सायबर क्राईमचा डायनासोर गिळतोय

“आयटी सिटी’ला सायबर डाग

पुणे – ऐतिहासिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, आणि पुरोगामी वारसा शहराला लाभला आहे. शहराचा चेहरामोहरा खऱ्या अर्थाने 1963 नंतर बदलत गेला. त्याचबरोबर भौगोलिकदृष्ट्या आणि वाहतूक दळणवळणाच्या सोयीमुळे शहराने विकासाच्या दिशेने झेप घेतली. त्यानंतर माहिती तंत्रज्ञानाचे जाळे विस्तारले गेले. “आयटी सिटी’ म्हणून उदयाला येतानाच सायबर क्राईमचा विळखाही वाढला. शहरातील टोळीयुद्ध, मालमत्तेविरुद्धचे गुन्हे, लुटमार आणि अपघातांपाठोपाठ सायबर क्राईमची व्याप्तीही वाढत गेली. सायबर क्राईमच्या दुरगामी परिणामांवर टाकलेला प्रकाशझोत…

शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुणे शहराने स्वातंत्र्यपूर्व काळापासून ठसा उमटविला आहे. 1963 नंतर शहराचा विस्तार सुप्त पद्धतीने विकसित होत होता. त्यानंतर 1990 पर्यंत हा विस्तार मर्यादित होता. शहरालगतच्या गावांत शेती हाच व्यवसाय होता. कात्रज, बावधन, मांजरी, हडपसर, धायरी, नऱ्हे, आंबेगाव, भुगाव, पिरंगुट, हिंजवडी आदी परिसर शेती क्षेत्र म्हणून ओळखली जात होती. 1992 नंतर जागतिकीकरण आणि “गॅट’ करारामुळे जगाच्या सीमा देशभरातील अनेक शहराजवळ आल्या. माहिती तंत्रज्ञानाचे जाळे विस्तारत असताना बहुराष्ट्रीय कंपन्यांचा देशभरात प्रवेश झाला. वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा आणि भौगोलिकदृष्ट्या अनुकूलता आदींचा विचार करीत अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी देशातील महत्त्वाच्या शहरांवर लक्ष केंद्रीत केले. त्यात हैद्राबाद, बंगळुरू, पुणे शहराची निवड केली आणि विकासाच्या दिशेने पुणे शहराची घौडदौड सुरू झाली.

2002 मध्ये पुणे जिल्ह्यात हिंजवडीत आयटी पार्क सुरू झाले. त्याचबरोबर हडपसर मगरपट्टा सिटीत माहिती तंत्रज्ञानाचे जाळे निर्माण झाले. यामुळे शहराचा चेहरामोहराच बदलला. लगतची गावे शहराच्या कुशीत विसावली. आयटीमुळे नोकरीच्या शोधात तरुणांचे लोंढे शहरावर आदळत राहिले. त्यात नागरिकरणाचा वेग प्रचंड वाढला. माहिती तंत्रज्ञानामुळे जगभरातील प्रत्येकजण एका क्षणात एकमेंकाशी “कनेक्‍ट’ होत गेला. बहुराष्ट्रीय कंपन्यांची दालने शहरात सुरू झाली. त्यामुळे जागतिक पटलावर पुणे “आयटी’ची ओळख निर्माण झाली.

माहिती तंत्रज्ञानाचा विस्तार आणि प्रगती होत असताना सायबर क्राईमची लक्षणे दिसू लागली. सायबर क्राईमचा सुप्त लागण शहरात दिसू लागली. बॅंका आणि वित्तीय संस्था, सोशल मीडियातून सायबर क्राईममधून फसवणूक करणाऱ्यांची तुरळक संख्या दिसत होती. त्यावेळी हा विळखा सर्वांनी दुर्लक्षित केला. मात्र, त्यातून त्याची व्याप्ती वाढत होती. पूर्वीच्या काळात शहरात महिनाभरात तीन ते चार घटना पोलीस दप्तरी दाखल होत होत्या.

1992 ते 2000 या कालावधीत पुणे शहरात वर्षभरात शंभरच्या घरात दाखल होणारे गुन्हे प्रशासनाच्या दृष्टीने खिजगणतीत नव्हते. त्यावेळी हा किरकोळ वाटणारा गुन्हा डायनासोरसारखा गिळकृंत करेल, असे कोणाच्या ध्यानीमनी नव्हते. मागील 16 वर्षांत सायबर क्राईममधील गुन्ह्याची व्याप्ती शंभर पटीने वाढली आहे. सध्या या घडीला 5 हजार गुन्ह्याची नोंद होत आहे. त्यात सर्वसामान्य नागरिक, महिला, बॅंका, तसेच वित्तीय संस्था सायबर क्राईमच्या विळख्यात भरडल्या जाऊ लागल्या. इंटरनेट हॅक करून गुन्हे करण्याचे प्रमाण वाढीस लागले. आयटी क्षेत्रातील अनेक उच्च शिक्षित तरूण यात गुंतले. त्यातून घरबसल्या कोणालाही लाखों, कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्याचे काम सहजरित्या होऊ लागले.

पुणे पोलिसांसमोर तगडे आव्हान

पूर्वी दुर्लक्षित केलेले हे गुन्हे आता पोलिसांना डोकेदुखी बनली आहे. खून, मारामाऱ्या, आदी गुन्ह्यांचा उलगडा करणाऱ्या पोलीस प्रशासनाला सायबर क्राईमचा उलगडा करण्यासाठी जादा वेळ खर्ची पडत आहे. पुणे शहराची लोकसंख्या आजघडीला 30 लाखांवर पोहचली आहे. त्याचबरोबर पिंपरी- चिंचवडची लोकसंख्या 20 लाखांवर आहे. त्यामुळे या दोन शहराची लोकसंख्या अर्धा कोटींवर आहे. फक्‍त पुणे शहरात सायबर क्राईमची नोंद पाच हजारांवर आहे. मागील 16 वर्षांत सायबर क्राईमने इतकी विदारक स्थिती निर्माण करून पोलीस प्रशासनासमोर एक तगडे आव्हान निर्माण केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)