साताऱ्यात चार जानेवारीपासून 20 व्या ग्रंथमहोत्सवास प्रारंभ

डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्‌घाटन

सातारा – ज्येष्ठ नाटककार रा. ग. गडकरी, ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगूळकर, साहित्य शिरोमणी पु. ल. देशपांडे, ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे या महनीय व्यक्तीच्या जन्मशताब्दी वर्षाची आठवण ठेवणारा विसावा ग्रंथ महोत्सव 4 जानेवारीपासून येथील सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर सुरु होत आहे. डॉ. बापूजी साळुंखे नगरीत भरणाऱ्या ग्रंथ सोहळ्याचे उद्‌घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होत आहे. अशी माहिती संमेलनाचे कार्यवाह डॉ. यशवंतराव पाटणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी शिरीष चिटणीस उप स्थित होते. या उद्‌घाटन सोहळ्याचे अध्यक्ष खासदार उदयनराजे भोसले असून जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, यांची प्रमुख उपस्थिती आहे. दि. 4 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान चालणाऱ्या या ग्रंथ महोत्सवात कवी संमेलन, परिसंवाद, सांगितिक मेळावे,बाळगोपाळांचे गुणदर्शन, ज्येष्ठ साहित्यिकांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे यथोचित स्मरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 4 जानेवारी रोजी सकाळी ग्रंथदिंडीने महोत्सवास प्रारंभ होणार आहे. सोहळ्याच्या पहिल्या दिवशी दुपारी दोन वाजता ढासळते पर्यावरण व युवकांसमोरील आव्हाने हा परिसंवाद होणार असून पर्यावरण अभ्यासक अभिजित घोरपडे, जिवितनदीच्या संस्थापिका आदिती देवधर सहभागी होणार आहेत.

सायंकाळी साडेपाच वाजता हर्षाल पाटील यांचा नली एकल नाटय प्रयोग सादर केला जाणार आहे. सायं 7 वा आनंद माडगूळकर प्रस्तुत ‘माझ्या खिडकीतून गदिमा’ हे ग्रंथ सोहळ्याच्या पहिल्या दिवसाचे विशेष आकर्षण आहे. एल आकाराची रचना असणाऱ्या ग्रंथ सोहळ्यात तब्बल 110 स्टॉल्स सहभागी होणार आहेत. त्या नंतर दि.7 जानेवारी पर्यंत विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे नियोजन पुढीलप्रमाणे दि. 5 जानेवारी रोजी इतर कार्यक्रमांबरोबर सायं 5 वा पु. ल. एक आनंदयात्री हा कार्यक्रम प्रा. संभाजी पाटील आणि सहकारी सादर करणार आहेत. सायं 7 वा शिव कन्या राणू अक्‍का फेम अभिनेत्री अश्‍विनी महांगडे यांची प्रकट मुलाखत प्रदीप कांबळे घेणार आहेत.

रविवार दि. 6 रोजी कृतज्ञता सोहळ्यात स्वामी विवेकानंद या विषयावर डॉ. दत्त प्रसाद दाभोलकर यांचे व्याख्यान होणार आहे. सोमवार दि. 7 रोजी सकाळी 11 ते 1.30 इथे घडतात वाचक या परिसंवादात प्रकाश पायगुडे, प्रा. शैलजा माने सहभागी होणार आहेत. सायं 5 वा. कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायं 7 वा. मंगलमय पवित्र देशा राम गणेश गडकरी यांच्या साहित्य कृतीवर आधारीत संगीत कार्यक्रम होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)