साताऱ्यात पोलीस यंत्रणेचीच विघ्नहर्त्याची भूमिका

सातारा – राजधानीत यंदा प्रथमच श्रींच्या विसर्जनाचा प्रश्न नको इतका ताणला गेला आहे. मंगळवार तळे विसजनावर कायदेशीर चपराक मिळाल्यावर खट्टू झालेल्या गणेश भक्तांना गोडोली तळ व कण्हेर खाणीच्या तलावाचा विचार करावा लागणार आहे. अशावेळी सातारा पोलीस यंत्रणेने साताऱ्यातील तलाव, कृत्रिम तळे मार्गावरील पाहणी करुन श्री गणराय भक्तांना दिलासा दिलेला आहे. जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेनेच खऱ्या अर्थाने सातारकरांसाठी विघ्नहर्त्याची भूमिका घेतली आहे.

राजवाडा येथे सकाळी 11 वाजता पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक विजय पवार, उपअधीक्षक गजानन राजमाने, पोनि नारायण सारंगकर, वाहतूक शाखेचे पोनि सुरेश घाडगे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते शरद काटकर यांनी प्राथमिक चर्चा करुन संपूर्ण सातारा शहरातील श्री गणरायाच्या विसर्जन मार्गाची पाहणी करण्याचे निश्‍चित केले. त्यानुसार समर्थ मंदिर, बोगदा, शाहू उद्यान, डॉ. आंबेडकर चौक, गोडोली तळे, कल्याणी शाळा, दगडी शाळा, हुतात्मा स्मारक येथील संभाव्य कृत्रिम तळे व नगरपालिकेच्या पोहण्याच्या तलावाची पाहणी केली.

तसेच मोठ्या गणरायांच्या मूर्तीसाठी कण्हेर येथील जलसागर तलाव निश्‍चित होणार असल्याने त्यादृष्टिनेही सध्या चर्चा होत आहे. पोवई नाक्‍यावरील भागात असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी तातडीने ग्रेड सेपरेटरच्या एका भागाचे काम पूर्ण करुन हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. परंतू पाडव्यापासून गेली तीन महिने याठिकाणच्या दुतर्फा असलेल्या व्यापारी, लघु व्यवसायिक यांचे तब्बल लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही. त्यामुळे आता विसर्जन तळ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनीच आता पुढाकार घेतला आहे.

त्यामुळे हा विसर्जनाचा प्रश्न सोडविण्यासाठी शहराच्या नजिक असलेल्या पोहण्याचा तलाव, कृत्रिम तळे व कण्हेर धरणानजिकचा जलसागर तलाव व माहुलीतील कृष्णा नदीच्या पात्रात देखभाल दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने श्री गणरायाला आनंदाने निरोप मिळणार आहे.

घरगुती व सार्वजनिक गणेश विसर्जन मार्गावरील अनाधिकृत टपऱ्या, फेरीवाले यांना हटविण्यात येणार आहे. सातारा शहरात 70 सार्वजनिक गणेश मंडळे व 80 हजार घरगुती गणरायाचे विसर्जन करताना डॉल्बी बंदी ही कायम करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी श्री गणरायाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला श्री गणरायाच्या मूर्तीची उंची कमी करण्याची सूचना माहिती कार्यालयामार्फत प्रसारित करण्यात आली. तत्पुर्वीच अनेक उंच असलेल्या मूर्ती मंडपामध्ये दाखल झाल्याही होत्या.

ही बाब अनेकांना खटकली असली तरी विघ्नहर्ता सर्व विघ्न दूर करेल, याची सातारकरांना खात्री आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणून पोलीस यंत्रणेने विसर्जनाच्या दहा दिवसांपूर्वीच विसर्जन मार्ग व तळ्याची पाहणी केली आहे. याबाबत कायदा व सुव्यवस्था याला प्राधान्य देण्यात आले असून साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे. सातारा शहर हे पुरोगामी आहे. अनेक विचारवंत साताऱ्यात आहेत. त्यांनी वर्षभर प्रबोधन केले आहे, पण सध्या सार्वजनिक उत्सवामध्ये त्यांच्या प्रबोधनाची खरी गरज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)