साथी किशोर पवार प्रतिष्ठानकडून “सीड बॉम्ब’चा उपक्रम

पुणे, दि. 20 (प्रतिनिधी) – आपण निसर्गाचे देणे लागतो, याची जाणीव ठेऊन साथी किशोर पवार प्रतिष्ठानकडून गेल्या पाच वर्षांपासून सीड बॉम्ब हा उपक्रम राबविण्यात येत असून, यंदादेखील या प्रकल्पांतर्गत वृंदावन नर्सरी येथे सुमारे 2 हजार सीड बॉम्ब तयार करण्यात आले आहेत. प्रतिष्ठानच्या सचिव वंदना पवार यांनी याबाबत माहिती दिली.
सीड बॉम्ब ही जुनी संकल्पना असून, ती अनेक देशांत राबविली जाते. डोंगराळ भागात बियाणे पेरणे शक्‍य होत नाही. त्यामुळे काही देशांत हे सीड बॉम्ब हेलिकॉप्टरनेदेखील टाकण्यात येतात. हा उपक्रम अतिशय साधा-सोपा असून, तो लहानमुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच करता येतो. या उपक्रमात ब्रम्हदंड, मोसंबी, पेरू, पिंपळ, औदुंबर, खजूर, चिंच, सीताफळ, लिची अशा विविध प्रकारच्या बियांचे सीड बॉम्ब तयार करण्यात आले व 25 ते 30 जणांनी यात भाग घेतला. याअंतर्गत एकूण 2 हजार सीड बॉम्ब तयार करण्यात आले. याचे वारकऱयांनाही वाटप करण्यात येत असून, वारीच्या मार्गावरही बिया टाकण्यात येतील. प्रतिष्ठानचे सदस्य राहुल करमरकर आणि कुटुंबीय गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सामाजिक बांधिलकी, पर्यावरणासाठी छोटया प्रमाणात का होईना उन्हाळ्यात बिया साठवून त्याचे सीड बॉम्ब नेऊन पावसाळ्यात डोंगराळ भागात जाऊन टाकले, तर पर्यावरणाच्या प्रती खारीचा वाटा उचलला जाईल आणि जमिनीचे रक्षण होईल, असा संस्थेचा मानस आहे. त्याच दृष्टीने हा उपक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाला लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष व प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण ठाकुर, राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांचेही मार्गदर्शन लाभले. विश्वस्त डॉ. मंगळप्रभा देडगे, ऍड. संतोष म्हस्के हेही उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)