सात गावे व 76 वाड्या तहानलेली

शिरूर तालुक्‍यात टॅंकरने पाणीपुरवठा : प्रशासनाची कसरत

शेरखान शेख

शिक्रापूर- सध्या उन्हाची तशीच दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना आता शिरूर तालुक्‍यातील सुमारे सात गावे व तब्बल 76 वाड्या- वस्त्यांवर टॅंकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा सुरू आहे. शिरूर तालुक्‍यात नियोजन करण्यात आल्याची माहिती शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी दिली आहे.
शिरूर तालुक्‍याची जुनी ओळख दुष्काळी तालुका, अशी असताना आता देखील पुन्हा तालुक्‍यामध्ये अनेक गावांतील नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. सध्या शिरूर तालुक्‍यातील अनेक गावांमधील पाणीसाठा संपला आहे. विहिरींनी देखील तळ गाठला आहे. यापूर्वी अनेक गावांनी पंचायत समितीकडे पाण्यासाठी टॅंकरची मागणी केली होती. त्यावेळी प्रशासनाने शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात अठरा टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू केले होते. आता दुष्काळाची परिस्थिती पाहता प्रशासनाने टॅंकरच्या संख्येत वाढ केली आहे.

सध्या शिरूर तालुक्‍यातील मिडगुलवाडी, कान्हूर मेसाई, केंदूर, पाबळ, खैरेवाडी, धामारी, खैरेनगर या गावांसह तब्बल 76 वाड्या- वस्त्यांवर टॅंकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्यासोबत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी आहे. पशु पालकांनी टॅंकरच्या होणाऱ्या खेपांमध्ये वाढ करावी, अशी मागणी नागरिक व ग्रामस्थ करत आहेत. शिरूर तालुक्‍याला वरदान ठरलेल्या घोड धरणात सध्या शून्य टक्‍के पाणीसाठा शिल्लक आहे. 1900 घनफुट इतका मृतसाठा धरणात शिल्लक असल्याची माहिती घोड धरणाचे कनिष्ठ शाखा अभियंता रावसाहेब तळपे यांनी दिली आहे.

घोड धरणावर अवलंबून असलेल्या शिरसगाव काटा, पिंपळसुटी, इनामगाव गावांना धरणात पाणीसाठा शिल्लक नसल्यामुळे पाण्याचे आवर्तन येईपर्यंत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. कुकडी प्रकल्पातून डिंभे धरणातून घोड नदीपात्रात पाणी सोडल्याने बेट भागातील काठापूर, पिंपरखेड, कवठे येमाई, फाकटे, आमदाबाद, टाकळी हाजी या घोडनदी काठावरील गावांना पाणी मिळाल्याने तात्पुरता दिलासा मिळाला आहे. शिरूर तालुक्‍यामध्ये महत्वाचे चासकमान धरण आहे. परंतु चासकमान धरणात देखील सध्या फक्‍त वीस टक्‍के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती चासकमान विभागाचे उपविभागीय अभियंता राजेश भावसार यांनी दिली आहे. पिण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाचा उपयोग फक्त पिण्यासाठी केल्यास निच्छितच पाणी पुरेल आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटेल असे देखील भावसार यांनी सांगितले आहे.

  • हिवरेत तिघांकडून पिण्याचे पाणी
    हिवरे येथे देखील पिण्याच्या पाण्याची टंचाई आ वासून उभी आहे. काही ठिकाणी टॅंकरने होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी माजी सरपंच राहुल टाकळकर व अनिल तांबे, रामदास धायरकर यांनी त्यांच्या विहिरीतील तसेच बोअरवेलचे पाणी नागरिकांना पिण्यासाठी खुले करून दिले असल्याची माहिती सरपंच राजाराम गायकवाड यांनी दिली आहे.

    पाणीपातळी वाढविण्याचा खटाटोप
    शिरूर तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये पाण्याची मोठी समस्या उभी राहिली आहे. विहिरींनी सुद्धा तळ गाठला असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अशक्‍य झाले आहे. त्यामुळे उभी पिके देखील पाण्याअभावी जळून गेली आहेत. जळलेली पिके पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सध्या अनेक ठिकाणी दुष्काळाचे सावट पसरलेले असताना शेतातील विहिरी देखील कोरड्या पडलेल्या आहेत, त्यामुळे कित्येक ठिकाणचे शेतकरी हे शेतातील विहिरींचा गाळ काढून घेत आहेत, त्यामुळे पुढील वर्षी पाण्याच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी आत्ता विहिरी कोरड्या असल्यामुळे विहिरींचा गाळ काढून पाण्याची पातळी वाढविण्याकडे शेतकरी भर देत आहे.

  • विक्री होणाऱ्या पाण्याची चाचणी गरजेची
    सध्या शिरूर तालुक्‍यात उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आहे. पुणे शहरालगतच्या तसेच तालुक्‍याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अनेक गावांत नागरिक पिण्यासाठी पाणी विकत घेत आहेत. या पाण्याबाबत दर्जा, गुणवत्ता नसल्यामुळे काही व्यावसायिक दुष्काळात पाणीदार मलई खात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडला जात आहे. दुष्काळाचा गैरफायदा घेत पाणी विक्री करणारे व्यावसायिक मिळेल त्या ठिकाणहून पाणी घेऊन पाणी विक्री करीत आहेत. परंतु याकडे संबंधित विभागाचे लक्ष नाही. नागरिक देखील पाणी घेतात. परंतु विक्री होणाऱ्या पाण्याची चाचणी होणे गरजेची आहे.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)