मुंबई – विविध सार्वजनिक बॅंकांच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी दोन दिवसीय देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे. हा संप झाल्यास 30 आणि 31 मे यादिवशी बहुतांश सार्वजनिक बॅंकांचे कामकाज ठप्प होण्याची शक्‍यता आहे.

बॅंक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रस्तावित वेतनवाढीसाठीची बैठक 5 मे यादिवशी झाली. त्या बैठकीत इंडियन बॅंक्‍स्‌ असोसिएशनने (आयबीए) 2 टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव दिला. ही वाढ नगण्य असल्याचे म्हणत युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सने (यूएफबीयू) निषेध म्हणून संपाचा इशारा दिला आहे.

बुडित कर्जांसाठी (एनपीए) करण्यात आलेल्या तरतुदींमुळे बॅंकांना तोटा सहन करावा लागला. त्यासाठी बॅंक कर्मचारी आणि अधिकारी जबाबदार नाहीत. जन-धन, नोटाबंदी, मुद्रा, अटल पेन्शन योजना यांसारख्या सरकारी पाऊलांची अंमलबजावणी करण्यासाठी बॅंक कर्मचाऱ्यांनी मागील दोन-तीन वर्षे अथक परिश्रम केले. त्यामुळे बॅंक कर्मचाऱ्यांच्या कामाचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढला, असे यूएफबीयूने म्हटले आहे. यूएफबीयूमध्ये नऊ संघटनांचा समावेश आहे.

याआधी बॅंक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना 1 नोव्हेंबर 2012 ते 31 ऑक्‍टोबर 2017 या कालावधीसाठी 15 टक्के वेतनवाढ देण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)