साताऱ्यात ढोल-ताशा तर फलटणात डीजे, बहोत ना इन्साफी है…!

सम्राट गायकवाड
सातारा- गणेशविसर्जन मिरवणुकीत साताऱ्यात डॉल्बी वाजणारच असा इशारा खुद्द खासदार उदयनराजे यांनी देवून ही आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी मर्यादित आवाजापर्यंत डॉल्बी वाजवायला परवानगी देण्याची मागणी करून ही साताऱ्यात मिरवणुकीच्या अखेरपर्यंत डॉल्बी वाजलाच नाही. तर दुसऱ्या बाजूला मात्र, फलटणच्या रात्रमनगरीने मागणी-बिगणी करण्याच्या भानगडीत न पडता थेट (छोटासा) डीजे वजा अपारंपारिक वाद्य लावल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या प्रकाराच्या निमित्ताने पोलीस प्रशासनाने ज्या पध्दतीने महाराष्ट्रासह साताऱ्यातही डॉल्बी तथा डीजे वाजूच नये यासाठी तत्परतेने प्रयत्न केले त्याप्रकारे प्रयत्न फलटणमध्ये का केले नाहीत यासह अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

डॉल्बीला गेल्या काही वर्षात नको एवढे महत्व प्रथमच यंदाच्या वर्षी प्राप्त झाले. त्यामागे आगामी निवडणुका हे राजकीय कारण निश्‍चितपणे आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर डॉल्बीच्या निमित्ताने राज्यातील प्रमुख शहरांमध्ये अनुचित घटना टाळण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात डॉल्बीला बंदी असेच प्रतिज्ञापत्र सादर केले. परिणामी न्यायालयाने डॉल्बीवरील बंदी कायम ठेवली. साहजिकच त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची अंतिमत: जबाबदारी पोलीस प्रशासनावर येवून ठेपली. त्या आदेशाचे काटेकोर पालन व्हावे यासाठी पोलीसांनी सातारा शहरातून विद्यार्थ्यांची प्रबोधनात्मक रॅली काढली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याचबरोबर विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी साताऱ्यात सुरूवातीला जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबत व दुसऱ्यांदा गणेशोत्सव मंडळे यांच्या सोबत बैठक घेवून डॉल्बीतील हवा जवळपास काढून घेतली त्याच बरोबर लोकप्रतिनिधींशी संघर्ष नव्हे संवादातून मिरवणूका शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून खा.उदयनराजे यांचा मान राखण्याचा प्रयत्न देखील केला. तर दुसऱ्या बाजूला पोलीसांनी साताऱ्यात डॉल्बी सिस्टिम येवूच नये यासाठी सर्वोतपरी कायदेशीर मार्ग अवलंबिले.

परिणामी साताऱ्यातील यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुक पारंपारिकच वाद्य वाजविले जाणार, हे सर्व मार्गाने निश्‍चित झाले होते. हे ओळखूनच खा.उदयनराजे यांनी गर्जना करून देखील आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर एक पाऊल मागे घेत विसर्जन मिरवणुकांना अनुपस्थित राहिले. एकूणच साताऱ्यात खासदारांनी गर्जना करून आणि आमदारांनी मागणी करून देखील साताऱ्यात ढोल ताशा अन बॅंजो वगळता काही वाजलेच नाही. तर दुसऱ्या बाजूला मात्र फलटण शहरात डीजे सदृश्‍य भल्या मोठ्या आवाजातील मिरवणुकीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला.

व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत. पोलीसांनी राज्यात अन साताऱ्यात देखील पारंपारिक वाद्य वाजविणे बंधनकारक केलेले असताना फलटणमध्ये अपारंपारिक वाद्य वाजविण्यास पोलीसांनी परवानगी कशी अन कोणत्या निकषाच्या आधारे दिली ? मिरवणुकीत वाजविण्यात आलेल्या अपारंपारिक वाद्यांचे डेसिबल मोजण्यात आले ? यासह असंख्य प्रश्‍नांची उत्तरे येत्या काळात पोलीसांना द्यावी लागणार आहेत. कारण, प्रश्‍न उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)