सार्वजनिक गणेशोत्सव सण का इव्हेंट ?

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात करुन आता शतकोत्तर रौप्य महोत्सवाचा टप्पा आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव राज्यातच नव्हे तर देशांत उत्साहात साजरा केला जातो. दहा दिवस सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. परंतू, अलिकडच्या काळात उत्सवाचे स्वरुप बदलू लागले आहे. लोकमान्यांनी ज्या उद्देशाने हा उत्सव सुरु केला, तो उद्देशच आता हरपला आहे. इतकेच काय पण या सणाचे पावित्र्य देखील आता कमी होऊ लागले आहे. आज गणेशोत्सव सण न राहता इव्हेंट बनला आहे. उंचच उंच गणेशमूर्तीची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. या मूर्ती इतक्या उंच असतात की गणेशमूर्तीची पूजा करताना अक्षरशः मूर्तीवर चढावे लागते मग ती मूर्तीची विटंबना नव्हे काय?

शास्त्रामध्ये शाडूच्या मातीपासून गणेशाची मूर्ती बनवावी, असे सांगितले आहे. असे असतानाही प्लास्टर ऑफ पॅरिस पासून मूर्ती बनवल्या जातात. या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने पाण्याचे प्रदूषण होते. उंचच उंच गणेशमूर्तीचे अवडंबर न माजवता पर्यावरणपूरक मूर्तीची खरेदी करुन तिची प्राणप्रतिष्ठा करावी.

उत्सवाच्या नावाखाली वर्गणी वसूल केली जाते. प्रसंगी खंडणी वसूल केली जाते. वर्गणीसाठी कोणावरही जबरदस्ती न करता भाविक जी वर्गणी स्व-खुशीने देतील तितकीच वर्गणी मंडळांनी स्वीकारावी. काही ठिकाणी जागरणाच्या नावाखाली मंडपातच रात्रभर जुगार खेळला जातो. त्या जुगारातीलच काही पैसा गणेशोत्सवासाठी वापरला जातो. जुगारातील पैसा गणेशोत्सवासारख्या पवित्र सणासाठी वापरणे कितपत योग्य आहे ? याचा विचार मंडळांनी करावा. काही महाभाग जुगार खेळतानाच मद्यपान व धूम्रपान देखील करतात. अनेक ठिकाणी कर्णकर्कश आवाजात डीजे लावून त्यावर हिडीस नृत्य केले जाते. काही ठिकाणी मंडळातील कार्यकर्त्यांमध्येच भांडणे होतात. त्यावेळी एकमेकांवर अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली जाते. त्यामुळे गणेशोत्सवाचे पावित्र्य नष्ट होते. याची दखल सार्वजनिक गणेश मंडळांनी घ्यायला हवी. गणेशोत्सवाचे हे स्वरुप बदलायला हवे. त्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनीच प्रयत्न करायला पाहिजेत.

गणपती ही बुद्धीची देवता आहे. तेव्हा विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता वाढीस लागेल, असे उपक्रम मंडळांनी राबवायला हवेत. मंडळांनी रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरांचे आयोजन करायला हवे. दुष्काळग्रस्त, पूरग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करायला हवी. गरीब मुलांचे शैक्षणिक पालकत्व मंडळांनी स्वीकारायला हवे. शाळेतील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायला हवे. तसेच वक्तृत्व निबंध स्पर्धांचे आयोजन करायला हवे. समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचे व्याख्यान आयोजित करायला हवेत. हा उत्सव जितका साधेपणाने आणि विधायक मार्गाने साजरा केला जाईल, तितके त्याचे पावित्र्य कायम राहील आणि भक्तांनाही त्याचा आनंद लुटता येईल.

– श्याम बसप्पा ठाणेदार (दौंड जिल्हा, पुणे)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)