साताऱ्यात 86 किलो गांजा जप्त 

खटाव तालुक्‍यातील दोघे ताब्यात : सात लाखाचा मुद्देमाल जप्त 

 
सातारा, दि. 7 (प्रतिनिधी) –
खटाव तालुक्‍यातून कराडमार्गे साताऱ्याला गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना 86 किलो गांजासह पोलिसांनी अटक केली. यावेळी पोलिसांनी गांजा, एक कार, दुचाकी असा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. शंकर विलास जाधव, लक्ष्मण अंकुश जाधव (दोघे रा. पळशी. ता. खटाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी रात्री उशिरा सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 
कराडहून एक सॅन्ट्रो कार साताऱ्याच्या दिशेने गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती साताऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख यांना खबऱ्याकडून मिळाली होती.
त्यानुसार शेख यांनी कर्मचाऱ्यांसह महामार्गावर सापळा लावला होता. दरम्यान, माहिती मिळालेल्या वर्णनाची कार समोरून आल्यावर पोलिसांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, कारचालकाने पळुन जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसांनी कार थांबवून कारची झडती घेतली. त्यावेळी गांजा, वजनकाटा मिळून आला. पोलिसांनी शंकर जाधव, लक्ष्मण जाधव यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी तो गांजा साताऱ्यात विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले आहे.
त्यांच्याकडून 86 किलो गांजा, सॅन्ट्रो कार (एमएच 11 वाय 3796) दुचाकी (एमएच 11 एस 1541) व मोबाईल असा सात लाख 96 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह पोलिस हवालदार इनायत मुल्ला, चंद्रकांत ओव्हाळ, विजय देशमुख, मुस्तफा शेख, सुभाष भुरे, सचिन पाटील, संदीप दौंड, महिला पोलिस प्रतीभा कर्पे यांनी कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील दोघांनी गांजा कुठून आणला, कोणाला विक्री केली जाणार होता याची माहिती पोलिस घेत आहेत
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)