सायबर हल्ला रोखण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे

तज्ज्ञांनी व्यक्त केले मत : सायबर सिक्‍युरिटीविषयी जनजागृती

पुणे – सायबर सिक्‍युरिटी ही काळाची गरज आहे. विविध ई-मेल्स, इंटरनेटवरील अन्य व्यवहार, वापरकर्त्यांचा निष्काळजीपणा, सिस्टीम खुली राहाणे अशा अनेक कारणांमुळे “थ्रेट्‌स’ (व्हायरस) आपल्या सिस्टीममध्ये शिरकाव करतात. त्यामुळे सिस्टीमवर काम करीत असताना अशी काही समस्या निदर्शनास आल्यास त्यावर त्वरित तोडगा काढावा. अनेकदा एखादी गोष्ट तितकी महत्त्वाची वाटत नाही, परंतु नंतर याच गोष्टींमुळे सुरक्षा धोक्‍यात येऊ शकते. त्यामुळे सायबर हल्ला रोखण्यासाठी बॅंकेकडे कृती आराखडा असणे आवश्‍यक आहे. सायबर हल्ला होऊ नये, यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे, असे मत “सायबर सिक्‍युरीटीच्या समस्येला उत्तर” या परिसंवादातून व्यक्त करण्यात आले.

सायबर सिक्‍युरिटीविषयी जनजागृती करण्याकरीता पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्‍स असोसिएशनतर्फे सायबर सिक्‍युरिटी या विषयावरील परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी “सायबर सिक्‍युरीटीच्या समस्येला उत्तर” हा परिसंवाद झाला. यावेळी बॅंकिंग विषयक सल्लागार विक्रम पोंक्षे, एनएसईआयटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आनंद पाच्छापूर, अॅड. वैशाली भागवत, पोलीस निरीक्षक राजेश पाणवन, सायबर कायदा सल्लागार अॅड. राजेश पिंगळे यांनी सहभाग घेतला. पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्‍स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अॅड. भरत उर्फ साहेबराव टकले, मानद सचिव संगिता कांकरिया, संचालक निलेश ढमढेरे, अशोक शिलवंत, जगदीश कदम, प्रिया महिंद्रे, मंगला भोजने आदींनी परिषदेच्या आयोजनात सहभाग घेतला.

यावेळी पोंक्षे म्हणाले, बॅंकांवरील सायबर हल्ले रोखण्यासाठी ग्राहक जागरुकता आवश्‍यक आहे. तसेच ग्राहकांच्या विश्‍वासाला धक्‍का पोहोचणार नाही याकडे बॅंकांनी लक्ष द्यायला हवे. सावधानता बाळगून रोजच्या व्यवहारात सायबर समस्या आढळून आल्यास याकडे लक्ष द्यावे.

यावेळी पाच्छापूर म्हणाले, ज्याप्रमाणे आपण बंगल्यात चोर शिरण्याच्या जागा ओळखून त्याला रोखण्यासाठी आधीच उपाययोजना करतो. त्याप्रमाणे बॅंकांनी देखील आधीच सायबर हल्ल्यांना थोपवण्यासाठी योजना आखणे गरजेचे आहे.

अॅड. वैशाली भागवत म्हणाल्या, ज्या बॅंकांकडे अधिक पैसा असेल याकडे सायबर हल्ला करणाऱ्यांचे लक्ष असणारच. ते आधीपासूनच यावर योजना आखत असतात. त्यामुळे छोट्यातल्या छोट्या गोष्टींकडे सतत लक्ष देणे आवश्‍यक आहे.

पुणे जिल्ह्यातील 52 हून अधिक बॅंका आणि पुण्याबाहेरील 40 बॅंकांचे अध्यक्ष, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयटी विभाग प्रमुख व पदाधिकारी परिषदेत सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)