सामाजिक कामासाठी स्वत:पासून सुरुवात करा 

वाकडी, (वार्ताहर)- युवकांनी तसेच गावातील ग्रामस्थांनी अनावश्‍यक खर्चाला फाटा देवून त्या पैशातून गावातील रखडलेले जलक्रांती, वाड्यावस्त्यावरील रस्ते तसेच इतर सामाजिक प्रश्‍न मार्गी लावावे. सामाजिक कामासाठी स्वत:पासून सुरुवात करा, त्यासाठी मोठा वैचारिक बदल सध्या आवश्‍यक असल्याचे मत युवानेते डॉ. सुजय विखे यांनी व्यक्‍त केले.

राहाता तालुक्‍यातील वाकडी येथे पांडागळे वस्ती व पांढरी वस्ती येथील तलावाच्या जलपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मच्छिंद्र गोरे होते. डॉ. सुजय विखे म्हणाले की, कमी पर्जन्यमानामुळे तालुक्‍यातील बऱ्याच भागात दुष्काळ परीस्थिती निर्माण होते. यासाठी तुमच्याकडील थोडा पैसा हा जलसंर्वधन तसेच इतर रखडलेल्या सामाजिक प्रश्‍न सोडवण्याकरीता लावावा. त्याला येथून मागे आम्ही मदत केली आहे, तशीच यापुढे आम्ही मदत करू.

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसंर्दभात बोलताना या निवडणुकीत ग्रामस्थांतून सरपंचाची थेट निवड होणार असल्याने कित्येकांना तिकिटासंर्दभात उत्सुकता आहे. पण तिकीट मागण्या अगोदर स्वतःची चाचपणी करुन घ्या. जे ज्येष्ठ आहेत, त्यांनी थांबवून घ्या युवकांना पुढे येवू द्या, असा सल्लाही कार्यकर्त्यांना दिला. कोणी यावरुन जर नाराज झाले तर थांबून घ्या पण कोणीही बेशिस्त किंवा विरोधी कारवाया करत असेल तर संघटनेत ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. संघटना एक आहे, संघटीत रहा आणि संघटनेचा कार्यकर्ता म्हणून त्याच्या सन्मानार्थ त्याला पद दिले जातात, हा त्यांचा सन्मान आहे. संघटनेत पुढील काळात मोठा बदल घडवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)