साताऱ्यात ऐतिहासिक हौदाचे राजकारण पुन्हा एकदा लागले रंगू

सातारा – श्री विसर्जन मिरवणुकीचा गुंता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नगरपालिकेने सोडवला असला तरी सातारा विकास आघाडीतल्या काही महाभागांनी दुसऱ्याच्या वॉर्डात डोके घालून विनाकारण राजकीय ताण वाढविण्याचे उद्योग सुरु केले आहेत. रामाचा गोट परिसरातील ऐतिहासिक हौदाचे राजकारण पुन्हा एकदा रंगू लागले असून त्याच्या स्वच्छतेत थेट आरोग्य विभागाने लक्ष घातल्याने वादाला तोंड फुटले आहे.

सातारा शहरात मंगळवारी गौराईंचे झालेले आगमनाचा जल्लोष सुरु असताना सातारा पालिकेत मात्र अंतर विरोधाचे राजकारण सुरु होते. एका माजी नगरसेविकेने मंगळवार तळ्यावरील एका हटवलेल्या टपरीचे निमित्त करुन विरोधी बाकांवर बसणाऱ्या नगरसेवकांवर नथीतून तीर मारण्याचे उद्योग सुरु केले आहेत. आधी मुख्याधिकारी नंतर आरोग्य विभाग अशी यंत्रणा हाताशी धरुन रामाचा गोट येथील ऐतिहासिक हौद आणि त्याचे सुशोभिकरण कसे हाणून पाडायचे याचे राजकीय डाव दिवसभर रंगत होते. सातारा विकास आघाडीतल्या सगळीच विकासकामे आपली असे समजून सुसाटलेल्या काही पदाधिकाऱ्यांचे पाय अजूनही जमिनीवर आलेले नाही.

“दे काम, घे दाम’ असा खाक्‍या असणाऱ्या या पदाधिकाऱ्याला राजमातांनी बोगदा परिसरात रंगेहाथ पकडल्यानंतर ही स्वारी बिनबोभाट स्क्रॅपचा ऍडव्हान्स भरायला लेखा विभागात पोहोचली होती. आता रामाचा गोट परिसरातील ऐतिहासिक हौदाला भरुन घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. अर्थात हा वॉर्ड भाजपच्या नगरसेविका सिद्धी पवार यांचा आहे. त्यांच्या परस्पर नगरपालिकेची मालमत्ता असल्याप्रमाणे आरोग्य विभाग कामाला लागल्याने पालिकेत वादाचे फटाके फुटल्याची चर्चा आहे. या चर्चेचा ताण मुख्याधिकाऱ्यांना इतका झाला की त्यांनी केबिन सोडून थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)