साद-पडसाद: वेलिंगकर- पर्रीकर वादाचा फायदा कॉंग्रेसला?

राहुल गोखले

पर्रीकर यांचे बिघडलेले स्वास्थ्य, भाजपकडे पर्यायी नेतृत्वाची असणारी वानवा, मित्रपक्षांचा भाजपवर असणारा दबाव, या सगळ्यामुळे भाजपचे नेते सुभाष वेलिंगकर यांच्या राजकारण प्रवेशाने चिंताक्रांत झाले असल्यास नवल नाही. शिवाय वेलिंगकर यांनी उपस्थित केलेले मुद्दे हे कधी काळी भाजपचे मुद्दे होते. भाजपने या मुद्द्यांना कशी काळाच्या ओघात बगल दिली याचा प्रचार वेलिंगकर करणार आणि भाजपला बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पडणार हेही नक्‍की. एकूण वेलिंगकर यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश करून गोव्यातील राजकीय नाट्यात रंग भरले आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अत्यवस्थ असताना देखील भाजपाने खांदेपालट करणे टाळले आहे. पर्रीकर यांच्या जागी भाजपने कोणालाही नेतृत्व दिले तर ते भाजपच्या मित्रपक्षांना मान्य होणारे नाही आणि हा असंतोष वाढला तर सरकार कोसळण्याची शक्‍यता उरते. तेव्हा सत्ता टिकवणे हेच मुख्य उद्दिष्ट आता भाजपसाठी शिल्लक राहिले आहे असे निदान गोव्यातील तरी चित्र आहे. तथापि, अशा पद्धतीने सरकार आणि विस्कळीत प्रशासन किती काळ भाजप चालू ठेवणार आणि जनता ते किती काळ सहन करणार? त्यामुळेच बहुधा गोव्यात मुदतपूर्व निवडणुकांची शक्‍यता वर्तविली जात आहे. ती किती वास्तविक आहे लवकरच स्पष्ट होईलच. या पार्श्‍वभूमीवर, पर्रीकरांचे एकवेळचे मार्गदर्शक आणि गेली काही वर्षे कट्टर विरोधक झालेले सुभाष वेलिंगकर यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केल्याने भाजप अडचणीत येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. गोवा सुरक्षा मंच या पक्षात वेलिंगकर यांनी प्रवेश केला आहे आणि या पक्षाने पुढील मुख्यमंत्री वेलिंगकर हेच असतील, असा दावा करण्यास सुरुवात केली आहे.

वेलिंगकर 2016 मध्ये अचानक प्रकाशझोतात आले ते त्यांनी थेट पर्रीकर यांच्याविरोधात उघडलेल्या आघाडीमुळे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा प्रांताचे प्रमुख होते आणि पन्नासहून अधिक वर्षे संघाशी निगडित होते. तथापि “शाळांमध्ये मातृभाषेतून शिक्षण देणे बंधनकारक करावे आणि इंग्रजी शाळांना अनुदान देणे बंद करावे’, या मागणीसाठी वेलिंगकर यांनी दोन वर्षांपूर्वी बंडाचा झेंडा फडकविला होता. त्यावेळीही विधानसभा निवडणुका तोंडावर होत्या. पर्रीकर व भाजपचा पराभव करण्याचा चंग वेलिंगकर यांनी बांधला होता. त्या बंडाने जरी खळबळ निर्माण केली तरीही प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र वेलिंगकर भाजपला पराभूत करू शकले नाहीत. भाजपच्या जागांच्या आकड्यावर त्याचा थोडाफार परिणाम झाला होता. भाजपने जी स्वबळावर बहुमताची स्वप्ने पाहिली होती ती फलद्रुप होऊ शकली नाहीत. त्यावेळी कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. भाजपची मते वेलिंगकर घटकामुळे विभागली गेली हे निश्‍चित आणि त्याचा फटका भाजपला बसला. तरीही भाजप मित्रपक्ष जमवत सत्तेत पोहोचला. आता पर्रीकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे भाजपसमोर चिंता असतानाच वेलिंगकर पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत.

गोवा सुरक्षा मंचाने गोव्यात लवकरच निवडणुका होण्याचे भाकित केले आहे आणि आगामी निवडणुकांत 35 मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. शैक्षणिक माध्यमाबाबतची वेलिंगकर यांची भूमिका जशी कायम आहे, तद्वतच भाजपचा पराभव करण्याची ईर्ष्यादेखील कायम आहे. वर्ष 2016 मध्ये “भाजपचा पराभव’ हेच एकमेव उद्दिष्ट होते; आता सत्ताप्राप्ती हे गोवा सुरक्षा मंचाचे उद्दिष्ट आहे. एवढा मोठा पल्ला हा पक्ष गाठू शकेल काय, हा सवाल अस्थानी नाही. याचे कारण एकमेव मुद्द्यावर निवडणुका लढविल्या जात नाहीत आणि जर एखादा अधिक भावनिक मुद्दा आला तर तो मुद्दा प्रभावी ठरतो आणि ज्या एकमेव मुद्द्यावर एखाद्या पक्षाची सारी भिस्त असते तो मुद्दा विरून जातो.

इंग्रजी शाळांना सरकारने अनुदान देऊ नये हा कदाचित आंदोलनाचा विषय होऊ शकतो; परंतु तो निवडणुकीतील एकमेव मुद्दा होऊ शकत नाही याचे कारण निवडणूक नेहमी बहुविध मुद्द्यांभोवती फिरत असते. त्यातील काही मुद्दे तार्किक असतात तर काही भावनिक. परंतु निवडणुकीची दिशा या सगळ्यांचा एकत्रित परिणाम ठरवित असतो. गोवा सुरक्षा मंच जर सत्तेची स्वप्ने पाहात असेल तर त्या पक्षाला आपली भूमिका केवळ शाळांचे माध्यम किंवा अनुदान एवढ्यापुरते सीमित ठेवता येणार नाही. राज्यासमोर अनेक समस्या आहेत आणि त्याविषयी पक्षाला आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल. मुळात वेलिंगकर यांना तसा सक्रिय राजकारणाचा अनुभव नाही. तेव्हा त्यांचे नाव जेव्हा गोवा सुरक्षा मंच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करतो, तेव्हा पर्रीकर यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाशी वेलिंगकर यांच्या राजकीय अनुभवाची तुलना होणार यात शंका नाही. अखेर वेलिंगकर गोव्यात संघाचे नेतृत्व करीत होते आणि राजकारणाची धकाधकी निराळी असते. मतदारांना भुरळ घालण्यासाठी राजकीय पक्ष आपल्या तत्त्वांशी आणि धोरणांशी तडजोड करतात आणि व्यापक जनहित न पाहता लोकानुनयाच्या आहारी जातात.

आम आदमी पक्षाने असाच सचोटीच्या राजकारणासाठी राजकारणाचा मार्ग स्वीकारला होता. तथापि अल्प काळात त्या पक्षाची ती प्रतिमा राहिली नाही हे विसरता येणार नाही. तेव्हा वेलिंगकर त्याच मार्गाने जाणार नाहीत याची ग्वाही गोवा सुरक्षा मंच मतदारांना देऊ शकेल काय? वेलिंगकर यांना या सर्व प्रश्‍नांवर स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल. बंडखोरीच्या पार्श्‍वभूमीवर वेलिंगकर यांची दोन वर्षांपूर्वी संघातून हकालपट्टी झाली होती. आता राजकीय पक्षात प्रवेश करताना वेलिंगकर यांना आपले सहकारी व समर्थक गेल्या दोन वर्षांत कायम राहिले आहेत का, हे पाहावे लागेल.
या घडामोडींचे पर्यवसान वेलिंगकर यांच्या सत्तारोहणात होते; की भाजप सत्तेपासून वंचित राहण्यात होते की दोघांमधील भांडणाचा लाभ कॉंग्रेसला होतो हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल. वेलिंगकर यांना निवडणुकीच्या राजकारणात विजय मिळाला तर संघासाठी देखील तो मोठा धक्‍का आणि धडा ठरेल. त्यामुळेच वेलिंगकर यांचा राजकारणात प्रवेश ही मोठी घडामोड आहे यात शंका नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)