‘विद्यार्थ्यांना अधिवास दाखला त्वरीत द्या…’

तहसील कार्यालयाचे ई-सेवा केंद्रांना आदेश

केवळ 33 रुपयांत उपलब्ध होतो दाखला

-Ads-

थेऊर- दहावी व बारावीमधील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्‍यक असलेला अधिवास (डोमेसाईल ) दाखला तात्काळ देण्याबाबत हवेली तहसील कार्यालयाने तालुक्‍यातील सर्व महा ई-सेवा केंद्राना आदेश बजावले आहेत. वेळेवर दाखले मिळाल्यास पालक आणि विद्यार्थ्यांची दाखल्यासाठी होणारी वणवण थांबणार असून, फक्त तेहतीस रुपयांमध्ये हा दाखला वितरीत होत असल्याची माहिती कार्यालयाने दिली आहे.
शैक्षणिक प्रवेशासाठी अधिवास दाखला हा महत्त्वाचा मानला जातो. दहावी आणि बारावीच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालक या दाखल्यासाठी गर्दी करतात. सध्या अधिवास, उत्पन्न दाखले यांचे कामकाज ऑनलाइन पध्दतीने सुरू आहे. यासाठी हवेली तालुक्‍यातील संबधित दाखले तात्काळ देण्यात यावेत, यासाठी दाखल्यावर असणाऱ्या डिजिटल सह्यांचे (डीएससी) अधिकार तसहसीलदार प्रशांत पिसाळ यांच्यासह महसूल नायब तहसीलदार समीर यादव, नायब तहसीलदार सुनील शेळके यांनाही दिले आहेत.

ई-केंद्रांना द्यावयाची आवश्‍यक माहिती
हवेली तहसील कार्यालयाने याकामी हवेलीतील सर्व दहावी व बारावीच्या संबधित शाळा, कॉलेजला लेखी पत्र जारी केले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, रहिवास ठिकाण, जन्मस्थळ, पालकांचे नाव ही यादी मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांच्या सही शिक्‍क्‍यासह महाई-सेवा केंद्र या ठिकाणी पाठवल्यास त्यांना इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी केली जाणार नाही आणि तात्काळ दाखले शाळा-कॉलेजमध्ये वितरीत केले जाणार असल्याची माहिती हवेली तहसील कार्यालयातून देण्यात आली.

अधिवास दाखल्यांसाठी हवेलीतील विद्यार्थ्यांनी स्वंयघोषणापत्रासह मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांच्या सही-शिक्‍क्‍यासह विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, रहिवास ठिकाण, जन्मस्थळ, पालकांचे नाव ही माहिती महा ई-सेवा केंद्रांना द्यायची आहे. या व्यतिरिक्त कोणताही कागदोपत्री पुरावा लागणार नाही. फक्त 33 रुपयांचे शासकीय शुल्क भरून विद्यार्थ्यांना तात्काळ दाखले वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत. याची अमंलबजावणी करण्यास महा ई-सेवा केंद्राने टाळाटाळ अथवा गैरप्रकार केल्यास कठोर कारवाई केली जाईल.
– प्रशांत पिसाळ, तहसीलदार हवेली


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)