सामाजिक कामांत पु.ल. यांची संवेदना जपण्याचा प्रयत्न

पुलोत्सवांतर्गत परिसंवादात उलगडले “पुलंचे सामाजिक भान’

पुणे – पु.ल.देशपांडे आणि सुनिताबाईंनी समाजातील अनेक व्यक्ती आणि संस्थांना मदतीचा हात दिला. आजही सामाजिक कामांत आम्ही त्यांची संवेदना जपत आहोत, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्यांनी पुलंचा सामाजिक पैलू उलगडला. पुलोत्सवांतर्गत आयोजित “पुलंचे सामाजिक भान’ या परिसंवादात सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट, गिरीश प्रभुणे आणि रेणू गावस्कर सहभागी झाले होते.

“सुनिताबाईंना खेड्यातून आलेल्या “आम्हांला शाळेतून काढून टाकतात, शेतात पाठवतात, कारखान्यावर पाठवतात’ असे सांगणाऱ्या एका मुलाच्या पत्रातून निर्माण होणारी “पन्नास पैशांची शाळा आणि शंभर रुपयांची शाळा’ अशी दरी पुलं आणि सुनीताबाईंना अस्वस्थ करत होती. समाजातील वंचित घटकांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड कळवळा होता’, असे रेणू गावस्कर म्हणाल्या.

“मला पुलंना भेटण्याची ओढ होती आणि बरेचदा तसे प्रयत्नही मी केले, त्यांच्या घरी गेलो. पण पुलंच्या लेखनात व्यत्यय नको म्हणून कर्तव्यदक्ष सुनिताबाईंनी मला परत पाठवले. माजगावकरांच्या “माणूस’च्या विशेषांकात मी 70-80 पानांचा लेख लिहिला होता. तेव्हा पुलंनी स्वतःहून माझी माहिती काढून मला घरी भेटायला बोलवले. भेटीनंतर आमचे सख्य जमले. सामाजिक काम करताना पुलंची संवेदना मी जपत गेलो. सांगली जवळील म्हैसाळ येथे एका सामाजिक प्रकल्पाला भेट देण्यासाठी ते आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या जयोस्तुते या गाण्यामुळे पुलं खूप हळवे झाले. सामाजिक क्षेत्रात नैराश्‍याचे अनेक प्रसंग येतात, अशावेळी पुलं, पु.शि. रेगे आदींचे साहित्य मनाला उभारी देण्याचे काम करते,’ असे गिरिश प्रभुणे म्हणाले.

“माझी आणि पुलंची ओळख बालगंधर्व रंगमंदिराच्या झोपडपट्‌टया हटवण्यावरुन झाली. त्याविषयी मी साधना साप्ताहिकात दीर्घ लेख लिहिला होता. पण कालांतराने आमच्यातील मतभेद दूर झाले आणि पुलं माझे आईबाप बनले. मतभेदाच्या काळातील कटूता कणभरही मनात न ठेवता त्यांनी मला आपलेसे केले. ओळख झाल्यानंतर ते आपल्या कुटुंबातच सामील करून घेत. आमच्या मुक्तांगणचा जन्म त्यांच्याच प्रेरणेने झाला. त्याच्या उभारणीत पुलंच्या आर्थिक पाठबळाचा सिंहाचा वाटा आहे,’ असे यावेळी डॉ.अनिल अवचट म्हणाले.

परिसंवादाचे सूत्रसंचालक डॉ. मंदार परांजपे यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. पु.ल. बाहेरगावी गेले, की हमखास काहीतरी विसरुन यायचे म्हणून सुनिताबाई त्यांची बॅग तपासत. पण आनंदवनाहून आल्यावर त्या बॅग कधीच तपासत नसत, कारण पु.लं. आनंदवनात स्वतःलाच विसरून येतात हे सुनिताबाईंना माहिती होते, अशी पुलंनी सांगितलेली आठवण परांजपे यांनी सांगितली


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)