सामान्य नागरिकांना पोलिसांची भीती नाही, तर भरोसा वाटावा – मुख्यमंत्री

पुणे: केवळ गुन्हेगार पकडणे हेच पोलिसांचे काम नाही, तर त्यांच्या कामाला सामाजिक आयाम असणे आवश्यक आहे. बदलत्या शहरीकरणामुळे समाजात अनेक नव्या समस्या निर्माण होत असून या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी समुपदेशनावर भर द्यावा. समाजाला सेवा देणे हेच पोलिसांचे काम आहे. पोलिसांकडे गेल्यावर सामान्य नागरिकांना भीती न वाटता भरोसा वाटावा असे काम पोलीस विभागाने करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्यावतीने आयुक्तालयाच्या परिसरात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बालक यांना एकाच ठिकाणी मदत व सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ‘भरोसा’ कक्षाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर जवाहरलाल नेहरू मेमोरिअल सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले,  सध्या शहरीकरणामुळे नागरीकांच्या जीवनाचे अनेक संदर्भ बदलत आहेत. अनेक नव्या समस्यांना लोकांना तोंड द्यावे लागत आहे. या नव्या समस्यांना सामोरे जाताना समुपदेशनाची मदत घेण्याची आवश्यकता आहे. कौटुंबिक कलह ही सुद्धा मोठी समस्या निर्माण झाली आहे. या नव्या समस्यांना सामोरे जाताना पोलिसांनी केवळ तांत्रिक बाबीत न जाता समुपदेशनाचा मार्ग स्वीकारावा. समुपदेशनाच्या माध्यमातून नवा सुदृढ समाज घडविण्यासाठी प्रयत्न करावा.

भरोसा कक्षाचे नागपूर शहरात थोड्याच कालावधीत चांगले परिणाम पाहावयास मिळाले हाते. त्यात सुधारणा करून पुण्यात भरोसा कक्ष सुरू करण्यात आला आहे. याचा पुण्यातही निश्चितच चांगला परिणाम पहावयास मिळेल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, इंग्रजांच्या काळात राज्य करण्यासाठी पोलीस दलाचा उपयोग केला जात होता, आता मात्र पोलीस हे सामान्य नागरिकांना सेवा देण्यासाठी आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोलिसिंग अधिक सुकर झाले आहे, तसेच या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत झाली आहे.

पोलीस दलाच्या आधुनिकतेबरोबरच पोलिसांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठीही शासन विशेष प्रयत्न करीत आहे. राज्यातील पोलिसांच्या घरांच्या प्रश्नावर सरकारने मोठे काम केले आहे. मुंबईखालोखाल पुण्यात पोलिसांसाठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. पुणे शहरात लावण्यात आलेल्या कॅमेराच्या माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण राखत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोडविण्यास मदत झाली आहे. मात्र शहरातील हे सीसीटीव्ही कॅमेरे अपग्रेड करून घेण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

भरोसा सेलची वैशिष्ट्ये

 • भरोसा सेल (COPS HUB)च्या माध्यमातून पीडित महिला,मुले व ज्येष्ठ नागरिक यांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची मदत व सुविधा उपलब्ध करून देणे.
 • महिला सहायक कक्षांतर्गत पोलीस मदत,महिला हेल्पलाईन, समुपदेशन,वैद्यकीय सेवा, विधीविषयक सेवा, मानसोपचार तज्ज्ञ, पीडीत महिलांचे पुनर्वसन,कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण सेवेचा समावेश
 • भरोसा सेलमुळे पीडित महिलांना अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी मानसिक बळ मिळेल
 • भरोसा सेल हे पीडित महिलांच्या तक्रारीकरिता२४ X ७ सुरु राहणार असून महिला हेल्पलाईन नंबर १९०१, चाईल्ड हेल्पलाईन नंबर १०९८, ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन नंबर  १०९० तसेच १०० नंबरवर तक्रारदारांच्या तक्रारी स्वीकारून तज्ज्ञांकडे पाठवणार
 • पीडित महिलांना समुपदेशन करून आवश्यकता असल्यास तात्पुरत्या निवासाची व्यवस्था
 • विशेष बालपथक सेवेंतर्गत पीडित बालकांना मानसिक बळ व आधार देणे
 • विधी संघर्षग्रस्त बालकांचे पुनर्वसन करणे
 • पीडित बालकांना तात्काळ वैद्यकीय सुविधा,मानसोपचार तज्ज्ञ, विधीतज्ज्ञ संरक्षण अधिकारी व

   पुनर्वसन आदी सेवा पुरविणे

 • गुन्हेगारी वातावरणापासून बालकांना दूर ठेवण्याकरिता योजना राबविणे
 • बालकांच्या हक्काचे संरक्षण करणे
 • ज्येष्ठ नागरिक कक्षांतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज स्वीकारून तात्काळ कार्यवाही करणे
 • ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक त्या सुविधा देऊन ज्येष्ठ नागरिक संघाचे /NGOचे सहकार्य घेणे
 • ज्येष्ठ नागरिकांना व गैरअर्जदारांना समुपदेशन करून योग्य ते मार्गदर्शन करणे

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)