साद-पडसाद: सतर्कतेमुळे दूरसंचार क्षेत्रातील आर्थिक लूट टळणार! 

जयेश राणे 

प्रीपेड सेवा वापरणाऱ्या ग्राहकांनी योग्य आणि नियमित रिचार्ज न केल्यास मोबाइल क्रमांक बंद करण्याची चेतावणी सेवा पुरवठादार कंपन्यांनी दिली होती. या पार्श्‍वभूमीवर दूरसंचार नियामक ‘ट्राय’ने मोबाइल कंपन्यांची खरडपट्टी काढत ग्राहकांकडे आवश्‍यक शिल्लक असेल तर सेवा बंद करता येणार नसल्याचा निर्वाळा दिला आहे. 

ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या विविध प्लान्स बाजारात आणत असतात. एका कंपनीने एक प्लान आणले तर दुसरी कंपनी तेच वा त्याही पेक्षा स्वस्त प्लान आणून ग्राहकांना आपल्याकडे खेचू पाहते. यामध्ये ग्राहकांना विविध पर्याय मिळत असल्याने आपले नोकरी-व्यवसाय, निवास यांच्या ठिकाणी कोणत्या कंपनीचे नेटवर्क उत्तम आहे, हे पाहून ग्राहक संबंधित कंपनीचे प्लान निवडतात. असे सर्व वातावरण एकंदरीतपणे टेलिकॉम क्षेत्रातील बाजारात अनुभवले जात आहे. मात्र यामध्ये अचानकपणे एक अमुलाग्र बदल अनुभवण्यास मिळाला आहे. आपल्या मोबाईलच्या खात्यात शून्य दिवस कालावधी असलेली रक्कम असली, तरी तिचा उपयोग करण्यासाठी प्रतिमाह म्हणजेच 28 दिवसांनी कमीतकमी 35 रुपयांचे रीचार्ज करणे (एअरटेल, व्होडाफोन यांची सेवा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी) अनिवार्य झाले. विशेषत: यामध्ये ‘इनकमिंग कॉल्स’च्या सुविधेला लक्ष्य करण्यात आले. मात्र संबंधित कंपन्यांची प्रीपेड सेवा वापरणाऱ्या ग्राहकांनी याविषयी दूरसंचार नियामक ‘ट्राय’कडे तक्रारी केल्याने त्यांची दखल घेत प्रीपेड सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा दिला आहे.

दरमहा किंवा ठरावीक कालावधीनंतर प्रीपेड ग्राहकांना रिचार्ज अनिवार्य करण्याची घालण्यात आलेल्या अटीचीही ‘ट्राय’ने गंभीर दखल घेतली असून, ग्राहकांनी कितीही रकमेचे रिचार्ज केले असले तरी, सेवा बंद करता येणार नसल्याची ताकीदही ‘ट्राय’ने कंपन्यांना दिली आहे.

बहुतांश ग्राहक आपल्याकडील काही प्रीपेड सीमकार्डचा उपयोग केवळ कॉल घेण्यासाठी करतात. कारण दुसऱ्या कंपनीच्या सीमचा उपयोग ते फोन करण्यासाठी करत असतात. येथे ज्या कंपनीच्या प्रीपेड सीमचा उपयोग केवळ कॉल घेण्यासाठी केला जात आहे. त्या ग्राहकाकडून कंपनीला काहीच लाभ होत नाही. उलटपक्षी तो कंपनीच्या नेटवर्कचा उपयोग करत असतो. नेमके हेच अचूकपणे हेरत अशा ग्राहकांकडूनही प्रतिमाह रीचार्च केले जावे यासाठी न्यूनतम 35 रुपये मूल्याचे रीचार्च करण्याचा नाहक भुर्दंडाचे भय ग्राहकांना दाखवण्यात आले. किंबहुना त्याप्रमाणे कार्यवाही करण्यास सुरवातही झाली आहे.

ग्राहकांना कोणत्याही प्रकारची पूर्व कल्पना न देता त्यांना हा भुर्दंड भरणे सक्तीने भाग पाडले गेले आहे. दुसरा मुद्दा असा की, प्रवासात असलेल्या आणि तातडीचा कॉल करण्यासाठी आटापिटा करत असलेल्या व्यक्तीची काय घालमेल होऊ शकते, हे अनुभवले आहे. पैसे कमावण्याची मोबाईलसेवा पुरवठादार कंपन्यांची ही कोणती पद्धत आहे ? पूर्व कल्पना देऊनही ग्राहकांनी रीचार्च केले नाही आणि सुविधा खंडित केली, तर त्यामागील कारण समजता येईल. अचानकपणे चालू केलेल्या अशा प्लानमुळे ग्राहकांची होणारी कुचंबना ध्यानात घेण्यात आलेली नाही. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षच करण्यात आले आहे, असे का म्हणू नये? टेलिकॉम क्षेत्रामध्ये एक पैशालाही प्रचंड महत्व आहे. असे असताना काही रुपयांतील रीचार्च यांना किती नफा मिळवून देईल, याचा अंदाज येतो.

टेलिकॉम सेवा आता विनामूल्य राहिलेली नाही. ‘इनकमिंग कॉल’ची जी शेवटची सुविधा राहिली आहे, तीही हिरावून घेण्यात आली आहे. असे वाटून कित्येक प्रीपेड सेवा केवळ जेमतेम रीचार्च करून वापरणारे ग्राहक चिंतीत झाले. मात्र दूरसंचार नियामक ‘ट्राय’ने ग्राहकांशी अचानकपणे धूर्त खेळी खेळणाऱ्या एअरटेल आणि व्होडाफोन या कंपन्यांची कानउघडणी करून ग्राहकांना दिलासा दिला आहे. ज्या ज्या ग्राहकांचे पैसे ‘अनिवार्य मासिक रीचार्च’च्या नावाखाली घेण्यात आले आहेत, ते तात्काळ त्यांच्या मोबाईलच्या खात्यात परत केले पाहिजे. तसेच ज्या ग्राहकांची सेवा खात्यात पुरेसे पैसे असूनही केवळ ‘अनिवार्य मासिक रीचार्च’ केला नाही म्हणून खंडित केली आहे, तीही तात्काळ चालू केली पाहिजे. या दोन गोष्टींवर तात्काळ कार्यवाही केली जाते का ? याकडे ट्रायने स्वतःहून लक्ष ठेवावे. याविषयी कार्यवाही करण्यास जेवढा विलंब केला जाईल त्याप्रमाणात आवश्‍यक तो घसघशीत दंड त्या सेवा पुरवठादार कंपन्यांकडून घेतला पाहिजे.

स्मार्ट फोनचा उपयोग करणारे कित्येक ग्राहक 3 महिने अथवा त्याहून अधिक कालावधीसाठीचा रीचार्च करत असतात. त्यामध्ये त्यांना प्रतिदिन काही मर्यादेपर्यंत उपयोग करण्यासाठी डेटा दैला जातो, अमर्याद कॉल सुविधा, काही एसएमएस अशा गोष्टींचा समावेश असतो. त्यामुळे या ग्राहकांपुढे न्यूनतम 35 रुपये रीचार्च करण्याचा प्रश्‍न आला नाही. ‘बेसिक फीचर्स’वाले फोन वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या देशात आजही अधिक आहे, विशेषता ग्रामीण भागात. हे प्रामुख्याने लक्षात घेतले पाहिजे. ग्राहक हित हा केंद्रबिंदू ठेवून व्यवसाय केल्यास ग्राहकांचा त्याला कसा आणि किती उदंड प्रतिसाद मिळतो, हे भारतातील दूरसंचार क्षेत्राने मागील 2 वर्षांत अनुभवले आहे. दूरसंचार क्षेत्रातील त्या क्रांतीमुळे मोबाईल कॉल्स, डेटा यांचे दर पुष्कळप्रमाणात अल्प झाले. शेजारील शत्रू राष्ट्र पाकिस्तानातील सुमारे 70 % नागरिकांना इंटरनेट म्हणजे काय, हे आजही माहित नाही तिथे भारताने मात्र दूरसंचार क्षेत्रात उत्तम प्रगती केली आहे. मात्र याचा अपलाभ उठवून प्रीपेड सेवा वापरणाऱ्या ग्राहकांचे खिसे रिकामे करू पाहणाऱ्या मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांना ट्रायने तडाखा देऊन ग्राहकांना न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यापासून रोखून ग्राहक आणि न्यायालय या दोहोंचाही वेळ, पैसे यांची बचत केली आहे. काही स्वार्थी निर्णय कसे असू शकतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे न्यूनतम ‘अनिवार्य मासिक रीचार्ज’ होय. जागरूक ग्राहकांमुळे ‘ट्राय’ला या प्रकरणात लक्ष घालावे लागले. ‘जागो ग्राहक जागो’ हे वाक्‍य जागरूक ग्राहकांनी सत्यात आणून देशातील कोट्यवधी नागरिकांची आर्थिक लूट होण्यास पायबंद घातला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)