‘न्यूड’ : सामाजिक वास्तवावर फटकारे

दिग्दर्शक रवी जाधव यांनी ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, ‘बालक पालक’ आशा वेगळ्या चित्रपटांमधुन  आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे. आता ‘न्यूड’ या चित्रपटात त्यांनी अतिशय संवेदनशील विषयाची सशक्त मांडणी केली आहे. नग्नता म्हणजेच अश्लिलता, वासना असा समज आपल्या कडे आहे, मात्र फक्त कपडे घातल्याने शरीर झाकले गेले तरी स्त्री कडे बघण्याची नजर बदलत नाही.
 ‘न्यूड़’ ही कथा आहे यमुना (कल्याणी मुळ्ये) या महिलेची. पतीचे (श्रीकांत यादव)  माणिक (नेहा जोशी) सोबत विवाहबाह्य संबध असतात. त्यामुळे तो यमुनाला नेहमीच मारहाण करत असतो. तिच्या कडून सतत पैसे मागत असतो. या सगळ्या आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळलेली असते. त्यामुळे ती तिचा मुलगा लक्ष्मण (मदन देवधर) ला घेऊन मुंबईला आपल्या मावशीकडे (छाया कदम) येते. मुंबईला आल्यावर ती अनेक दिवस काम शोधते. पण काही केल्या तिला काम मिळत नाही. तिची मावशी एका मोठ्या आर्ट कॉलेजमध्ये शिपाई म्हणून काम करत असते. आपल्याला पण आपल्या मावशीने त्या कॉलेज मध्ये नोकरी मिळून द्यावी असे तिला वाटत असते. त्यामुळे एक दिवस ती तिच्या मावशीचा पाठलाग करते. मावशीचा पाठलाग केल्यानंतर तिला कळते की मावशी कॉलेज मध्ये शिपायाचे काम करण्यासोबतच न्यूड मॉडेल म्हणून काम करत असते. विद्यार्थ्यांच्या कलेला वाव मिळावी यासाठी हे करण्यात काहीच चुकीचे नाहीये असे तिचे म्हणणे असते आणि यासाठी तिला चांगला पैसा देखील मिळत असतो. आपल्या मुलाला सुद्धा चांगले शिक्षण मिळावे ही केवळ यमुनाची इच्छा असल्याने ती देखील हे काम करायला लागते. एक न्यूड मॉडेल बनल्यावर तिच्या आयुष्यात काय काय घडते हे जाणून घेण्यासाठी ‘न्यूड ‘ चित्रपटगृहात जाऊन बघायला हवा.
 दिग्दर्शक रवी जाधव यांची ही कथा असून सचिन कुंडलकर आणि त्यांनी पटकथा, संवाद लिहिले आहेत. रवी जाधव यांनी  एक खूपच वेगळा विषय चित्रपट रसिकांच्या समोर आणला आहे आणि तो तितक्याच ताकदीने सादर केला आहे त्यामुळे त्याचे करावे तितके कौतुक कमी आहे. चित्रपटाचे नाव ‘न्यूड’ असले तरी या चित्रपटात कोणताही विभित्सपणा जाणवत नाही,  चित्रपट कुठेच बोल्डनेसकडे वळत नाही हेच दिग्दर्शकाचे यश आहे. या चित्रपटात काही मोजक्याच व्यक्तिरेखा असून त्या खूपच चांगल्या प्रकारे मांडल्या आहेत. आपल्याला प्रेक्षकांच्या पुढे काय सादर करायचे आहे याचा नेमका विचार लेखनात स्पष्ट असल्याने चित्रपट कुठेही आपली लय चुकत नाही, रवीच्या मनातील  चित्राप्रमानेच नेमक्यापनाने पडद्यावर उतरला आहे असेच म्हणावे लागेल.
यमुनाला पैशाची गरज आहे म्हणून न्यूड मॉडल होण्यास ती तयार झाली असली तरीही ती पुढे पण याच कलेवर  प्रेम करायला लागते कारण तिच्या मुलाचे आणि या कला महाविद्यालयच्या  विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले नाही पाहिजे असे तिचे स्पष्ट मत आहे, तसेच कपड़ा जिस्म पे पहनाया जाता है , रूह पे नहीं… हा नसिरुद्दीन शहा यांच्या तोंडी असलेला संवाद चित्रपद्वारे लेखक, दिग्दर्शकाला नक्की काय सांगायचे आहे ते प्रेक्षकांपर्यंत स्पष्टपने पोहोचवतो हे निश्चित.
कलकरांच्या अभिनया बद्दल सांगायचे तर अभिनेत्री कल्याणी मुळ्ये आणि छाया कदम यांनी खूपच चांगले काम केले आहे. छाया कदमचा पडद्यावरील वावर तर अफलातून आहे. तिने साकरलेली चंद्राक्का उत्तम आहे. कल्याणीच्या यमुनेचे कौतुक करावे तितके कमी आहे. ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा चित्रपटात केवळ काही मिनिटांसाठी असले तरी त्यांनी आपली एक छाप सोडली आहे. ओम भूतकरने आपले काम चोख बजावले आहै, इतर कलकरांच्या भुमिकाही छान झाल्या आहेत.
‘न्यूड’ चित्रपटाची सिनेमोटोग्राफी खूपच सुंदर आहे. चित्रपटातील गाणी कथेला पुढे घेऊन जातात. या कथेचा शेवट काय असेल याची उत्सुकता कथा पुढे जाते तशी वाढते, ज्या पद्धतीने रवी जाधवने शेवट केला आहे त्याला तोड़ नाही. ‘न्यूड’ बद्दल एकंदरीत सांगायचे तर हा समाजाच्या  नग्न मानसिकतेचा अचूक वेध घेणारा चित्रपट आहे, वेगळ्या विषयाच्या चित्रपटाचे तुम्ही  चाहते असाल तर हा चित्रपट नक्की पहा.
चित्रपट – न्युड
निर्मिती – झी स्टुडिओ, अथांश क्रिएशन्स
दिग्दर्शक- रवी जाधव
कलाकार- कल्याणी मुळे, छाया कदम, ओम भूतकर, नेहा जोशी, श्रीकांत यादव, मदन देवधर
रेटींग-****
-भूपाल पंडित

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)