‘सायबर दरोड्या’ची एक वर्षांपासून सुरू होती तयारी

दिसेल त्या एटीएममधून काढले पैसे : काढणाऱ्यांना मिळाले कमिशन

पुणे – कॉसमॉस बॅंकेचा सर्व्हर हॅक करून 94 लाखांची रोकड लुटल्याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी भिवंडी आणि औरंगाबाद येथून दोघांना अटक केली. या दोघांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या आंतरराष्ट्रीय गुन्ह्याची तयारी तब्बल एक वर्षांपासून सुरू होती. इतकेच नव्हे तर डेटा चोरणारा व्यक्ती एकच असून त्याने हा डेटा कार्ड क्‍लोन करणाऱ्याला दिला होता. यानंतर या कटात तब्बल 28 देशांतील व्यक्तींना सहभागी करून घेण्यात आले होते. एटीएम सेंटरमधून पैसे काढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लमसम रक्कम कमिशन स्वरुपात देण्यात आली होती.

फहिम मेहफूज शेख (27, रा. नुरानी कॉम्प्लेक्‍स, भिवंडी) आणि फहीम अझीम खान (30, रा.आझादनगर, औरंगाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अटक दोघा आरोपींनी त्यांच्या पाच साथीदारांसह 95 बनावट डेबिट कार्डद्वारे (क्‍लोन) कोल्हापूर येथील एटीएम केंद्रातून 89 लाख 47 हजार 500 रुपये काढले आहेत. यातील अटक आरोपींपैकी एक वाहन चालक आहे; तर दुसऱ्याच्या व्यवसायाबद्दल कोणतीच माहिती पुढे आली नाही. या दोघांनी पैसे काढल्यावर ते ठराविक ठिकाणी जाऊन एका व्यक्तीकडे जमा केले. यानंतर त्यांचे ठरलेले कमिशन त्यांना मिळाले होते. याप्रकारे प्रत्यक्ष पैसे काढणाऱ्या शेकडो व्यक्ती आहेत. त्यांनी फक्त काही हजाराच्या कमिशनच्या आमिषापोटी या आंतरराष्ट्रीय कटात सहभाग घेतला होता. या कटात सहभागी असणाऱ्यांनाही मुख्य सुत्रधार कोण आहे? हे अद्याप समजले नाही. मुख्य सुत्रधार देशात आहे की, परदेशात याची माहिती अद्याप पोलिसांनाही प्राप्त झाली नाही.

या दोघांकडे केलेल्या प्राथमिक तपासात त्यांना काही कमिशन पोटी क्‍लोन केलेली कार्ड देण्यात आली होती. या कार्डमधून पैसे काढण्यासाठी त्यांना घटनेच्या एक दिवस अगोदर कोल्हापूरात बोलावण्यात आले होते. कोल्हापूरात दाखल झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्यांनी कोल्हापूर शहरात चालत चालत दिसेल त्या एटीएम सेंटरमधून रकमा काढल्या आहेत. यातील एकाने तब्बल 15 लाखांची रक्कम काढली आहे. यानंतर काढलेली रक्कम ठरलेल्या ठिकाणी जाऊन संबंधित व्यक्‍तीला दिली. देशातून याप्रकारे रुपे कार्डव्दारे अडीच कोटी रुपये काढले गेले आहेत. पोलिसांनी तपास करताना प्रथम देशांतर्गत तपास करून प्रत्यक्षात पैसे काढणाऱ्यांचा माग काढणे सुरू केले आहे. परदेशातील बॅंकांमधून पैसे काढलेल्यांचा माग काढणे अवघड गोष्ट आहे. परदेशी बॅंकांची पत्र व्यवहार करण्यात आल्यावर काही मोजक्‍याच बॅंकांनी पत्राला उत्तर दिले आहे. परदेशात तपास करतात आंतरराष्ट्रीय कायद्याचा विचार करता मोठा वेळ लागण्याची शक्‍यता आहे. या कटात प्रत्यक्षात सहभागी झालेल्या व्यक्‍तींना प्रत्येकी पाच ते 15 क्‍लोन कार्ड देण्यात आली आहेत. तर, कमिशनपोटी 15 ते 30 हजार देण्यात आले आहेत.

आरोपींच्या पाच साथीदारांचा शोध सुरू
गुन्ह्याच्या तपासासाठी सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. मुंबई, इंदुर, कोल्हापूर येथील एटीएम केंद्रात मिळालेले सीसीटीव्ही चित्रीकरण तपासकामी ताब्यात घेतले होते. चित्रीकरणाद्वारे आरोपींचा माग काढण्यात येत होता. शेख आणि खान यांना कोल्हापूरातून पैसे काढण्यासाठी बनावट डेबीट कार्डचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी खान आणि शेख यांनी पाच साथीदारांशी संगनमत करून 11 ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते रात्री दहा यावळेत बनावट डेबिटकार्डद्वारे 89 लाख 87 हजार 500 रुपये काढल्याची माहिती तपासात निष्पन्न झाले आहे. त्यासाठी 95 बनावट डेबिट कार्डचा वापर करण्यात आला आहे. आरोपींच्या पाच साथीदारांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.

कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष सुहास गोखले यांनी यासंदर्भात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. कॉसमॉस बॅंकेचे मुख्यालय गणेशखिंड रस्त्यावर आहे. बॅंकेच्या सर्व्हरवर हॅकरने हल्ला करून गेल्या महिन्यात 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान 94 कोटी 42 लाखांची रोकड लुटून नेली होती. त्यापैकी अडीच कोटी रक्कम देशातील विविध एटीएम केंद्रातून काढण्यात आली होती. 413 बनावट डेबीट कार्डच्या माध्यमातून 2 हजार 800 व्यवहार करण्यात आले होते. तर 12 हजार व्यवहार व्हिसा कार्डद्वारे करण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)