सामाजिक बांधिलकी मानणारी विद्यापीठे हवीत !

पुणे, दि. 1 – ऐकिकडे भारतातील युवकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत, तर दुसरीकडे स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठीचे शिक्षण देण्याचे आव्हान विद्यापीठांसमोर आहे. अशा परिस्थितीत भारतीय उच्च शिक्षण स्थित्यंतराच्या टप्प्यावर आहे. सामाजिक बांधिलकी मानणारी विद्यापीठे निर्माण झाली तरच समाजाच्या विद्यापीठांकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण होतील, असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युजीसी) उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी आज सांगितले.

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या वतीने “यूजीसी’चे उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. भूषण पटवर्धन यांचा विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कुलपती डॉ. माणिकराव साळुंखे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, प्र-कुलगुरू आणि कार्यवाह डॉ. विश्वजित कदम, प्राचार्य डॉ. मुकुंद सारडा उपस्थित होते.

-Ads-

पटवर्धन म्हणाले, पारंपरिक विद्यापीठे असो वा खाजगी विद्यापीठे त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी पूर्वग्रहदूषित असू नये. गुणवत्तेच्या आधारेच त्यांच्याविषयीचे मत व्यक्त केले पाहिजे. खाजगी विद्यापीठांकडे केवळ खाजगी विद्यापीठ म्हणून पाहणे योग्य नाही. डॉ. गजानन एकबोटे म्हणाले, डॉ. भूषण पटवर्धन यांना अनेकदा कुलगुरूपदाने हुलकावणी दिली. जे होते ते चांगल्यासाठीच असे म्हणावे लागेल. 800 हून अधिक विद्यापीठे आणि 41000 हजार महाविद्यालयांचं नियंत्रण करणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाचे ते उपाध्यक्ष झाले आहेत. सर्व शिक्षणसंस्थाशी त्यांची नेहमीच सहकार्याची भावना राहिलेली आहे. यापुढेही ती निश्‍चित राहिल अशी खात्री आहे.

डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, संशोधक म्हणून डॉ. भूषण पटवर्धन यांनी केलेले काम मोलाचे आहे. विद्यापीठे आणि उद्योगक्षेत्र यांच्यात संवाद निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ते उत्तम प्रशासक आहेत. खाजगी शिक्षणसंस्था चांगल्या नाहीत. असा जो चुकीचा समज पसरवला जात आहे. हे योग्य नाही. गुणवत्तेच्या आधारेच सर्वच शिक्षणसंस्थांचे मूल्यमापन केले पाहिजे.

डॉ. विश्वजित कदम म्हणाले, आज शिक्षणक्षेत्रात मोठी उलथापालथ होताना दिसते आहे. खाजगी शिक्षणसंस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. अशा परिस्थितीत सर्वप्रकारच्या शिक्षणसंस्थांचे काम जवळून पाहिलेल्या डॉ. भूषण पटवर्धन यांची उपाध्यक्षपदी निवड होणे ही आशादायक आणि दिलासा देणारी गोष्ट आहे. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मुकुंद सारडा यांनी आभार मानले.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)