सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात

मंडपांसह, स्वागत कमानी उभारणीसाठी लगबग
सातारा,  (प्रतिनिधी) – लाडक्‍या बाप्पाच्या आगमनासाठी आता तीनच दिवस बाकी राहिलेले असताना साताऱ्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मंडपांसह, स्वागत कमानी उभारणीसाठी लगबग सुरू झाली आहे.
साताऱ्याला गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याची मोठी परंपरा असून शहर व उपनगरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर आता ठिकठिकाणी मंडळांचे कार्यकर्ते मंडप उभारणीसाठी धावपळ करताना दिसून येत आहेत. आपल्याच मंडळाची गणेशमूर्ती मोठी असावी अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असल्याने मागील काही वर्षांपासून 10 फुटापेक्षा अधिक उंचीच्या मूर्ती बसविण्यात येत आहेत. त्याचबरोबर आकर्षक देखाव्यांचा देखील समावेश असल्याने आपसूकच मंडप देखील अधिक लांबी, रुंदी व उंचीचा उभारण्यात येत आहे.
शहरातील सम्राट गणेशोत्सव मंडळ, प्रतापसिंह गणेशोत्सव मंडळ, मंडईचा राजा गणेशोत्सव मंडळ, केसरकर पेठेतील बाल हनुमान गणेशोत्सव मंडळ, राजहंस गणेशोत्सव मंडळ, विजय गणेशोत्सव मंडळ, प्रकाश गणेशोत्सव मंडळ, व्यापारी गणेशोत्सव मंडळ, बालगोपाल गणेशोत्सव मंडळ, शिक्षक बॅंक, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा बॅंक, मारवाडी भुवन गणेशोत्सव मंडळ यासह विविध पेठांमधील मंडळांची मंडप उभारणीची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

मंडप व्यावसायिकांना अच्छे दिन
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपाची उभारणी काही वर्षांपूर्वीपर्यंत कार्यकर्ते करताना दिसून यायचे. त्यावेळी कार्यकर्ते हे खड्डे स्वतः खोदायचे, बांबू अथवा कळक तसेच पत्रे परिसरातील नागरिकांकडून घेतले जायचे. मंडपाचे कापड देखील कार्यकर्ते स्वतः बांधायचे. मात्र त्यानंतर मंडळांमधील स्पर्धा वाढल्याने मंडप उभारणीचे काम व्यावसायिकांना सोपविण्यात आले असून त्यामुळे मंडप व्यावसायिकांना अच्छे दिन आल्याचे दिसून येते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)