हे आज सांगता येणार नाही. कर्नाटकात विधानसभा निवडणूक अगदी उंबरठ्यावर आहेत. त्यानंतरच त्या राज्याबद्दल अंदाज बांधता येईल. भाजपाच्या दृष्टीने कर्नाटक राज्य महत्त्वाचे आहे. याचे कारण दक्षिण भारतातील हे पहिले राज्य आहे, जेथे भाजपा एकदा सत्तेत आला होता. आता पुन्हा भाजपा तेथे आक्रमक होत आहे. तेथेसुद्धा कॉंग्र्रेस व जनता दल (सेक्‍युलर) यांच्यात समझोता होऊ शकतो.

आघाडीचा विचार केल्यास आज भाजपाची स्थिती नाजुक आहे. जानेवारी 2018 मध्ये आधी शिवसेनेने “एकला चालो रे’ ची हाक दिली तर चंद्राबाबू नायडू यांनी “रालोआ’ची साथ सोडली च, शिवाय त्यांनी मोदी सरकारविरोधात अविश्‍वासाचा ठराव दाखल केला आहे. आज लोकसभेतील संख्याबळ लक्षात घेता मोदी सरकारला कसलाच धोका नसला, तरी अविश्‍वासाच्या ठरावानिमित्ताने विरोधी पक्षांना सरकारला धारेवर धरता येते. विरोधी पक्षांत आज भाजपाविरोध ओतप्रोत भरला आहे. म्हणूनच उत्तर प्रदेशात गेली 25 वर्षं एकमेकांची तोंडंसुद्धा न बघितलेल्या सपा व बसपाने दोन पोटनिवडणुकासाठी युती केली होती. या युतीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा अनेक वर्षांचा मतदारसंघ गोरखपूरमध्ये भाजपा उमेदवाराचा दारूण पराभव केलेला आहे. तसेच उपमुख्यमंत्री मौर्य यांच्या

फुलपूर मतदारसंघातही भाजपा उमेदवाराला पराभूत व्हावे लागले. त्या भागात भाजपातून बाहेर जाणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत आहे. या दोन पोटनिवडणुकांचे निकाल लागल्यानंतर, मौर्य यांचे जावई नवलकिशोर साक्‍य, यांनी भाजपाला रामराम ठोकत सपात प्रवेश केला आहे. मागच्याच महिन्यांत मौर्य यांचा पुतण्या प्रमोद मौर्य यांनी सपात प्रवेश केलेला आहे. या दोन्ही पोटनिवडणुकांतील पराभवांमुळे भाजपातील अंतर्गत विसंगती चव्हाट्यावर येत आहेत. यातही काही ज्येष्ठ नेते योगी आदित्यनाथ यांच्यावर थेट टीका करत आहेत. माजी खासदार रमाकांत यादव यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, एका पूजापाठ करणाऱ्या संन्याशाला मुख्यमंत्री करून ठेवले. हे काम त्यांना झेपत नाही.’ भाजपाचे कैसरगंजचे खासदार ब्रिजभूषण चरणसिंह म्हणाले की, या दोन ठिकाणी भाजपाचा पराभव झाला म्हणून भाजपाच्याच अनेक कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

या सर्व घटनांची भाजपाला दखल घ्यावी लागेल व कठोर आत्मपरिक्षण करून कार्यकर्ते कसे सांभाळावे लागतील. आघाडी धर्म कसा पाळता येईल व मित्र पक्षांना कसे सांभाळता येईल याबद्दल काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागणार आहेत. अलीकडेच महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जळगाव येथे बोलताना म्हणाले की, “भाजपा स्वबळावर सत्ता आणणार आहे. आम्हाला शिवसेनेबरोबरच्या युतीची गरज भासणार नाही.’ अशी भाषणं करण्याची तशी गरज नाही. मात्र, शिवसेनेच्या संजय राऊत यांनी “तेलगू देशमने मांडलेल्या अविश्‍वासाच्या ठरावाबरोबर आम्ही नाही,’ असे स्पष्ट केलेले आहे. अशा स्थितीत सेनेला गोंजारणे आवश्‍यक नाही का?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)