सार्वजनिक शौचालय युनिटनी कात टाकली

हेळगाव ग्रामपंचायतीचे स्वच्छतेसाठी पुढचे पाऊल
विक्रम कुंभार

हेळगांव – महाराष्ट्रात निर्मल जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख आहे. पहिल्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी ग्रामपंचायत ते जिल्हा परिषदेपर्यंत सर्वच घटकांनी प्रयत्न केले. स्वच्छ गाव सुंदर गाव ही संकल्पना राबवत कराड तालुक्‍यातील हेळगाव या गावाने पुन्हा एकदा कंबर कसली असून गावातील सार्वजनिक शौचालयांच्या युनीटला रंगरंगोटी करुन बंद अवस्थेतील युनीटे पुन्हा एखदा वापरात आणली आहेत.

हेळगाव हे गाव सुमारे 3 हजार लोकवस्तीचे गाव असून याठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकास योजना राबविण्यात आल्या आहेत. दहा वर्षापूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यशवंत ग्रामसमृध्दी योजनेअंतर्गत दहा टक्के ग्रामपंचायत व नव्वद टक्के शासन अशा निधीतून याठिकाणी 5 ते 6 सार्वजनीक शौचालयांची युनीटे उभारण्यात आली. तर वैयक्तिक स्वरुपाची 80 टक्‍के शौचालये आजमितीस लोकांच्या वापरात आहेत. यापूर्वी या ग्रामपंचायतीवर केवल उंडाळकर गटाची सत्ता होती. याकाळात सार्वजनीक शौचालयांच्या युनीटकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्षामुळे बौध्दवस्ती व धनगरवस्ती याठिकाणच्या युनीटची दुरावस्था झाली होती. या युनीटच्या भोवताली झाडे-झुडफे वाढल्याने ती वापराविना बंद अवस्थेत होती.

सध्या या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी व राष्ट्रीय कॉंग्रेसची सत्ता आहे. सरपंच शारदा जाधव, उपसरपंच संजय सूर्यवंशी यांनी आपल्या सदस्य सहकाऱ्यांच्या मदतीने स्वच्छ गावासाठी पुन्हा एखदा पुढाकार घेत गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. याला ग्रामस्थांमधूनही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. 26 जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत सार्वजनिक शौचालय युनीट दुरुस्तीची संबंधित वस्तीतील लोकांनी मागणी केली होती. याची तातडीने दखल घेत ग्रामपंचायतीने बंद अवस्थेत असलेली बौध्दवस्ती व धनगरवस्ती मधील शौचालयाची युनीटांची साफसफाई करीत रंगरंगोटी करण्यात आली. तसेच या युनीटना ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठ्यातून नळ कनेक्‍शन बसविण्यात आल्याने या दोन्ही वस्तीतील लोकांची चांगली सोय झाली आहे. कुठलीही तक्रार ग्रामपंचायतमध्ये आली की त्याचे तात्काळ निवारण करण्यात येते. परंतु लोकांनी सुद्धा सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण केले पाहिजे, असे उपसरपंच संजय सूर्यवंशी यांनी सांगीतले.

सार्वजनिक शौचालय युनिटनी कात टाकली
लोकांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीने सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती केलेली आहे. लोकांनी सुद्धा याचा वापर चांगल्या पद्धतीने करावा आणि त्याची स्वच्छता ठेवून ग्रामपंचायत प्रशासनास सहकार्य करावे.
सौ. शारदा जाधव, सरपंच

ग्रामपंचायतीने आमच्या मागणीप्रमाणे बंद असलेली शौचालयांची युनीट सुरू केली आहेत. रंगरंगोटी करून ती सर्व सोयीनियुक्त लोकांसाठी वापरास खुली केली आहेत. यामुळे यापुढे या वस्तीतील कोणीही उघड्यावर जाणार नाही.
समीर डांगे, ग्रामस्थ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)