सामाजिक स्वास्थ्य आणि ताण-तणाव

 

रोग नसलेली स्थिती म्हणजे आरोग्य, अशी आरोग्याची व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. मात्र, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य, अशी आयुर्वेदाची व्याख्या आहे. मात्र, अनेकदा सामाजिक स्वास्थ्याबद्दल कमी बोललं जातं

जग जसजसे प्रगत होत आहे, पुढारत आहे, तसेतसे आपल्या समोरील आव्हाने देखील त्यांचे स्वरूप बदलत, वाढत आहेत असेच म्हणावे लागेल. वैद्यकशास्त्राचा विचार करता, नित्यनेमाने घडणारे बदल, त्यामध्ये होणारी संशोधने आणि मग भेटीस येणारे उपचार, पर्याय, हे रोजचेच चक्र. कारणमीमांसा केल्यास, कित्येक आजार, विकृती किंवा लक्षणांचे मूळ आता मानसिकतेत दडलेले आहे, हे अगदी उघडपणे सिद्ध होत आहे. कायिक विकारांसोबातच, म्हणजेच शारीरिक व्याधींसोबत, मनोकायिक विकारांचे वाढते प्रमाण, हे याचेच द्योतक म्हणावे लागेल.
आता मानसिकतेचा विचार करताना, पटकन, डोळ्यासमोर येणारा घटक म्हणजे ताण. अगदी सहज बोलले जाते; बरेचसे विकार हे ताण-तणावातून निर्माण होतात, पण म्हणजे नेमके काय? सगळेच ताण आपल्यासाठी एकंदरीतच घातक असतात का? आणि हे ताण कुठे, कसे निर्माण होतात? त्याचे दूरगामी परिणाम काय? असे अनेक प्रश्‍न अर्थातच उभे राहतात.
ताणासोबत अर्थातच दुवा जोडला जातो, तो नातेसंबंधांचा अर्थात ठशश्ररींळेपीहळिी. या नातेसंबंधातूनच नको इतके ताण निर्माण होतात, ही खरी बाब असली, तरीही, ही नाती, आपल्या आजुबाजूची माणसे, हे त्यावरचे उत्तरही असू शकते! फरक इतकाच की त्यांच्यातून ताण उत्पन्न न होऊ देता, त्यांच्यातील गोडवा ओळखून त्यांचे योग्य प्रकारे जतन करणे.
इथे मला नेहमी एक तुलना करावीशी वाटते. ती म्हणजे, पूर्वीच्या काळी असणारी कुटुंबव्यवस्था आणि सध्याची कुटुंबव्यवस्था. पूर्वी एकत्र कुटुंबात असणारी भरपूर माणसे, त्यांच्या वयामध्ये, अधिकारामध्ये, घरातील स्थानामध्ये असणारा फरक आणि तरीही, वरकरणी तरी गुण्या-गोविंदाने सारे काही चालू आहे असे असणारे चित्र. ते आताची थेट, विभक्त कुटुंबव्यवस्था. इनमीन तीन, किंवा चार व्यक्ती आणि त्यांची तोंडे चार दिशेला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. काही ठिकाणी तर याही पेक्षा विचित्र स्थिती. अगदी दोन व्यक्तींचे घर, परंतु ते ही चंद्र-सूर्यच! अशा वेळेस, दर्शनच नाही, तिथे संवाद काय घडणार?
नेमके काय बदलत गेले? किंवा काय बदलत आहे? आणि आपण खरे कुठे जात आहोत? हे सारे विचार करायला लावणारेच आहे. जव्हा आपण, एकत्र कुटुंबव्यवस्था आणि साधारण, दोन-तीन पिढ्यांपूर्वीचा काळ पाहतो तव्हा आयुष्य त्या मानाने सोपे होते असे म्हणावे लागेल. म्हणजे त्याही काळात त्या परिस्थिती अवघडच होत्या; परंतु तुलनात्मकरीत्या ते थोडेसे, सहज आणि सोपे होते. समाजाच्या म्हणून काही नियमांच्या आत बसणारे, काही विशिष्ट पद्धतीने पुढे जाणारे आणि महत्त्वाचे, त्यामध्ये आनंद असणारे असे होते. समाज बदलला तेव्हाच, व्यक्ती तितक्‍या प्रकृती या नियमानुसारच, सारे काही हळूहळू बदलत गेले.
आता आपणास अवगत असणारे ज्ञान, हाता-पायाशी असणाऱ्या खूपशा सुविधा, सोपे झालेले जीवनमान, याचा आपण कसा उपयोग करून घेतो हे ही तितकेच महत्त्वाचे. माहिती आणि तंत्रद्यानाचा झालेला विकास, त्यामुळे अक्षरशः जोडले गेलेले आपण सर्व, हेच विसरलो की हे दुधारी शस्त्र आहे. त्याला जीवनात स्थान देताना, तेच सर्वस्व असे मानून जगायला लागलो. माणसांपेक्षा, खऱ्या नात्यांपेक्षा, बेगडी नाती आणि बेगडी आयुष्याला, त्याच्या चकमकीत असण्याला किंमत आली आणि तिथेच आपण फसलो. शिवाय एकाच आयुष्यात सारे काही मिळविलेच पाहिजे असा जन्मसिद्ध हक्क जणू प्रत्येकाचाच! सहाजिकच चालू झाला तो अट्टाहास! त्यामुळे समाधान नावाचा एक महत्त्वाचा गुण विसरून गेलो आणि चालू राहिली ती अखंड शर्यत, सतत पुढे धावण्याची स्पर्धा, अजून काहीतरी, कमीतकमी वेळात मिळविण्याची धडपड, त्यासाठी, वाट्टेल त्या पद्धतीने शारीरिक मानसिक स्तरावर, स्वतःला झिजविण्याची तयारी, शिवाय व्यवहारात फसविण्याची, एकमेकांचा विश्‍वास, पायदळी तुडविण्याची इच्छा, तसे आचरण, आणि नंतर उजळ माथ्याने, गेंड्याच्या कातडीने समाजात वावरण्याचा बेधडक पण,
एकमेकांशी सतत होणारी तुलना, त्यातून निर्माण होणारी असूया, द्वेष, आणि प्रत्येक क्षणी बदलत जाणाऱ्या महत्त्वाकांक्षा, याला आपले शरीर आणि मन ही जोडगोळी साहजिकच कधीतरी खर्ची पडणार हेच आपण विसरून गेलो!
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आव्हान, महत्त्वाकांशा आणि अवाजवी अपेक्षा यातील फरकही पुसून गेल्यासारखा झाला. आयुष्याविषयी, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, त्याला शांतपणे, अनुभवाने घडविणे यापेक्षा, त्याला सजविण्यासाठी, जास्त एकाग्र होऊ लागलो. अगदी लहान मुलांपासून ते कोणत्याही वयोगटापर्यंत हीच कथा. असे का झाले आहे? होत आहे? इतका विचार करण्यासाठी, जरा दोन क्षण थांबून, मागे वळून पाहण्यासाठी वेळ कोणाकडे आहे? मग कळत नकळत, आणि बऱ्याच वेळा अगदी जाणीवपूर्वक, आपण या साऱ्या ताण-ताणावांचे, त्यातून उत्पन्न होणाऱ्या व्याधी, आजार, लक्षणे, साऱ्यांचेच माहेरघर झालो. आपण स्वतः, आपली नित्यकर्मे आणि चरितार्थासाठीचे काम, त्यातून आपले असणारे एकंदरीत आयुष्य या साऱ्याला मनापासून स्वीकारणे गरजेचे आहे. तरच त्यामध्ये, आनंद शोधता येईल. दुसरे म्हणजे मग महत्त्वाकांक्षा वाईटच का? अजिबात नाही; परंतु ती कोणत्या पद्धतीने आपण पूर्ण करत आहोत, किंवा कोणत्या पद्धतीने तिच्या पूर्ततेसाठी आपली वाटचाल चालू आहे, हे मात्र अतिशयच महत्त्वाचे..! त्या मार्गावर चालताना, काय काय खर्ची पडत आहे हे देखील. आपले ध्येय, कितीही मोठे, उदात्त असले तरीही, तिथे पोचण्यासाठी आयुष्याचा समतोल घालविण्याची गरज नक्कीच नाही! त्यासाठी मात्र कष्ट करण्याची तयारी, भरपूर संयम, आणि पुनःपुन्हा झटण्याची तयारी हवी.
एवढ्या-तेवढ्या कारणावरून, नैराश्‍याच्या गर्तेत ढकलले जाणे, किंवा आयुष्याच्या बाबतीत उदासीनता येणे, एकमेकांविषयी राग, किंवा तीव्र अनावश्‍यक भावना मनामध्ये घर करून राहणे, आत्महत्येचा प्रयत्न करणे, ही सारीच त्या व्यक्तीच्या, आणि पर्यायाने एकंदरीत समाजाच्या ह्रासाची लक्षणे आहेत.
आपणा सर्वांनाच आता हे पूर्ण माहीत आहे की, बुध्यांका इतकाच किंवा त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचा घटक म्हणजे, भावनांक. आपण किती योग्य प्रकारे, भावना, विचार; त्यांची आंदोलने आणि त्यातून निर्माण होणारे प्रसंग, समस्या सहजगत्या हाताळू शकतो हे ठरते ते यावरच. यातूनच पुढे कोणत्याही समाजाचा देखील, सामाजिक, भावानांक तयार होतो. खेदाची गोष्ट अशी की यात आज आपण केवळ मागे नव्हे तर दिवसेंदिवस जास्त मागासलेले बनत चालले आहोत. जागतिक पातळीवर, जर प्रत्येक देशाचा या प्रकारे विचार झाला, तर आपला देश, आपला एकंदरीत समाज, आज, आत्मकेंद्री, नाखूष आणि प्रचंड तणावाखाली असणारा म्हणून बघितला जाईल. आणि म्हणूनच यावर उपाय करण्याची, त्यावर मात करण्याची आता वेळ आलेली आहे. किंवा ती आता महत्त्वाची निकड आहे! मुळात सुखी, समाधानी, आनंदी आयुष्याचे मापदंड ज्याचे त्याचे असले, तरीही, त्यात एकंदरीतच स्वास्थ्य खर्ची पडणे हा नक्कीच विरोधाभास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)