सम्राट गायकवाड 

क्‍या हुआँ तेरा वादा? सातारकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेल्या धनगर आरक्षणाच्या आश्‍वसनाची आठवण करून देण्यासाठी नागपुर येथे आयोजित मेळाव्यात क्‍या हुआ तेरा वादा…हे गीत वाजविण्यात आले. यानंतर आता हेच गीत सातारा जिल्हावासिय देखील मेडीकल कॉलेजच्या निमित्ताने गुणगुणु लागू लागले आहेत. कारण, एकदा नव्हे तर तब्बल दोनदा मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यात आल्यानंतर मेडीकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लावण्याची घोषणा केली.

मात्र, अद्याप त्या दृष्टीने कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या पुढील सातारा दौऱ्यात येथील नागरिकांनी स्पिकरवरून क्‍या हुआ तेरा वादा गीत वाजविले तर आश्‍चर्य वाटू नये. परंतु ही वेळच येवू नये यासाठी किमान सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मेडीकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यात मेडीकल कॉलेज व्हावे यासाठी सहा वर्षापूर्वी मंजुरी दिली होती. त्यासाठी सातारा- कोरेगाव रोडवरील खावली गावच्या परिसरात महसूल विभागाची जमीन सुचित करण्यात आली. परंतु तत्कालिन कृष्णाखोरे मंत्री व पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी खावली ऐवजी सातारा शहरानजिक असलेल्या कृष्णा खोरेच्या जागेत मेडीकल कॉलेज उभारण्याचा प्रस्ताव पुढे केला.

या प्रस्तावात अनेक अटी असल्याने आघाडी सरकार सत्तेवरून खाली येईपर्यंत निर्णय होवू शकला नाही. एकूणच कॉंग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या राजकारण व निष्क्रीयतेमुळे तो पर्यंत मेडीकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लागला नाही.

सन 2014 मध्ये केंद्रापाठोपाठ राज्यात ही सत्तांतर झाले. जिल्ह्यात सरकारमधील सेनेचा एक वगळता भाजपचा एकही आमदार निवडून आला नाही. त्यामुळे साताऱ्यात मेडीकल कॉलेज होण्याची आशा नागरिकांनी जवळपास सोडूनच दिली होती. मात्र, दिड वर्षापुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा दौऱ्यावर आले असताना येथील पत्रकारांनी प्रलंबित मेडकील कॉलेजचा प्रश्‍न उपस्थित केला त्यावर मुख्यमंत्र्यांनी लवकरच मेडीकल कॉलेजचा प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले.

मात्र त्यानंतरही कोणताही कार्यवाही झाली नाही. उलट मेडीकल कॉलेजचे काम सुरू व्हावे यासाठी साताऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी चार दिवस उपोषण केले. तेव्हा उपोषणा दरम्यान साताऱ्यातील मेडीकल कॉलेजला मंजुरी दिल्यापासून ठराविक दिवसांमध्ये काम सुरू न झाल्याने इंडियन मेडीकल कौन्सिलकडून मान्यताच रद्द झाल्याची बाब समोर आली. तेव्हा रविंद्र कांबळे यांची प्रकृती अस्थिर झाल्याने अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी आपण स्वत: पाठपुरावा करून मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर कांबळे यांनी उपोषण मागे घेतले.

त्यानंतर नुकत्याच मागील फेब्रुवारी महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खा.उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त साताऱ्यात दुसऱ्यांदा दौऱ्यावल आले. यावेळी खा.उदयनराजे भोसले यांनी केलेल्या मागण्यांमध्ये समावेश असलेल्या मेडीकल कॉलेजचा विषय मार्गी लावण्याची दुसऱ्यांदा घोषणा केली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेनंतर किमान महिनाभरानंतर मेडकील कॉलेजला पुर्नमान्यता मिळाली असल्याची माहिती समोर होणे आवश्‍यक होते.

मात्र, अद्याप मान्यताच मिळणे प्रलंबित आहे. त्यानंतर जागा ठरविणे व ताब्यात घेणे आणि बांधकामांसह इतर दिव्य पार पाडावे लागणार आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नाकर्तेपणाला तर दोष दिलाच पाहिजे त्याचबरोबर आता मुख्यमंत्र्यांच्या आगामी निवडणूकीच्या प्रचार सभेदरम्यान त्यांनी सातारकरांशी केलेला वादा कधी पुर्ण करणार हा सवाल विचारलाच पाहिजे.

तीन मंत्र्यांचा वादा, तरीही …
जिल्हावासियांसाठी सातारा येथे सामाजिक न्याय भवनाचे भूमीपुजन तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व इतर मंत्र्यांनी सहा वर्षापुर्वी केले. मात्र, त्यांच्या कार्यकालात तर त्या इमारतीचे काम पुर्ण होवू शकले नाही उलट सत्तेत येवून चार वर्ष झालेल्या युती सरकारला त्या इमारतीचे प्रलंबित कामा अभावी उद्घाटन करता आले नाही.

याबाबत सातारा दौऱ्यावर आलेले सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी तर खुद्द बांधकाम स्थळी जावून कामाची पाहणी करून चौकशीचे आदेश दिले. तर त्यानंतर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी लवकरात लवकर उद्घाटन घेण्याचे आश्‍वासन दिले तर त्यानंतर ही उद्घाटन होवू न शकल्याने हा विषय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला तरी ही सामाजिक न्याय भवनच अद्याप न्याय मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे.

भाजप नेते करतात तरी काय
मेडीकल कॉलेजचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे मुख्यमंत्री दोन वेळा आश्‍वासन देवून जातात. त्यानंतर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वसनांची पुर्तता करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलणे आवश्‍यक होत व आहे. परंतु त्या दृष्टीने जिल्ह्यातील पदाधिकारी हालचाल करताना दिसून येत नाही, त्यावरून सातारा जिल्ह्यात भाजप वाढीचे कितपत काम झाले असेल हे सांगायला नको.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)