खासदार वरुण गांधी
अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठात व्याख्यान
पुणे – “मी एकटा किंवा एकटी आहे, मी काय करणार, माझ्याकडे काही करण्यासाठी पैसे नाहीत असा विचार न करता मी बदल कसा घडवू शकेन, याचा विचार युवक व युवतींनी करावा आणि सामाजिक उद्योजकतेच्या माध्यमातून बदल घडवावा, असे आवाहन भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी आज येथे केले.
चऱ्होली येथील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठामध्ये “लर्न फ्रॉम द मास्टर्स’ या उपक्रमांतर्गत आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, कुलगुरू डॉ. ई. बी. खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
गांधी म्हणाले, फक्त पैसा, मोठ्या गाड्या बाळगल्याने आपण आयुष्यात यशस्वी झालो असे नसते. एखादे ताकदवान वादळ जसे झाडाला नष्ट करु शकते, तसेच एखादे मोठे संकटही आपल्याकडील पैसा नष्ट करु शकते. अशावेळी जर आपल्याकडे काही शिल्लक राहात असेल तर ते म्हणजे लोकांच्या सदिच्छा आणि आशीर्वाद. तरूणांनी आपले ध्येय दृष्टीकोन एकत्र आणून राष्ट्र उभारणीत केवळ कार्यकर्ता म्हणून नव्हे, तर सहयोगी म्हणून काम केले पाहिजे, जेणेकरून समाजात सकारात्मक बदल दिसून येईल. वरुण गांधी यांनी आपल्या भाषणामध्ये देशातील विविध भागात निरनिराळ्या कल्पना घेऊन सामाजिक कामातून आपले कर्तृत्व सिध्द केलेल्या युवक-युवतींची उदाहरणे दिली.
इंग्लंडमध्ये जसे याचिका प्रणालीच्या माध्यमातून संसदेत चर्चा घडवून आणता येते, तशीच सक्षमता भारतातही विद्यार्थ्यांतही यायला हवी. परंतु भारतीय युवकही माहितीचा अधिकार, सोशल मीडिया, नागरी पत्रकार अशा माध्यमांतूनही आपला आवाज बुलंद करू शकतात. समाजाच्या देण्याची परतफेड करावी, हा उत्तम धडा आपण शिकू शकतो, असेही ते म्हणाले. कुलगुरू डॉ. खेडकर यांनी प्रास्ताविक केले. संचालक मंडळ सदस्य हृदयेश देशपांडे यांनी आभार मानले.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा