सायना नेहवाल, प्रणय उपान्त्य फेरीत पराभूत

आशियाई बँडमिंटन अजिंक्‍यपद स्पर्धा

वुहान – ऑलिम्पिक कांस्यविजेती सायना नेहवाल आणि गुणवान युवा खेळाडू एच. एस. प्रणय यांना आपापल्या प्रतिस्पर्ध्यांकडून कडव्या संघर्षानंतर पराभव पत्करावा लागल्यामुळे येथे सुरू असलेल्या आशियाई बँडमिंटन स्पर्धेच्या महिला व पुरुष एकेरीतील त्यांचे आव्हान उपान्त्य फेरीतच संपुष्टात आले.

अग्रमानांकित किदंबी श्रीकांत आणि ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू यांना उपान्त्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला असल्यामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपले आहे.महिला एकेरीतील पहिल्या उपान्त्य लढतीत राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या सायना नेहवालने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या तेैपेई चीनच्या अग्रमानांकित तेई त्झु यिंगला कडवी झुंज दिली. परंतु गतविजेत्या यिंगने आपले कौशल्य पणाला लावताना अत्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत 27-25, 21-19 अशी बाजी मारत अंतिम फेरीतील स्थान निश्‍चित केले. तेई त्झु यिंगविरुद्धच्या 16 लढतींमध्ये सायनाचा हा आठवा पराभव ठरला. तसेच या मोसमात सायनाला तिच्याकडून तिसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला आहे.

पहिल्या गेममध्ये 20-18 अशा आघाडीनंतर सायनाने ही गेम गमावली. तसेच दुसऱ्या गेममध्ये 19-19 अशा बरोबरीत असताना सायनाने दोन चुका करीत पराभव ओढवून गेतला. आता विजेतेपदासाठी यिंगसमोर चीनच्या सहाव्या मानांकित चेन युफेईचे कडवे आव्हान आहे. युफेईने दुसऱ्या उपान्त्य लढतीत कोरियाच्या सातव्या मानांकित संग जि हयुनचा प्रतिकार 21-12, 21-13 असा केवळ 37 मिनिटांत संपुष्टात आणला.

प्रणयने पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत कोरियाच्या द्वितीय मानांकित सोन वान हो याच्यावर सनसनाटी मात करताना आशा उंचावल्या होत्या. अपेक्षांची बऱ्याच प्रमाणात पूर्तता करताना उपान्त्य लढतीत प्रणयने चीनच्या तृतीय मानांकित चेन लोंगला कडवी झुंज दिली. परंतु मोक्‍याच्या क्षणी नाहक चुका करताना त्याने अखेर 16-21, 18-21 असा पराभव पत्करला.

प्रणयने अप्रतिम तिरकस फटके आणि स्मॅशेस लगावताना आपल्या कौशल्याचे दर्शन घडविले. परंतु दोन्ही गेममध्ये दीर्घ रॅलीजच्या अखेरीस चूक करताना त्याने संधी गमावली. चेन लोंगसमोर अंतिम फेरीत जपानच्या केन्टो मोमोटाचे आव्हान आहे., मोमोटाने दुसऱ्या उपान्त्य लढतीत मलेशियाच्या पाचव्या मानांकित ली चोंग वेईवर 21-19, 21-14 असा 55 मिनिटांत पराभव करताना खळबळजनक निकालासह अंतिम फेरीत धडक मारली.

   दुहेरीत भारताचे आव्हान संपुष्टात

महिला व पुरुष दुहेरीत भारतीय जोड्यांचे आव्हान दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आले. महिला दुहेरीत मेघना जक्‍कमपुडी व पूर्विशा राम या भारतीय जोडीला दुसऱ्या फेरीत पी. देचापोल व टी. सॅपसिरी या थायलंडच्या सातव्या मानांकित जोडीविरुद्ध केवळ 23 मिनिटांत 8-21, 9-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. तसेच पुरुष दुहेरीत ली जुनहुई आणि लियू युचेन या चीनच्या अग्रमानांकित जोडीने एम. आर. अर्जुन व रामचंद्रन श्‍लोक या भारतीय जोडीचा 21-11, 21-19 असा 29 मिनिटांत पराभव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)