साद-पडसाद : दहशतवाद आता “काश्‍मीर निवासी’ सैनिकांच्या दारी!   

जयेश राणे 

प्राणांची बाजी लावून सैनिक देशाचे रक्षण करत असतात, यात दुमत नाही. अपवाद सैनिकांच्या शौर्यावर शंका घेणाऱ्यांचा आहे. चांगल्या गोष्टीची निंदा करून वाचाळपणा करणे हेच त्यांच्या दृष्टीने शौर्य असते. म्हणूनच तर सैनिकांच्या घरापर्यंत पोहोचलेल्या दहशतवादाविषयी बोलताना त्यांची वाचाच बसलेली असते. सैनिकांसारखा त्याग यांना कधीच जमणार नाही. जे त्यागी व्यक्तीस नावे ठेवू शकतात त्यांच्या दृष्टीने दहशतवादीच त्यांचे “हिरो’ समजायचे का? सैनिकांचेच रक्षण कोण करणार अशी वेळ आली आहे का? असा प्रश्‍न पडावा असे सैनिकांविषयीचे प्रसंग संरक्षण मंत्रालयाकडे जनतेला अपेक्षित असे उत्तर मागत आहेत. 

काश्‍मीरचे निवासी असलेल्या सैनिकांवर प्राणघातकी आक्रमणे होत आहेत. दहशतवाद्यांकडे त्या सैनिकांची पूर्ण माहिती असल्याचे समजते. दहशतवाद्यांनी आपल्या युवा मुलाची घरामध्ये घुसून हत्या करणे, त्याला घरातून शस्त्राचा धाक दाखवून घेऊन जाणे, आदी प्रसंग सैनिकांचे पालक कसे पचवत असतील, याची केवळ कल्पनाच केलेली बरी. तेथील सैनिकांना सुट्टी घेऊन घरी जाणे कठीण होऊन बसणे, हेच मुळात तीव्र संतापजनक आहे. या माध्यमातून स्वतःचा धाक निर्माण करून भविष्यात सैन्यात भरती होण्याचा विचार काश्‍मीरच्या युवकांनी करू नये, यासाठी भ्याड पद्धतीने जिहादी व दहशतवादी स्थानिक सैनिकांना लक्ष्य करत आहेत.

जम्मू-काश्‍मीरमधील सीआयडी अधिकारी इम्तियाज अहमद मीर (वय 30) यांना अतिरेक्‍यांनी गोळ्या घालून ठार केले. पुलवामा जिल्ह्यात वाहिबाग येथे ही घटना घडली. आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी अधीर असलेले मीर यांनी दाढी काढून आपला चेहरा बदलून अतिरेक्‍यांना चकवा देत गावात जाण्याचा प्रयत्न केला, पण अतिरेक्‍यांनी त्यांना गाठलेच. पुलवामा येथूनच जिहादी आतंकवाद्यांनी 14 जूनला सैनिक औरंगजेब यांचे अपहरण करून त्यांना ठार केले. ईदच्या सुट्टीसाठी ते घरी जात असताना त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. औरंगजेब हे आतंकवादविरोधी पथकाचे सदस्यही होते. तसेच सप्टेंबर 2017 मध्ये दहशतवाद्यांनी उत्तर काश्‍मीरमधील बांदिपोरा जिल्ह्यात एका बीएसएफ जवानाच्या घरात घुसून त्याची हत्या केली होती. हुतात्मा सैनिकाचे नाव रमीझ अहमद पारे (वय 23) असे आहे. रमीझ राजस्थानात सेवा बजावत होते आणि ते सुट्टीवर आले होते. राष्ट्रीय प्रबोधिनी अकादमीमधून सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्‍त झालेला हा युवक नातेवाईकांच्या विवाहासाठी सुट्टीवर घरी आला होता. त्यास शस्त्रांचा धाक दाखवून विवाह-घरातून दहशतवादी घेऊन गेले. त्या युवा अधिकाऱ्याचा गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न केलेला देह दुसऱ्या दिवशी सकाळी तेथील परिसरामध्ये सापडला. त्यानंतर पुन्हा सैनिकांच्याविषयी पण वेगळ्या प्रकारची घटना काश्‍मीरमध्ये घडली आहे.

भारतीय सैन्याने मागील काही महिन्यांपासून काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांचे उच्चाटन करण्याची मोहीम अधिक तीव्र केली असून त्यास उत्तम यशही मिळत आहे. यादरम्यान काही बड्या दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांचा नायनाट करण्यात सैनिकांना मिळालेले यश नक्कीच प्रशंसनीय आहे. सैनिकांना मिळत असलेले हे यश म्हणजे दहशतवादी संघटनांच्या नाकावर टिच्चून पाय देत दहशतवाद्यांची कोंडी करणे आहे. त्यामुळे चवताळून उठलेले दहशतवादी आपला मोर्चा सैन्यामध्ये सेवेत असणाऱ्या काश्‍मीरच्या निवासी असलेल्या सैनिकांकडे वळवत असल्याचे दिसून येत आहे. दहशतवाद्यांच्या या नीतीकडे अधिक बारकाईने लक्ष देणे आवश्‍यक आहे. काश्‍मीरमधील राष्ट्रद्रोही लोक सैनिकांवर दगडफेक तर करतातच, तर आता दहशतवादी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना घरात घुसून लक्ष्य करत आहेत. सैन्याचे मनोबल खच्ची करण्याचा हा डाव उधळून लावला पाहिजे.

काश्‍मीरमधील युवकांनी सैन्यात दाखल होऊ नये आणि झाल्यास त्याचे परिणाम काय होतात, हेही दाखवून दिले जात आहे. जगात अशा घटना कोणत्या देशामध्ये घडत असल्याचे ऐकिवात, वाचनामध्ये नाही. दहशतवाद्यांची भारताविरुद्धची लढाई आता एका वेगळ्या टप्प्यावर आली आहे. त्यासाठी ते नवीन क्‍लृप्त्या लढवून आपण कुठपर्यंत पोचू शकतो हे दाखवून देत आहेत. कसेही करून सैनिकांना आपल्या धाकाखाली ठेवण्याचा त्यांचा आटापिटा सुरू आहे. सैनिकांच्या केसालाही धक्‍का लागल्यास काय होऊ शकते हे पाकिस्तानच्या भाडोत्री दहशतवाद्यांना दाखवून द्यायला हवे आहे. सैनिकांच्या दिशेने येणारी त्यांची प्रत्येक चाल उधळवून लावत त्यांना कंठस्नान घातले पाहिजे. दहशवाद्यांना शोधण्यासाठी सैनिक सातत्याने मोहिमा आखत असतात. या ठिकाणी दहशतवाद्यांनी सैनिकांविरुद्ध नियोजनबद्धपणे मोहीम आखून भ्याड हल्ले केले आहेत.

सैनिकाच्या घरापर्यंत दहशतवादी येऊन पोहोचणे म्हणजे देशाचा संरक्षणकर्ताच धोक्‍यात असल्याचे लक्षात येते. या सूत्राने उग्र रूप धारण करण्यापूर्वीच याविषयी संरक्षण मंत्रालयाने आपली तत्परता दाखवली पाहिजे. दहशतवाद्यांना सैनिकांच्या जागत्या पहाऱ्यामुळे काश्‍मीरमध्ये त्यांचे मनसुबे यशस्वी करण्यात अडचणी येत असतात. त्यामुळे त्यांच्यावरच हल्ले केले जात आहेत. विशेषत: काश्‍मीरचे निवासी असणाऱ्या सैनिकांनी सावध असणे अत्यावश्‍यक आहे. दहशतवादी पाळत ठेवून सैनिकांचा घात करू लागले आहेत. त्यामुळे काश्‍मीरच्या सैनिकांनी सुट्टीवर असतानाही शस्त्रसज्ज कसे रहाता येईल याचा संरक्षण मंत्रालयाने विचार केला पाहिजे, अशी स्थिती आहे. शत्रू फक्त सीमेवर नसून त्याने सीमा ओलांडून धुमाकूळ घालण्यास त्याने केव्हाच आरंभ केला आहे. कधी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सैनिकांच्या वाहनांचा ताफा जात असताना अंधाधुंद गोळीबार करणे, रस्त्यामध्ये भूसुरुंग लावणे तर आता सैनिकांच्या घरापर्यंत पोहोचण्यापर्यंत त्यांची मजल पोचली आहे. सैनिकांसोबत पोलिसांवरही काश्‍मीरमध्ये हल्ले सुरूच असतात. एका प्रार्थना स्थळाबाहेर सुरक्षेस तैनात असलेल्या पोलिसासह स्थानिक नागरिकांनी हुज्जत घालून त्याला केलेल्या अमानुष मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता.

शत्रूवर आक्रमण करण्यासाठी भारताला इस्रायल या देशाची युद्धनीती वापरण्यास पर्याय नाही. म्हणूनच तर इस्लामी राष्ट्रांनी वेढलेला तो देश आपल्या आक्रमकतेच्या बळावर त्या ठिकाणी स्वतःचे वेगळेपण टिकवून आहे. भारतात मात्र दहशतवाद्यांविरुद्ध लढताना सैनिक हुतात्मा होत आहेत, घरी सुट्टीवर पोहोचल्यावरही दहशतवाद सैनिकांचे प्राण घेत आहे. सैनिकांची ही असुरक्षितता प्रकर्षाने लक्ष वेधते. दुसरे सूत्र असे की पोलीस, सैनिकांच्या निवासी संकुलांवरही दहशतवाद्यांचे लक्ष असते. त्यांनी निवासी संकुलात घुसण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे आणि ती कायमच त्यांच्या निशाण्यावर असतात, हेही वेळोवेळी त्यांनी दाखवून दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)