सायकलवरून सुरक्षारक्षकांकडून ससूनची गस्त

चोवीस तास असणार निगराणी : प्रशासनाकडून स्वतंत्र टीमची नेमणूक

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.26 – शिस्त, कडक सुरक्षा, स्वच्छता, अद्ययावत तंत्रज्ञान अशी ओळख निर्माण करणाऱ्या ससून रूग्णालयात आता चोवीस तास गस्त घालण्यात येणार आहे. ही गस्तही पर्यावरणपुरक म्हणजेच सायकलवरून घालण्यात येणार आहे. त्यासाठी ससून रूग्णालय प्रशासनाकडून सहा सायकल खरेदी करण्यात येणार आहे. ड्युटीवर असलेल्या सुरक्षारक्षकांनी सायकलवर संपूर्ण रूग्णालय परिसरात गस्त घालून रूग्णालयातील शिस्तीला कोठेही तडा जाणार नाही, अनुचीत घटना घडणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे.

स्वच्छ, अद्ययावत सुविधांनी संपन्न होत असलेल्या ससून रूग्णालयाला आता “कॉर्पोरेट लूक’ आला आहे. रूग्णालयातील स्वच्छतेसह येथील शिस्त आणि नव्याने आलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे ससूनने चांगली ओळख निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वी ससून रूग्णालयातील डॉक्‍टरांना मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर येथील डॉक्‍टरांच्या सुरक्षिततेसाठी अधिक सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले. तसेच पोलीस बंदोबस्तही देण्यात आला. दरम्यान, पूर्वी ससून रूग्णालयात सुरक्षारक्षकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. त्यामुळे “आवो जावो घर तुम्हारा’ अशी परिस्थिती या रूग्णालयात पहायला मिळत होती. एखाद्या सुरक्षारक्षकाने कोणाला अडविलेच तर तो थेट संघटनेची धमकी देत त्याला मारहाण करत असल्याच्या घटनाही अनेकवेळा घडल्या. त्यामुळे सुरक्षारक्षक असून नसल्यासारखे होते.

मात्र, ससून रूग्णालय आणि बि.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी पदभार स्वीकरल्यानंतर ससून रूग्णालयाचा चेहरा-मोहरा तर बदललाच, त्याचबरोबर रूग्णालयात शिस्त आणि स्वच्छताही आणली. डॉक्‍टरांना मारहाणप्रकरणानंतर डॉ. चंदनवाले आणि त्यांच्या टीमने रूग्णालय परिसरात सुरक्षारक्षक वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज शंभरहून अधिक सुरक्षारक्षक रूग्णालय परिसरात तैनात आहेत. ससून रूग्णालयाचा परिसर साधारण साडेनऊ हेक्‍टरचा असून, अनेक विभाग आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवणे कठीण आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक विभागात सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहे. त्याचबरोबर रूग्णालय परिसरात कोठेही अनुचीत प्रकार घडू नये, गडबड-गोंधळ होवू नये यासाठी परिसरात गस्त घालण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार सहा सायकली खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी स्वतंत्र टीम नेमण्यात आली आहे. ती चोवीस तास गस्त घालणार आहे. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

…………………
रूग्णालय परिसरात गस्त घालण्यासाठी सहा सायकली खरेदी करण्यात येणार आहे. सायकलमुळे प्रदुषणविरहीत गस्त घालता येणार असून, सुरक्षारक्षकांना त्याचा फायदा होईल. या गस्तीमुळे रूग्णालयातील किरकोळ घटनांनाही आळा बसण्यात मदत होईल. शिस्त पाळली जाईल. आवश्‍यक वाटल्यास पुढे आणखीन सायकल खरेदी केल्या जातील.
डॉ. अजय चंदनवाले
अधिष्ठाता, ससून रूग्णालय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)