साम-दाम-दंड-भेदचा अर्थ पूर्ण ताकदीने लढा असा होतो- नितीन गडकरी

मुंबईः पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत गाजलेल्या ‘साम-दाम-दंड-भेद’ या नीतीचा अर्थ सांगत आज केंद्रीय मंत्री भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली. देवेंद्र फडणवीस हे नियमबाह्य बोलणाऱ्यांपैकी नाहीत. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी जी उक्ती वापरली, त्या साम-दाम-दंड-भेदचा अर्थ पूर्ण ताकदीने लढा, असा होतो. त्यात गैर काहीच नाही, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

पालघर पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात चांगलीच जुंपली होती. ही निवडणूक जिंकणे दोन्ही पक्षांसाठी किती प्रतिष्ठेचं झालं आहे, याचा प्रत्यय प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांत आला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप ऐकवली होती. त्यातील मुख्यमंत्र्यांची भाषा ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ‘ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिले पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही. कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते’, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. साम-दाम-दंड-भेद या त्यांच्या शब्दांनी तर खळबळच उडवून दिली होती. परंतु, दुसऱ्याच दिवशी शिवसेनेने ऐकवलेल्या ऑडिओ क्लीपच्या सुरुवातीचा आणि शेवटचा भाग मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत ऐकवला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘आपण सगळ्या गोष्टी सांभाळण्याकरता सक्षम आहोत. आपण सरकार पक्ष आहोत. पण सत्तेचा कधीच दुरुपयोग करत नाही. मात्र, असा दुरुपयोग कुणी करायचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही, ही मानसिकता निवडणुकीत ठेवली पाहिजे’, हे त्याच ऑडिओ क्लीपमधील पुढचे संवाद ऐकवत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर पलटवार केला होता. साम-दाम-दंड-भेद याचा अर्थ कूटनीती असा होतो, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आता गडकरी त्यांच्या पाठीशी उभे राहिलेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)