सात कोटींचा पादचारी पूल धूळखात

बी. के. चौधरी
भोसरी – भोसरी येथील पीएमटी चौकात वारंवार होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन पुणे-नाशिक महामार्गावर शितलबाग ते धावडेवस्ती दरम्यान एक किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात आला. 75 लाख रुपये तरतुदीचा हा पूल 7 कोटी खर्चापर्यंत पोहचला. मात्र, नागरिकांकडून पुलाचा वापरच होत नसल्याने पुलावरील खर्च धुळीत गेल्याची चर्चा भोसरीकरांमध्ये आहे.

महापालिकेने भोसरीमध्ये पुणे-नाशिक महामार्गावर शंभर कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल उभारला. शितलबाग येथे हा उड्डाणपूल संपल्यानंतर असणाऱ्या तीव्र उताराजवळ भरधाव वाहने येत असल्यामुळे अपघात होतात. अशा परिस्थितीत नागरिकांना रस्ता ओलांडताना अक्षरश: कसरत करावी लागते. त्यामुळे शितलबाग येथे पादचारी पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या पादचारी पुलासाठी सुरूवातीला 71 लाख 5 हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. परंतु, बांधकाम साहित्यात वाढ झाल्याचे कारण पुढे करीत सुरूवातीला हा खर्च अडीच कोटींवर नेण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या पुलाच्या खर्चात वाढ तब्बल आठ पट वाढ करून तो साडेपाच कोटींवर नेण्यात आला. यानंतर या पादचारी पुलासाठी एका सपोर्ट कॉलमऐवजी दोन सपोर्ट कॉलम उभे करण्याच्या नावाखाली खर्चात आणखी दोन कोटी रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे या उड्डाणपुलाचा खर्च 71 लाखांवरून थेट साडेसात कोटी रुपयांवर पोहचला. खर्चातील भरमसाठ वाढीमुळे हा पूल वादाच्या भोवऱ्यात अडकला. अनेक आरोप-प्रत्यारोपानंतर अखेर हा पूल खुला करण्यात आला. ह. भ. प. ज्ञानोबा भिमाजी लोंढे यांचे या पुलाला नाव देण्यात आले. मात्र, या पुलाचा नागरिकांकडून वापरच होत नसल्याचे पहायला मिळत आहे. पुलाची अवस्था देखील दयनीय झाली आहे. जवळच शितलबाग बस स्थानक व गव्हाणे वस्तीत बाजारपेठ असल्यामुळे लोकांची ये-जा सुरूच असते. मात्र, पुलाऐवजी जीव धोक्‍यात घालून नागरिक रस्ता ओलांडत आहेत. या ठिकाणचे रस्ता दुभाजकांचीही दुरावस्था झाली आहे. महापालिकेन एवढा मोठा खर्च करून हा पादचारी पुल बांधण्याची येथे खरच गरज होती का, असा सवाल उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)