सामाजिक बांधिलकीतून अमरनाथ यात्रेचा उपक्रम

श्रीकांत देवधर,यशवंत साळुंखे यांचा पुढाकार:उद्या भाविक रवाना होणार
सातारा:प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य वीज मंडळातील निवृत्त अधिकारी श्रीकांत देवधर व त्यांचे सहकारी यशवंत साळुंखे यांनी गेली 16 वर्षे एक सामाजिक बांधीलकीचा उपकम म्हणून भाविकांना अमरनाथ यात्रा घडवत असून यावर्षीचा भाविकांचा जथ्था रविवार दि 1 जुलै रोजी रवाना होणार आहे. ना नफा ना तोटा तत्वावर सहा हजार रुपयापासून सुरुवात करुन आता फक्‍त दहा हजार रुपयांत ते दरवर्षी पन्नास लोकांना अमरनाथ यात्रा घडवून आणतात.
अतिशय काटेकोर नियोजन, करुन यात्रा यशस्वीपणे पार पाडली जाते.स्वच्छ पारदर्शी व्यवहाराच्या माध्यमातून संपूर्ण माहिती देणारी पुस्तीका यात्रेपुर्वी दिली जाते.सर्व यात्रेकरुंची सभा घेउन शंका निरसन केले जाते.
याबाबत माहिती देताना देवधर म्हणाले, इतकी वर्षे मी अमरनाथला जातो.दरवर्षी नवनवीन अडचणी, अनेक घोटाळे, विस्कटणारे आयोजन, सोबत असणारी चित्रविचित्र स्वभावाची माणसे यामुळे विविध अनुभव येतात. पण ज्या क्षणी गुहेमध्ये पाऊल पडते त्याक्षणी पाठीवर एक आ9वासकतेचा हात फिरतो. मनामध्ये स्वत:बददलच्या आत्मविश्‍वासाची प्रबळ भावना तयार होते.तिथं पोचल्याक्षणी एकमेकांना साश्रू नयनांनी कडकडून मिठी मारली की, जग जिंकल्याचा आनंद मिळतो.
यात्रा काळात अनेक अडचणी येतात.एक अनुभव सांगताना देवधर म्हणाले, एके वर्षी पंचतरणी पाशी आमची काही लोकांची चुकामूक झाली. साधारण आठ-दहा लोक मागे राहीले होते. पाऊस सुरु झाला होता. पूर्व नियोजनाप्रमाणे त्याच दिवशी पहलगामला पोचणे अत्यावश्‍यक होते. काही थकलेल्या, वयोवृध्द लोकांना घोडयावरुन पुढे पाठवले होते. वाट बघण्यात बराच वेळ जात होता. पुढचे अंतर चालत पुरे करणे अवघड वाटू लागले, बरोबरच्या लोकांची घाई चालू होती. मन व्दिधा स्थितीत होते. मागे राहीलेल्या लोकांमध्ये महिलापण होत्या. काही सूचत नव्हतं.चालायला सुरुवात केली. पण मन प्रचंड बेचेैन ,सारखं आपलं चुकलं, आपण लोकांना वा-यावर सोडून आलो ही मंडळी आलीच नाहीत तर काय करायचे. एक ना अनेक विचारांत पाय सारखे अडखळत होते. नागाकोटीच्या पुढे आलो आता चंदनवाडी पाच सहा किलोमीटरवर आली. पण मागील लोक कुठे असतील त्यांना घोडे मिळतील का! ते निर्णय घेण्याची क्षमता दाखवतील का! पाऊसाची रिपरिप चालूच होती. वाटेवर एका मोठया दगडाआड एक वृद्‌ध यात्री शरीर दडवून पावसांपासून स्वत:ला सांभाळत होता. यशवंतराव पुढे झाले आणि त्यांच्या अंगावरचा रेनकोट त्यांनी त्या वृद्‌ध यात्रीच्या अंगावर घातला आणि कातर सुरात म्हणाले “पांडूरंगा’ माझी माणसं सुरक्षित राहू देतरे देवा. आणि त्याच क्षणी मागून घोडयावरुन येणा-या सौ. अपूर्वा महाजनी मॅडमचा आवाज आला, देवधर काका,साळुंखे काका, आम्हाला घोडे मिळाले , आम्ही सगळेजण व्यवस्थीत आहोत, काळजी करु नका.

अमरनाथ यात्रा काळात यशवंत साळुंखे यांच्या गाण्या बजावण्यांनी , भजनांनी पंधरा दिवस कुठे जातात कळत नाहीत. वर्षातून एकदा यात्रा करुन अमरनाथाचे दर्शन झाले की वर्षभर उत्साहाने काम करण्याची प्रेरणादायी आशिर्वाद मिळतो असा देवधर आणि साळुंखे यांचा विश्‍वास आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)