साताऱ्यात स्वातंत्र्यदिनी सायकल क्रांती रॅली

सातारा – सातारा सायकल कम्युनिटीतर्फे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने येत्या मंगळवारी साताऱ्यात अमर सायकल्सच्या सहकार्याने एक हजारहून अधिक सायकलपटूंच्या सहभागातून सायकल क्रांती रॅली काढण्यात येणार आहे. सलग चौथ्या वर्षी होत असलेल्या या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन आशिष जेजुरीकर यांनी केले आहे.

येथे हॉटेल सितारामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. जेजुरीकर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि प्रकृती स्वास्थ राखण्याच्या दृष्टीने सायकलिंग महत्वाचे आहे. पूर्वी गरज म्हणून सायकल चालविली जायची. मात्र आता पर्यावरण संतुलन आणि प्रकृती उत्तम राखण्यासाठी सायकल शिवाय पर्याय नाही. सध्या देशातील सायकल पटूंची संख्याही वाढत असून विविध क्षेत्रातील व्यक्‍ती आणि सर्वच वयोगटातील नागरिकांचा सायकलिंगकडे ओढा वाढू लागला आहे. फिटनेस पार्टनर म्हणूनही सायकलचा जाणकरांकडून आवर्जुन उल्लेख होतो.

स्वातंत्र्यदिनी सकाळी 10. 30 वाजता तालीम संघ मैदानापासून सायकल रॅलीस प्रारंभ होईल. तेथून राजवाडा मार्गे मोती चौक. 501 पाटी, शेटे चौक, पोवई नाका, शाहू स्टेडियम, पोलीस परेड मैदान, जुना आरटीओ चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट आणि पुन्हा तालीम संघ मैदान असा रॅलीचा मार्ग असेल, अशी माहितीही यावेळी श्री. जेजुरीकर यांनी दिली. जयंत लंगडे यांनी प्रास्ताविक केले. रश्‍मी साळवी यांनी आभार मानले. या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी अमर सायकल एजन्सी, गिते बिल्डींग समोर, सातारा आणि फायरफॉक्‍स बायक स्टेशन, सायली हॉटेल समोर, पोवई नाका सातारा. (मोबा : 8855880593) येथे संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस बारामती-पुणे सायकल स्पर्धा विजेत्या शिल्पा पवार, कन्याकुमारी ते लेह-लडाख सायकलिंग करणारे विनय नाईक, सातारा – बॅंगलोर सायकलिंग करणारे धनंजय जगताप, तुषार भोईटे, विशाल बाबर, निलेश मोरे, सुपर्ण देसाई आदी प्रसिध्द सायकलपटू व संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)