सात वर्षांच्या स्वानंदीची सिंहगडावर चढाई

लोणी काळभोर – आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील सात वर्षाच्या स्वानंदी सचिन तुपेने गिर्यारोहणात धडाडीने भाग घेत, नुकताच तिने मध्यरात्री सिंहगड किल्ला सर करण्याचा पराक्रम केला आहे.
स्वानंदी कुंजीरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सचिन तुपे यांची कन्या आहे. लोणी काळभोर येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे. सचिन तुपे यांना पहिल्या पासून व्यायामाची आवड आहे. जिम करण्या बरोबरच आठवड्यातील प्रत्येक रविवारी ते स्वतः तीर्थक्षेत्र रामदरा येथील डोंगरावर व्यायामासाठी जातात. गेल्या काही दिवसांपासून स्वानंदीही त्यांच्याबरोबर येथे येते.
शनिवार (दि. 28) मध्यरात्री साडेअकरा वाजता माजी सचिन तुपे, स्वानंदी, पंडित झेंडे, फक्त 23 मिनिटात दोर न बांधता लिंगाणा सर करणारे अनिल वाघ, सुमित तुपे आणि राहुल तुपे या चमूने सिंहगडाच्या दिशेने कूच केले. तब्बल साडेपाच तासांच्या व चौदा किलोमीटरच्या चढाई नंतर पहाटे पाच वाजता सर्व जण सिंहगडावर पोचले.
या मोहिमे संदर्भात बोलताना पंडित झेंडे म्हणाले की, सिंहगडावर रात्रीच्या वेळी चढाई करणे अवघड आहे. या मार्गावर एकूण चौदा टेकड्या आहेत. अनुभवाने आणि सरावानंतर अकरा टेकड्या सहज चढता येतात; परंतु शेवटच्या तीन टेकड्या चढताना खरा कस लागतो. ज्या गिर्यारोहकांना एव्हरेस्ट सर करायचे आहे ते सराव करण्यासाठी हा ट्रेक करतात. या ट्रेकमुळे गिर्यारोहकांचा दम (स्टॅमिना) वाढतो. काही गिर्यारोहक एका रात्रीत सिंहगड चढून परत पहाटेपर्यंत त्याच रस्त्याने खाली उतरतात. स्वानंदीने हा ट्रेक वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी यशस्वी पार केल्याने तिचे परिसरात कौतुक होत आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)