सामाजिक सुरक्षा विभागाचा “हाय प्रोफाईल फोकस’

संग्रहित छायाचित्र

– संजय कडू

वेश्‍याव्यवसायातील खऱ्या पीडितांची सुटका होणे आवश्‍यक

पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाची स्थापना वेश्‍याव्यवसायातील पीडितांची सुटका करण्याच्या उद्देशाने झाली आहे. या विभागाने आजवर अनेक पीडित व अल्पवयीन मुलींची सुटका या व्यवसायातून केली आहे. वेश्‍याव्यवसायातील खऱ्या पीडित मुली या कुंटणखान्यात आढळतात.

शहरातील मध्यवर्ती भागात बुधवार पेठेत कुंटणखाने वसले आहेत. येथे नोकरीच्या व लग्नाच्या आमिषाने फसवणूक करून आणलेल्या शेकडो मुली आहेत. यातच दरवर्षी नव्याने फसवणूक करून आणलेल्या मुली दाखल होत असतात. मध्यंतरी पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत अनेक पीडितांची सुटका केली आहे. तर, काही कुंटणखानेही सील केली आहेत. मात्र, मागील काही वर्षांपासून खऱ्या अर्थाने पीडितांची सुटका करण्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सध्या होत असलेल्या कारवायात या फक्‍त हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटवर होत आहेत. हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटमधील पीडिता स्वत:च्या मर्जीने या व्यवसायात आलेल्या दिसतात. परदेशातून आलेल्या तरुणी तर खास पर्यटन व बिझनेश व्हिसावर आलेल्या आढळत आहेत. हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटवर लक्ष करत असताना खऱ्या पीडिता मात्र कुंटणखान्यात नरकयातना भोगताना दिसत आहेत.

देशातील तीन नंबरचा सर्वांत मोठा रेड लाईट एरिया पुण्यातील बुधवार पेठेत आहे. येथे तब्बल 440 कुंटणखान्यात पाच हजार महिला वेश्‍याव्यवसाय करतात. जुन्या पडक्‍या इमारती/वाडे यात 8 बाय 6 चौरस फुटाच्या दुर्गंधीयुक्त खोल्या अशी येथील परिस्थिती आहे. बांगलादेश, नेपाळ, पश्‍चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, केरळ आदी परिसरांतील तरुणी व महिला येथे प्रामुख्याने आढळतात. त्या गरीबी आणी फसवणुकीच्या माध्यमातून वेश्‍याव्यवसायात ओढल्या गेलेल्या आहेत.

महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे या दोन शहरांतील कुंटणखान्यांत मुली पुरविणाऱ्या दलालांची मोठी साखळी कार्यरत आहे. बांगलादेशातून अगदी काही हजारांत बेकायदा बॉर्डर ओलांडून मुलींना येथे आणले जाते. बांगलादेश व नेपाळ प्रमाणे पश्‍चिम बंगाल व बिहार येथे दलालांची साखळी मोठी आहे. येथील आर्थिक परिस्थितीमुळे गांजलेल्या कुटुंबाला हे दलाल हेरतात. यानंतर नोकरी किंवा लग्नाचे आमिष दाखवून मुलींना मुंबई किंवा पुण्यात आणले जाते. येथे त्यांना गुरा-ढोरांच्या किंमतीत विकले जाते. कुंटणखाना मालकीण अगदी 20 ते 40 हजारांत मुलींना विकत घेतात. सुरूवातीला त्यांना खोलीमध्ये, पोटमाळ्यावर किंवा बाथरुमध्ये डांबून ठेवले जाते. त्यांना उपाशी ठेऊन मारहाण केली जाते. यानंतर त्यांना वेश्‍याव्यवसायाला प्रवृत्त केले जाते.

अल्पवयीनांना वयात आणण्यासाठी स्टेरॉईडचे डोस
अल्पवयीन मुलींना दलालांमार्फत विकले जाण्याचे प्रमाण येथे दखल घेण्याजोगे आहे. अल्पवयीन मुलींना वयात आणण्यासाठी स्टेरॉईडचे डोसही दिले जातात. पुणे पोलिसांनी काही वर्षांपूर्वी येथील रेड लाईट एरियाकडे जाणारे सर्व रस्ते सिल करून धडक कारवाई केली होती. यानंतर काही कुंटणखान्यांना सीलही ठोकण्यात आले होते. 2017 साली एकाच वेळी 12 कुंटणखान्यांना सील ठोकले होते. मात्र, यानंतर येथील कारवाईत खंड पडलेला दिसतो. सध्या सामाजिक सुरक्षा विभागाचा सर्व फोकस हायप्रोफाईल वेश्‍याव्यवसायावर दिसतो. यावर कारवाई करणेही आवश्‍यक आहे, मात्र यातून सुटका केलेल्या तरुणी या खऱ्या अर्थाने पीडित नसतात. पंचतारांकीत हॉटेल, लॉज, रो-हाऊस अशा ठिकाणी हायप्रोफाईल वेश्‍याव्यवसाय चालताना दिसतो. यामध्ये खऱ्या अर्थाने प्रोफेशनल तरुणी दिसतात. चित्रपटातील साईड हिरोईन, मालिकातील दुय्यम दर्जाच्या कलाकार, उच्चभ्रू जीवन जगण्यासाठी सवय असलेल्या तरुणी हायप्रोफाईल वेश्‍याव्यवसायात येतात. त्यांची यातून सुटका केली तरी त्या पुन्हा स्वमर्जीने दाखल झालेल्या आढळतात.

सुटका होणाऱ्या मुलींचे प्रमाण अगदी नगण्य
बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात दरवर्षी 40 ते 50 अल्पवयीन व तरुणी फसवणूक करून दलालांमार्फत दाखल होत असतात. त्यांचा अनन्वीत छळ करून त्यांना वेश्‍याव्यवसायाला जुंपले जाते. मात्र, अभावानेच येथे कारवाई होताना दिसते. येथून सुटका होणाऱ्या मुलींचे प्रमाणही अगदी नगण्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)