साताऱ्यात ध्वनीक्षेपकांना पाच दिवस परवानगी

सातारा – जिल्ह्यात साजरा करण्यात येत असलेल्या गणेशोत्सवासाठी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी ध्वनीक्षेपक तसेच ध्वनीवर्धकांसाठी शेवटच्या पाच दिवसांसाठी अट शिथिल केली आहे. संबंधित गणेशोत्सव मंडळांवर ध्वनीमर्यादा व त्यासंबंधीच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करणार्या गणेशोत्सव मंडळांची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्यांवर निश्‍चित केली आहे.

जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षकांनी सार्वत्रिक गणेशोत्सवात 5 दिवस सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांच्या वापरासाठी सूट मिळण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सवासाठी शासन निर्णयात दिलेल्या निर्देशानुसार ध्वनीची मर्यादा 5 दिवसांसाठी शिथिल केली आहे.

त्यानुसार 29 व 31 ऑगस्ट, 3, 4, 5 सप्टेंबर या कालावधीत सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक सुरु ठेवण्यासाठी सवलत दिली आहे. ध्वनीमर्यादेचे व त्यासंबंधी केलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना पोलिसांनी कराव्यात. तसेच उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदूषणासंदर्भात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करणे व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांच्यावर निश्‍चित करण्यात आली आहे.

ध्वनी प्रदूषण अधिनियमांतर्गत स्थापन केलेल्या ध्वनी प्राधिकरणाने त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारींवर उच्च न्यायालयाच्या आदेशप्रमाणे कार्यवाही करावी. शिवाय प्राधिकरणाने निदर्शनास आणून दिलेल्या बाबींवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकार्यांनी पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)