साद-पडसाद: लोकसभा निवडणूकांचे चित्र अस्पष्ट

अविनाश कोल्हे

भाजपाच्या मोदी-शहांचे ‘कॉंग्रेसमुुक्‍त भारत’चे स्वप्न अपुरे राहिले आहे. मुळात हे स्वप्नच वेडेपणाचे होते. कोणत्याही राजकीय तत्त्वप्रणालीचा पूर्ण पराभव कधीच होत नाही. आजही जर्मनीच्या अनेक शहरांत नवनाझी शक्‍ती मोठा प्रमाणात लोकप्रिय आहेत. 1991 मध्ये सोव्हिएत युनियनचा पाडाव झाल्यावर मार्क्‍सवादाचा मृत्यू झाला वगैरे दवंडी पिटली होती. मार्क्‍सवाद आजही प्रभावी आहे. मात्र, याचा अर्थ असाही नव्हे की, मे 2019 मध्ये देशात भाजप-विरोधकांचे सरकार सत्तेत येईल. मात्र, आजच्या लोकसभेत कॉंग्रेसचे जे 44 खासदार हे केविलवाणे संख्याबळ आहे, यात लक्षणीय वाढ होईल, एवढे निश्‍चित.

या वर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुका एवढया चुरशीच्या होणार आहेत व त्यासाठी एवढ्या वेगळ्या प्रकारच्या आघाड्या/ युती होणार आहेत की त्यापैकी अनेकांची कल्पनासुद्धा केली नव्हती. गेल्या रविवारी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्बल दोन तास भेट घेतली. याचा एक अर्थ असा की कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीत मनसेला सामावून घेतले जाईल. याची पुढची पायरी म्हणजे राज ठाकरे आता लवकरच राहुल गांधींना भेटणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्रातील एकूण 48 जागांपैकी 40 जागांवर एकमत झालेले असून आठ जागांचा तिढा आहे. या जागा म्हणजे अहमदनगर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, यवतमाळ, रावेर, औरंगाबाद आणि कोल्हापूर. या खेपेस कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस व्यवस्थित निवडणूकपूर्व युती करत आहेत. मनसेला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातील जागा मिळतील असा अंदाज आहे. लवकर उरलेल्या जागांबद्दल निर्णय होईल.

उत्तर प्रदेशात बसपा आणि सपा यांची युती झाली असून या युतीत ते इतर समविचारी पक्षांना सामील करून घेणार आहेत. मात्र बसपा-सपा युतीत कॉंग्रेसला स्थान नसेल. याचे वरवरचे कारण म्हणजे कॉंग्रेसने नोव्हेंबर/ डिसेंबर 2018 मध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांत बसपा व सपा यांचा योग्य तो मान ठेवला नाही. म्हणून आता उत्तर प्रदेश या राजकीय महत्त्वाच्या राज्यांतील युतीत कॉंग्रेसला स्थान दिलेले नाही. परिणामी कॉंग्रेस तेथे स्वबळावर लढणार आहे. याचसंदर्भात आतली बातमी म्हणजे कॉंग्रेसने या युतीत न जाणे या मोठ्या रणनीतीचा भाग आहे. सपा-बसपाच्या युतीमुळे बिथरलेल्या उच्चवर्णीय समाजाची भाजपाकडे एक गठ्ठा मतं जाऊ नये म्हणून कॉंग्रेस स्वबळावर लढेल, जेणेकरून उच्चवर्णीयांची मतं फुटतील. 2014 च्या निवडणुकांत भाजपाने उत्तर प्रदेशात 71 जागा जिंकल्या होत्या.
गेल्या रविवारी आणखी एक महत्त्वाची बातमी प्रकाशित झाली. कर्नाटकात मुख्यमंत्री कुमारस्वामी कॉंग्रेसच्या नेत्यांना महामंडळाची अध्यक्षपदं देण्याबद्दल नाराज आहेत. एवढेच नव्हे तर आमच्या पक्षाशी कॉंग्रेसला युती करायची असेल तर आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हाला कर्नाटकात 12 जागा पाहिजे, अशी जाहीर मागणी केली आहे.

केवळ एका दिवशी प्रकाशित झालेल्या बातम्यांवर वरवर नजर फिरवली तर असे दिसून येईल की आता सर्वच पक्ष लोकसभेच्या निवडणुकांसाठी तयारीला तर लागलेले आहेत शिवाय ते आता हर प्रकारे भाजपाला हरवण्याचे प्रयत्न करणार आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाची रणनीती आकार घेत आहे. याचा प्रत्यय बिहारमधील जनता दल (युनायटेड) शी युतीचा निर्णय जाहीर झाला तेव्हाच आला. बिहारमध्ये भाजपाने नितीशकुुमार यांच्या पक्षासाठी भरपुर जागा सोडल्या आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर झालेल्या युतीच्या फॉर्म्युल्यानुसार बिहारमधील एकूण 40 जागांपैकी भाजपाला 17, जनता दल (युनायटेड) 17 जागा लढवेल व रामविलास पासवान यांचा पक्ष सहा जागा लढवेल. विद्यमान लोकसभेत भाजपाचे बिहारमधून निवडून आलेले 22 खासदार आहेत. याचा अर्थ असा की आता भाजपाने तब्बल पाच जागा मित्रपक्षासाठी सोडलेल्या आहेत. याच लोकसभेत जनता दल (यू) चे फक्‍त दोन खासदार आहेत. याचा अर्थ या युतीसाठी भाजपा चार पावलं मागे सरकला आहे.

मात्र, हाच भाजपा महाराष्ट्रातील युतीसाठी (आज तरी) सेनेसमोर वाकायला तयार नाही. उलटपक्षी भाजपाचे काही ज्येष्ठ नेते ‘स्वबळावर लढू’ असे जाहीरपणे बोलायला लागले आहेत. सेना नेते तर केव्हापासूनच स्वबळावर लढण्याची भाषा वापरत आहेत. असे झाले तर महाराष्ट्रात तिरंगी लढती होतील. यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व ताज्या बातम्यानुसार मनसे या आघाडीचा फायदा होईल. अर्थात अजूनही घोडा मैदान तसे दूर आहे. मधल्या काळात काहीही होऊ शकते.

अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस दिसू शकतो. हे विधान भाजपाच्या गोटातच खळबळ माजवणारे ठरले. याचा साधा अर्थ असा की, 2019 भाजपप्रणीत रालोआचे सरकार असेल पण पंतप्रधानपदी नरेंद्रभाई मोदी नसतील तर कदाचित नितीन गडकरी असतील. ही शक्‍यतासुद्धा जोरदार आहे. आज असे जवळपास स्पष्ट झाले आहे की येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची खासदारसंख्या 200 च्या आसपास असेल व पुन्हा एकदा वाजपेयींच्या काळात होती तशी रालोआ अस्तित्वात येईल. 2019 च्या रालोआचे नेतृत्व नितीन गडकरीसारखा सर्व पक्षांत मित्र असलेला नेता करेल. मोदींना हटवण्यास जर भाजपा तयार नसेल तर कॉंग्रेस पुढाकार घेऊन ‘संयुक्‍त पुरोगामी आघाडी’चे सरकार बनवेल. हे लक्षात घेतले म्हणजे मग गडकरींची अलीकडची विधानं कोणत्या दिशेने अंगुलीनिर्देश करतात हे लक्षात येईल.

डिसेंबर 2018 मध्ये तीन राज्यांतील सत्ता गेल्यावर गडकरी म्हणाले होते की, जर पक्षनेतृत्व विजयाचे शिल्पकार समजले जाते तर मग त्यांनी अपयशाचीसुद्धा जबाबदारी स्वीकारली पाहिजे. असे सणसणीत व पक्षनेतृत्वाबद्दल जाहीरपणे प्रश्‍न उपस्थित करणारे विधान करण्याआधी वरच्या पातळीवर विचार झाला असला पाहिजे.

हे सर्व चित्रच एवढे गुंतागुंतीचे आहे की कोणाचे नेमके काय चालले आहे, कोण कोणाबरोबर आहे हे समजत नाही. ही अतिशय चक्रावून टाकणारी निवडणूक ठरणार आहे. हे सर्व इतक्‍या झपाट्याने बदलेल याचा अंदाज कोणालाच आला नाही. डिसेंबर 2017 मध्ये भाजपाच्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल कोणालाच शंका नव्हती. पण हे चित्र बरोबर एका वर्षांत बदलले. बाकी इतर गोष्टी आगामी काळात घडामोडी कशा घडतात यावर अवलंबून असेल. अजून देशात जबरदस्त घडामोडी घडत आहेत. यातून काय समोर येईल हे आज ठामपणे सांगता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)