साताऱ्यातील पर्यावणपुरक गणेशोत्सव मंडळांना नाही विसर्जनाची समस्या

गुरूनाथ जाधव
सातारा येथील काही मंडळांनी पर्यावरणाचा विचार करून काही वर्षांपासून गणेश विसर्जनावर उपाय काढला आहे. शहरातील काही मंडळांनी कायमस्वरुपी किंवा बरेच वर्ष टिकणाऱ्या गणेशाच्या मुर्ती तयार करून घेतल्या आहेत. दरवर्षी गणेश मुर्ती विकत घेण्याचा खर्च वाचवून तो ती रक्कम मंडळे सामाजिक उपक्रमासाठी देतात. गणेशोत्सवाबाबत असा सकारात्मक विचार केल्यास दरवर्षी निर्माण होणारे तेच ते प्रश्‍न नक्की निकालात निघतील.

श्रीमंत महागणपती सम्राट मंडळाने पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे पाच वर्षांपूर्वी ठरवले. त्यांनी गेली पाच वर्षे गणपती विसर्जन केलेले नाही. प्रत्येक वर्षी सातारा शहरातील गणेश विसर्जनाच्या तळ्या बाबत निर्माण होणाऱ्या समस्येवर मुर्तीचे विसर्जनच करायचे नाही असा संकल्प मंडळाने केला आणि तो सलग पाच वर्षे राबविला आहे. शहरातील कायम स्वरूपी गणेश मंदिरासोबतच आता कायम स्वरूपी गणेशमुर्ती हि संकल्पना जोर धरत आहे. शहरातील इतर मंडळांनी देखील फायबरच्या मुर्ती करून ती जतन करण्याचा निर्धार केला आहे.

सातारा शहरातील सदाशिव पेठेतील खणआळीत असलेले गणेश भक्तांचे आराध्य म्हणजे सम्राट महागणपती होय. मंडळाची स्थापना 1968 साली बाळासाहेब तांबोळी यांनी केली. मंडळ स्थापने पासून ते आजपर्यंत ते संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये महागणपती बसविण्याची प्रथा या मंडळाने 1952 सालात प्रथमत: सुरू केली. सम्राट महागणपतीला दर्शनासाठी भाविकांची गर्दी दरवर्षी वाढतच आहे. महागणपतीचे मुकूट, अलंकार, शस्त्रें चांदीची असून त्याचे वजन सुमारे 60 किलो आहे. भाविकांनी श्रध्देने श्रींना भेट म्हणून ते दिले आहेत. दरवर्षी या दागिन्यांनी बाप्पांना सजवले जाते.

शरद टंकसाळे, कै. प्रकाश साळवी, तात्या कुलकर्णी, कै. विजय टंकसाळे, भास्कर खुटाळे, कै. मनोहर खोले यांनी मंडळाच्या स्थापने पासून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला. डॉल्बी मुक्त व गुलाल विरहित मिरवणूक सोहळयाचे आयोजन प्रत्येक वर्षी मंडळ करते. पारंपरिक वाद्यांचा संच यात प्राधान्याने असतो. युनियन क्‍लब येथे प्रत्येक वर्षी मुर्ती जपून ठेवली जाते. मुर्तीचे पावित्र राखण्याचे काम मंडळाचे कार्यकर्ते करतात. महागणपती विसर्जन केले जात नसल्याने सातारा शहरातील गणेश विसर्जनाचा पेच प्रसंग निर्माण झाला असला तरी आम्हाला याबाबत काहीच फरक पडत नसल्याचे सम्राट मंडळाचे शंभूशेठ तांबोळी यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले आहे.

मुर्ती खरेदीच्या खर्चात बचत करून मंडळाने सम्राट चौकामध्ये सिसिटीव्ही बसविले आहेत. दुष्काळग्रस्तांना, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत अशी आर्थिक मदत मंडळ करते. गरजू मुलांना दत्तक घेणे, रक्तदान, आरोग्य शिबिरासारखे सामाजिक उपक्रमात मंडळाचे सर्व कार्यकर्ते एकदिलाने सहभागी होतात. येत्या काळात मंडळाच्यावतीने पेठेत सम्राट मंडळाची रूग्णवाहिका घेण्याचे नियोजन आहे. सातारा शहराची वाढती लोकसंख्या व भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेवुन भविष्यकाळात इतर मंडळांनी देखील अशाच पध्दतींचा अवलंब केल्यास प्रशासनाला अडचणी येणार नाहीत. सोबत सण उत्सव साजरे करण्याकरता कोणत्याही अटी-शर्ती राहणार नाहीत त्या करता आवश्‍यकता आहे ती आपण सकारात्मकतेने विधायक कृती करण्याची .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)