साताऱ्याला परतीच्या पावसाने झोडपले

सातारा- सकाळी गारठा अन्‌ संध्याकाळी पाऊस अशा विचित्र वातावरणाचा सामना करणाऱ्या साताऱ्याला परतीच्या पावसाने गुरूवारी जोरदार तडाखा दिला. सातारा शहरासह जिल्ह्याच्या पूर्वभागात अवघ्या पावणेदोन तासात सरासरी 24.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मात्र साताऱ्याच्या पूर्व भागात सरासरीच्या केवळ 71 टक्केच पाऊस झाला असून परतीच्या पावसाचा रब्बी हंगामाला फारसा फरक पडणार नसल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

रयत शिक्षण संस्थेच्या शतकी वाटचालीच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्याचे राजकारण हेलकावे घेत असताना महाबळेश्वर जावली सातारा कोरेगाव या चार तालुक्‍यात पावसाने जोरदार सलामी दिली. दुपारी अडीच ते सव्वाचार व सायंकाळी पाच नंतर मुसळधार पावसाला सुरवात झाल्यानंतर जनजीवन अस्तव्यस्त झाले. सातारा शहरात तब्बल तीन तास विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाल्याने शहराच्या पूर्व भागात पाणीच पाणी झाले.

-Ads-

गणेशोत्सवात पावसाने उघडीप घेतली होती मात्र 29 सप्टेंबरपासून मध्यपूर्व भारतातून (राजस्थान) येथून पावसाने माघारीचा प्रवास सुरू केला आहे. त्यातच अरबी समुद्र व बंगालचा उपसागर दोन्ही ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पश्‍चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र व मराठवाडयाच्या पूर्व भागाला येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा फटका बसेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने जिल्हयाच्या पूर्व भागात कोणतीही वित्तहानी अथवा नुकसान झाल्याचे वृत्त नाही. मात्र बळीराजाची रब्बी हंगामाची काळजी मात्र वाढली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)